
महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार आता कायम आहे. कारण ते सध्या वादात आहेत. नवी मुंबईतल्या नेरूळ पोलीस ठाण्यात पीडित महिलेने जिवे मारण्याची धमकीची तक्रार दिली आहे. तर बेलापूर पोलीस ठाण्यात बलात्काराचीही तक्रार दिली आहे.
भाजपचे नेते आणि आमदार गणेश नाईक यांना या प्रकरणात कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. गणेश नाईक यांना अटकपूर्व जामीन नाकारला आहे. तसंच त्यांना अंतरिम जामीन मिळणार की नाही याचा फैसला २७ तारखेला होणार आहे. त्यामुळे गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
काय आहे प्रकरण?
भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात एका महिलेने नवी मुंबईच्या नेरुळ पोलिसात तक्रार दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने गणेश नाईकांवर असा आरोप केला आहे की, गेले अनेक वर्ष ते लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये होते. आणि त्यांना 15 वर्षाचा एक मुलगा देखील आहे.
आपल्या मुलाला नाईकांच्या संपत्तीत अधिकार आणि त्यांचं नाव मिळावं अशी महिलेची मागणी आहे. याच मागणीमुळे गणेश नाईक हे आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोपही महिलेने केला आहे.
याप्रकरणी तक्रारदार महिलेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नवी मुंबई पोलिसांना पत्र लिहून स्वतःच्या आणि आपल्या 15 वर्षांच्या मुलाला सुरक्षा पुरविण्याची विनंती केली आहे.
यावेळी महिलेने ती गणेश नाईक यांची प्रेयसी असल्याचं म्हटलं आहे. तसं तिने आपल्या लेखी तक्रारीत देखील म्हटलं आहे. तिचा असा दावा आहे की, ती 1993 पासून गणेश नाईक यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये (live-in-relationship) होतो.
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला ही देखील नवी मुंबईतीलच रहिवासी आहे. या तक्रारदार महिलेने तक्रारीत असं नमूद केलं आहे की, गणेश नाईक हे उच्चपदस्थ असल्यामुळे तिला तिच्या जीवाची भीती वाटत आहे. पण आपल्या मुलाच्या हक्कासाठी तिने सत्य समाजासमोर यावं यासाठी हे पाऊल उचललं असल्याचं म्हटलं आहे.