‘देशी जेम्स लेन’! ‘हर हर महादेव’च्या वादात ठाकरे गटाची उडी, ‘सामना’त काय म्हटलंय?
संभाजीराजे छत्रपतींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या आयुष्यावर येत असलेल्या चित्रपटांबद्दल जाहीरपणे भूमिका मांडली. इतिहासाची तोडमोड केली जात असल्याचा आरोप संभाजीराजेंनी केला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. या सगळ्या वादात आता शिवसेनेनंही (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उडी घेतली असून, सामना अग्रलेखातून खडेबोल सुनावलेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासावर आधारित […]
ADVERTISEMENT

संभाजीराजे छत्रपतींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या आयुष्यावर येत असलेल्या चित्रपटांबद्दल जाहीरपणे भूमिका मांडली. इतिहासाची तोडमोड केली जात असल्याचा आरोप संभाजीराजेंनी केला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. या सगळ्या वादात आता शिवसेनेनंही (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उडी घेतली असून, सामना अग्रलेखातून खडेबोल सुनावलेत.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासावर आधारित चित्रपट वादात सापडले असून, उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामना अग्रलेखातून भाष्य करण्यात आलंय.
सामना अग्रलेखात म्हटलंय की, “छत्रपती शिवाजी महाराज या मातीत जन्मास आल्यामुळेच महाराष्ट्राला इतिहास आहे व बाकी राज्यांना फक्त भूगोल आहे. त्या इतिहासाची कोणत्याही पद्धतीची मोडतोड होता कामा नये. पण अशी मोडतोड झाल्याचे आक्षेप काल झळकलेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाबाबत जसे घेतले गेले तसे यापूर्वीच्या काही चित्रपटांबाबतही घेण्यात आले होते.”
“‘हर हर महादेव’ नामक चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण म्हणजे छत्रपती शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला गेल्याचा आक्षेप आहे. या चित्रपटातील ऐतिहासिक प्रसंग कसे चुकीचे आहेत याबाबत एक यादीच जाहीर केली गेली आहे”, असं सामना अग्रलेखात म्हटलेलं आहे.
आनंद दिघेंवरील धर्मवीर चित्रपटाचाही उल्लेख
“चित्रपट व नाटकांसाठी एक सेन्सॉर मंडळ आहे. ते सर्व तथ्यांची तपासणी करून चित्रपट प्रदर्शनास मान्यता देत असते. ते सेन्सॉर बोर्डही अशा प्रसंगी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. हे फक्त इतिहासाच्याच बाबतीत होते काय, तर तसेही नाही. राज्यकर्ते बदलताच श्रद्धास्थाने बदलतात, तसे इतिहासाचे संदर्भही बदलले जातात. महात्मा गांधी हे मागे पडतात व सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस पुढे येतात. वीर सावरकर फक्त नाव घेण्यापुरते राहतात. पंडित नेहरू तर खिजगणतीत राहत नाहीत. कारण नवा इतिहास लिहिला जातो व तो सोयीनुसार लिहिला जातो. मधल्या काळात कडवट शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर एक चित्रपट प्रदर्शित केला. त्यातही अनेक तथ्यांची साफ मोडतोडच केली आहे”, असा दावा शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करण्यात आलाय.
“देशी जेम्स लेनचा पोटापाण्याचा धंदा”
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणाऱ्या अडाणी उपटसुंभांची मनमानी महाराष्ट्र सहन करणार नाही. महाराष्ट्रात ‘जेम्स लेन्स’चे प्रकरण याआधी घडले आहे, पण अनेक देशी ‘जेम्स लेन्स’ या मातीत उपटले आहेत. त्यांच्यासाठी इतिहास हा पोटापाण्याचा धंदा बनला असेलही, पण महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवराय हा आत्मा आहे. महाराष्ट्राचा हा आत्मा विकू नका! पुराव्यावाचून वाटेल तशी भरमसाट वेडगळ आणि मूर्खपणाची विधाने करणे हा महाराष्ट्रातील ‘विद्वान’ म्हणवून घेणाऱ्या संशोधकांच्या एका गटाचा फार जुना धंदा आहे. अशा संशोधकांना एका पोत्यात घालून हिंदी महासागरात बुडवायला हवे, तरच इतिहासाचे तेज धगधगते राहील”, असं सामना अग्रलेखात म्हटलं गेलं आहे.