मुंबई NCB ची धडक कारवाई, नांदेडमध्ये १ हजार १२७ किलो गांजा पकडला

दोन आरोपींना अटक, NCB ची आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई
मुंबई NCB ची धडक कारवाई, नांदेडमध्ये १ हजार १२७ किलो गांजा पकडला
जप्त केलेल्या मुद्देमालासह NCB चे अधिकारी

आर्यन खानच्या अटकसत्रानंतर चर्चेत असलेल्या मुंबईच्या NCB पथकाने आणखी एक महत्वाची कारवाई केली आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात मांजरम गावाजवळ NCB ने १ हजार १२७ किलो गांजा जप्त केला आहे. हा गांजा विशाखापट्टणम येथून आणण्यात येत होता अशी माहिती मिळते आहे.

गांजाने भरलेली ४९ पोती NCB ने या कारवाईत जप्त केली आहे. NCB च्या अधिकाऱ्यांनी वाहनाचा पाठलाग करत सकाळी ४ वाजता ही कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून NCB चे अधिकारी या ट्रकच्या मागावर होते. आंध्र प्रदेशच्या सीमेवरुन NCB हा ट्रक महाराष्ट्रात येऊ दिला यानंतर नायगाव येथील मांजरम येथे या ट्रकमधला मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

NCB ने या कारवाईत दोघांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे. या कारवाईबद्दल NCB च्या मुंबई विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी माहिती दिली. "महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांत हा गांजा सप्लाय केला जाणार होता. आमच्या दोन अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती मिळाली होती. अमोल मोरे आणि सुधाकर शिंदे या दोन अधिकाऱ्यांनी माहिती मिळताच ३६ तासांपासून जाळ पसरवलं होतं."

अखेरीस आज सकाळी हा ट्रक NCB च्या जाळ्यात सापडला. सुरुवातीला १५०० पोती गांजा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. परंतू यानंतर तपास केला असता १ हजार १२७ किलो गांजा असल्याचं समोर आलंय. NCB ची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कामगिरी असल्याचं समीर वानखेडे यांनी सांगितलं. आरोपीने ट्रकमध्ये गांडा लोखंडी पिंपात गोणपाटाखाली झाकून ठेवला होता अशी माहिती वानखेडे यांनी दिली. बाजारभावाप्रमाणे पकडलेल्या मालाची किंमत ४ कोटींच्या घरात असल्याचं कळतंय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in