लष्करप्रमुख नरवणेंकडे सोपवण्यात आली मोठी जबाबदारी, नवे CDS नियुक्त होईपर्यंत जुनी व्यवस्था लागू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर पुन्हा एकदा जुनी व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आली आहे. सीडीएस पद अस्तित्वात येण्याआधी देशात ‘चीफ ऑफ स्टाफ कमिटी’ (Chiefs of Staff Committee) असायची. तीच व्यवस्था आता लागू करण्यात आली असून लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांना ‘चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे’ अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सीडीएस पद अस्तित्वात येण्यापूर्वी चीफ ऑफ स्टाफ कमिटीच तीनही सैन्यात समन्वय साधण्याचे काम करत असे. या समितीमध्ये तिन्ही दलांच्या प्रमुखांचा समावेश असतो. आता या समितीच्या अध्यक्षपदी जनरल एमएम नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीनही सैन्य दलाच्या प्रमुखांमध्ये एमएम नरवणे सर्वात वरिष्ठ असल्याने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत नवीन सीडीएसची नियुक्ती होत नाही तोपर्यंत हीच यंत्रणा कायम राहणार असल्याचे समजते आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सीडीएसच्या अनुपस्थितीत वरिष्ठ प्रमुख हे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्षपद स्वीकारतात. चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ जे याआधी सीडीएसला रिपोर्ट करायचे ते आता जनरल एमएम नरवणे यांना रिपोर्ट करतील.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे लष्करी व्यवहार विभागाचे प्रमुख देखील असतात आणि चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे स्थायी अध्यक्ष असतात. लष्करी व्यवहार विभागातील दुसऱ्या क्रमांकाचे वरिष्ठ अधिकारी हे अतिरिक्त सचिव आहेत. या विभागातील अतिरिक्त सचिव हे थ्री स्टार लष्करी अधिकारी असतात. सध्या या पदावर लेफ्टनंट जनरल अनिल पुरी हे आहेत.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफला तिन्ही सैन्य दलाच्या प्रशासकीय मुद्द्यांचे अधिकार असतात. 2019 मध्ये, जेव्हा देशात प्रथमच CDS ची नियुक्ती करण्यात आली होती, त्यावेळी सरकारने एक निवेदन जारी केले होते की, CDS हे तीनही सैन्य दलांच्या मुद्द्याबाबत संरक्षण मंत्र्यांचे प्रमुख सल्लागार असतील. तर, तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख हे त्यांच्या सैन्याशी संबंधित बाबींवर सल्ला देतील. CDS हे लष्करी आदेश देऊ शकत नाहीत.

ADVERTISEMENT

CDS Bipin Rawat: उंच पर्वतरागांमधील लढाईचे तज्ज्ञ आहेत बिपीन रावत! जाणून घ्या त्यांची 10 वैशिष्ट्ये

ADVERTISEMENT

सीडीएस रावत यांचे 8 डिसेंबर रोजी निधन

सीडीएस बिपिन रावत यांचे 8 डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. IAF चे Mi-17 V5 हेलिकॉप्टर CDS जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह 14 अधिकारी घेऊन जात होते, तेव्हा तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर क्रॅश झालं. याच अपघातात जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नीसह 13 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे एकमेव बचावले होते. पण त्यांचंही 15 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान निधन झालं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT