Advertisement

केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया वाढणार?; पंतप्रधान मोदींनी लालकिल्ल्यावरून कुणाला दिला इशारा?

Pm Modi's speech today : नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणातून भ्रष्टाचारविरोधी लढाई तीव्र करण्याबद्दल काय म्हटलंय?
pm Narendra modi speech on independence day 2022
pm Narendra modi speech on independence day 2022

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसह पाच राज्यांचे निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईडीच्या कारवायांवर शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांना उत्तर दिलं होतं. त्यानंतर स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून केलेल्या भाषणात मोदींनी पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा उल्लेख करत विरोधकांवर शरसंधान साधलंय. महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह विविध राज्यांत झालेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे विधान केलं असून, त्याचा अर्थ केंद्रीय यंत्रणाच्या कारवाया वाढणार, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराबद्दल काय म्हणाले?

"काही विषयावर मी आज चर्चा करू इच्छितो. चर्चा अनेक विषयांवर होऊ शकते, पण वेळेच्या मर्यादेअभावी मी दोन विषयांवर बोलू इच्छितो. एक आहे भ्रष्ट्राचार. दुसरा घराणेशाही. लोक गरिबीशी संघर्ष करत आहेत. एकीकडे लोकांना राहण्यासाठी घर नाही, दुसरीकडे असे लोक आहेत ज्यांना चोरीचा पैसा ठेवायला जागा नाही. हे चांगलं नाही."

"आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात पूर्ण ताकदीशी लढायचं आहे. मागील आठ वर्षात थेट अनुदानाद्वारे, आधार, मोबाईल, या आधुनिक यंत्रणांचा वापर करून जे करोडो रुपये चुकीच्या हातात जात होते, ते वाचवून देशाच्या भल्यासाठी वापरण्यात आम्ही यशस्वी झालोय", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

तुरूंगात जायला भाग पडेल, अशी स्थिती आम्ही निर्माण करतोय- पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले, "जे लोक मागील सरकारांच्या काळात बँका लुटून पळून गेले, त्यांच्या मालमत्ता जप्त करून त्यांना परत आणण्याचे प्रयत्न करत आहोत. अनेकांना तुरुंगात जगण्यासाठी आम्ही भाग पाडलंय. ज्यांनी देशाला लुटलं, त्यांनी सगळं परत करावं, अशी परिस्थिती आम्ही निर्माण करत आहोत."

"भ्रष्टाचाराविरोधात मी बघतोय की, आपण एका निर्णायक कालखंडात पाऊल ठेवत आहोत. मोठे लोक वाचू शकणार नाहीत. भ्रष्टाचाराविरोधात भारत एका निर्णायक काळात प्रवेश करत आहे. मी हे मोठ्या जबाबदारीने बोलतोय", असं नरेंद्र मोदी लालकिल्ल्यावरील भाषणात म्हणाले.

भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी तुमची साथ हवीये - पंतप्रधान नरेंद्र मोदी

"भ्रष्टाचार वाळवीसारखा देशाला संपवत आहे. ही लढाई लढायची आहे. १३० कोटी भारतीयांनी मला आशीर्वाद द्यावेत. साथ द्यावी, जेणेकरून मी ही लढाई लढू शकेल. सर्वसामान्यांचं आयुष्य भ्रष्टाचारांना उद्ध्वस्त करून ठेवलंय. म्हणून हा चिंतेचा विषय आहे."

"आज देशात भ्रष्टाचाराविरोधात तिरस्काराची भावना दिसतेय. याविषयी लोक बोलतानाही दिसतात, पण कधी कधी भ्रष्टाचार करणाऱ्यांविरोधातही उदारतेची भावना वाढताना दिसतेय. कोणत्याही देशासाठी हे शोभनीय नाहीये", असं नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

काही लोक निर्लज्जपणाचा कळस गाठतात - पंतप्रधान नरेंद्र मोदी

"काही लोक तर इतकं निर्लज्जपणाचा इतका कळस गाठतात की, न्यायालयात शिक्षा झालेली असो, भ्रष्टाचार सिद्ध झालेला असो, तुरुंगात जाणं निश्चित झालेलं असो, तुरुंगात राहत असतील, इतकं होऊनही त्यांचं गुणगान गाण्यात मग्न असतात. त्यांच्या आदरतिथ्यांमध्ये लागलेले असतात."

"जोपर्यंत समाजात दुर्गंधीविषयी तिरस्काराची भावना तयार होत नाही, तोपर्यंत स्वच्छतेची भावना निर्माण होत नाही. जोपर्यंत भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार करणाऱ्याबद्दल तिरस्काराची भावना निर्माण होत नाही, तोपर्यंत सामाजिक जीवनात त्याला खाली बघण्यासाठी भाग पाडत नाही, तोपर्यंत ही मानसिकता संपणार नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधात आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांविरोधात आपल्याला खूप जागरुक होण्याची गरज आहे", असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in