कंगना रणौत विरोधात पुण्यातल्या चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

मुंबईतही कंगनाविरोधात आपकडून FIR दाखल
कंगना रणौत विरोधात पुण्यातल्या चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

अभिनेत्री कंगना रणौतच्या विरोधात पुण्यातल्या चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस समीर उत्तरकर यांनी यासंदर्भातली तक्रार दिली आहे. कंगना रणौतने एका कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्याबाबत जे वक्तव्य केलं होतं ते वादग्रस्त होतं. त्यामुळेच कंगनाच्या विरोधात ही तक्रार देण्यात आली होती. ज्यानंतर ही तक्रार देण्यात आली असून तिच्यावर गुन्हा दाखल कऱण्याची मागणी करण्यात आली आहे.

कंगना रणौत
कंगना रणौत फोटो सौजन्य- कंगना रणौत -फेसबुक पेज

मुंबईतही FIR दाखल

अभिनेत्री कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मुंबईतही आपकडून FIR दाखल करण्यात आली आहे. कंगनाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी रक्त सांडलं त्या सगळ्यांचा अपमान केला आहे असं म्हणत ही FIR करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अनेकदा काही वक्तव्यं करुन कंगनाने वाद ओढावून घेतल्याचं आतापर्यंत आपण पाहिलं आहे. आता देखील कंगनाने एक अशाच पद्धतीचं अत्यंत वादग्रस्त विधान केलं आहे. ज्यावरुन सोशल मीडियावर तिच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. कंगनाने एका कार्यक्रमात असं वक्तव्य केलं आहे की, '1947 साली जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर ती भीक होती. खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे.' असं वक्तव्य कंगनाने केलं. ज्यानंतर आता कंगनावर टीका होताना दिसते आहे. एवढंच नाही तर तिच्याविरोधात मुंबई आणि पुण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

कंगना नेमकं काय म्हणाली होती?

'सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेते सुभाषचंद्र बोस या लोकांबद्दल बोललो तर या लोकांना माहित होते की रक्त सांडावं लागेल. पण ते हिंदुस्थानी-हिंदुस्थानींचं रक्त सांडू नये.. अर्थातच त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण तेव्हा जे स्वातंत्र्य मिळालं ती भीक होती. आपल्याला खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे.'

या कार्यक्रमात कंगना असंही म्हणाली की, 'काँग्रेसची सत्ता असताना मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. जेव्हा मी राष्ट्रवाद, सैन्य सुधारणा आणि माझ्या संस्कृतीचा प्रचार करते तेव्हा लोक म्हणतात की, मी भाजपचा अजेंडा चालवत आहे. खरं तर हा मुद्दा भाजपचा अजेंडा का असावा.. हा तर देशाचा अजेंडा असला पाहिजे.'

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in