सुशांतसिंग आणि दिशा सालियनची हत्याच, तर ‘मातोश्री’वरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार’, राणेंचं खळबळजनक ट्विट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ही दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तर सातत्याने झडत आहेतच. पण आता या आरोपांची धार अधिकच वाढत चालली असून वैयक्तिक देखील होऊ लागले आहेत. यातच आता भाजपचे केंद्रीय मंत्री यांनी आज (18 फेब्रुवारी) राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारं एक ट्विट केलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर पुन्हा गंभीर आरोप केले होते. तर राणेंच्या याच आरोपाला उत्तर देण्यासाठी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी देखील पत्रकार परिषद घेतली होती. या सगळ्यानंतर आज नारायण राणे यांच्या मुंबईतील बंगल्यातील काही बांधकामाबाबत त्यांना मुंबई महापालिकेकडून एक नोटीस बजावण्यात आली. हीच नोटीस मिळाल्यानंतर आता नारायण राणे यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी दावा केला आहे की, ‘मातोश्री’च्या चौघांसाठी ईडीची नोटीस तयार आहे.’

पाहा नारायण राणेंनी काय ट्विट केलंय:

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी, लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार?’, असं ट्वीट करत नारायण राणे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय

ADVERTISEMENT

किरीट सोमय्या आणि संजय राऊत आमनेसामने

ADVERTISEMENT

सगळ्यात आधी सुरुवातीला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि संजय राऊत यांनी मोठ्या प्रमाणात जमिनी लाटल्याचे आरोप केले होते. ज्यानंतर संजय राऊत यांच्या अनेक जवळच्या व्यक्तींकडे ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केली होती. यामुळे या सगळ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी राऊतांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांवर तुफान हल्ला चढविण्यात आला होता. तसेच फक्त महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे असं राऊतांनी यावेळी सांगितलं होतं.

राणेंची पत्रकार परिषद, राऊतांवर हल्ला

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर लागलीच दुसऱ्या दिवशी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका तर केलीच. पण आमच्याकडे सीबीआय, ईडी आहे असं खुलेपणाने सांगितलं. यावेळी ते राऊतांना उद्देशून असंही म्हणाले की, ‘ईडीवर बोलू नको, तुला बिडी प्यायला लावतील.’

नारायण राणेंना मुंबई महापालिकेकडून नोटीस

दुसरीकडे आज सकाळी नारायण राणे यांना मुंबई महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जुहू या ठिकाणी एक बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार आल्याने मुंबई महापालिकेने ही नोटीस धाडली आहे.

मुंबई महापालिकेच्या के पश्चिम विभागाच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाचं पथक आज नारायण राणे यांच्या अधीश बंगल्यात पाहणी करून अनधिकृत बांधकामाच्या तक्रारीबाबत तपासणी करेल, अशी नोटीस राणे यांना पाठवली होती. आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी याबाबत तक्रार केली आहे. बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची याआधी तक्रार करूनही महापालिकेनं कारवाई केली नसल्याचं दौंडकर यांनी महापालिकेला कळवलं होतं. त्यानंतर महापालिकेनं ही नोटीस पाठवली. बंगल्याचं बांधकाम करताना सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

दरम्यान, याच नोटीसीनंतर आता राणे अधिक चवताळले आहेत. त्यामुळेच त्यांनी आता थेट मातोश्रीवरील म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना ईडी नोटीस पाठविणार असल्याचं सांगितलं आहे. शिवाय दिशा सालियन आणि सुशांतसिंग राजपूत यांची आत्महत्या नव्हे तर हत्या झाली असून त्याची देखील पुन्हा एकदा चौकशी केली जाणार असल्याचं म्हटलं आहे.

पुन्हा राणे विरूद्ध शिवसेना! केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबई महापालिकेची नोटीस

निलेश राणेंचं ट्विट

दुसरीकडे नारायण राणेंचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी देखील एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की, ‘किती खालच्या थराचं राजकारण चाललंय ते महाराष्ट्र बघतोय.’ पाहा नेमकं ट्विट काय

‘किती खालच्या थराचं राजकारण चाललय महाराष्ट्र बघतोय, सत्ता कधी कायमची नसते काही लोकं विसरलेत. आमचा दुसऱ्या जन्मात विश्वास नाही सगळे हिशेब ह्याच जन्मात चुकते करणार.’ असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे.

दरम्यान, या सगळ्या आरोपांमुळे राज्यातील राजकारण हे दिवसेंदिवस अधिक स्फोटक होत चाललं आहे. त्यामुळे पुढच्या काळात आता नेमकं काय केलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT