जिल्हा बॅंकेचा निकाल अन् शरद पवार व अजित पवार आज सातारा दौऱ्यावर...

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माणचे मनोज पोळ, खटावचे नंदकुमार मोरे, कोरेगावचे शिवाजीराव महाडि, पाटणचे सत्यजितसिंह पाटणकर यांच्या निकालाकडे लक्ष
जिल्हा बॅंकेचा निकाल अन् शरद पवार व अजित पवार आज सातारा दौऱ्यावर...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार.Aajtak

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज (मंगळवारी) कराडला मुक्कामी येत आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाबळेश्वरमध्ये येत आहेत. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकालही आज लागणार असून महाबळेश्वर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा राज्यस्तरीय मेळाव्यास शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असणार आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निकाला दिवशीच मंगळवारी रात्री साडेआठ वाजता खासदार शरद पवार कराडला मुक्कामी येणार आहेत. दुसऱ्या दिवशी 24 नोव्हेंबरला सकाळी साडेआठ वाजता यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन करून ते वेणुताई चव्हाण ट्रस्टच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सकाळी दहा वाजता ते भिलार येथे जाऊन कै. बाळासाहेब भिलारे यांच्या कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेणार आहेत. तेथून ते दुपारी साडे बारा वाजता महाबळेश्वरला जाणार असून, दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत राखीव असेल. तीन वाजता ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राज्यस्तरीय मेळाव्यास उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते पुण्याकडे रवाना होतील.

अजित पवार यांचा सातारा दौरा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवारी सकाळी दहा वाजता हेलिकॉप्टरने महाबळेश्वरला येणार आहेत. त्यानंतर मोटारीने हॉटेल ड्रिमलॅण्ड येथे जाणार आहेत. तेथे ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राज्यस्तरीय मेळाव्यास मार्गदर्शन करून हेलिकॉप्टरने दिवेआगार रायगडकडे जाणार आहेत. या दौऱ्याच्या दिवशीच सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल असून, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माणचे मनोज पोळ, खटावचे नंदकुमार मोरे, कोरेगावचे शिवाजीराव महाडिक, पाटणचे सत्यजितसिंह पाटणकर यांचे जिल्हा बँकेतील भवितव्य कळणार आहे. त्यामुळे या निकालाकडे दोन्ही नेत्यांचं लक्ष असणार आहे.

पवारांनी शिवेद्रसिंहराजेंना केला होता फोन

जिल्हा बँकेच्या निकालादिवशीच शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्यात असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही निकालाबाबत उत्सुकता लागली आहे. कारण शशिकांत शिंदे यांच्यासाठी खुद्द शरद पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मकरंद पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती.

जावळी सोसायटी मतदारसंघात ज्ञानदेव रांजणेंच्या भूमिकेमुळे व राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमुळे चक्रव्युहात सापडलेल्या आमदार शशिकांत शिंदेंना बाहेर काढण्यासाठी मतदानाच्या एक दिवस आधी शरद पवार यांना लक्ष घालावं लागलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शशिकांत शिंदेंसाठी फोन केला होता, तर विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी देखील फोन केला होता. मात्र ज्ञानदेव रांजणे यांनी 'या वेळेस मला माफ करा, हवं तर कायमस्वरूपी राजकीय संन्यास घेतो, पण ही लढाई मला करु द्या, असं म्हटलं होतं.

Related Stories

No stories found.