School Reopening : आजपासून शाळांमध्ये किलबिलाट; मुख्यमंत्री साधणार संवाद

कोरोनामुळे तब्बल दीड वर्षाच्या खंडानंतर शाळाची घंटा वाजणार : पहिला दिवशी 'शिक्षणोत्सव'
School Reopening : आजपासून शाळांमध्ये किलबिलाट; मुख्यमंत्री साधणार संवाद
राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय अखेर घेतला.

कोरोनाच्या तडाख्या कोलमडून पडलेलं शैक्षणिक क्षेत्राचं वेळापत्रक हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे. याची सुरुवात शाळा सुरू होण्यापासून होत असून, राज्यातील शाळा आजपासून सुरू होतं आहे. पहिला दिवस शिक्षणोत्सव म्हणून साजरा केला जाणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विद्यार्थी, शिक्षकांशी विशेष संवाद साधणार आहेत.

कोरोनाच्या महामारीमुळे देशभरातील शाळांना कुलूप लागलं होतं. दुसऱ्या लाटेचा उद्रेक नियंत्रणात आल्यानंतर आणि मुलांच्या भावविश्वावर परिणाम होत असल्याच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर अखेर शाळा सुरू केल्या जात आहेत. इतर राज्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्रात आजपासून शाळा सुरू होत आहेत.

सरकारनं शाळा सुरू करण्यासाठी आराखडा तयार केला होता. त्यानुसार ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होत आहेत. तर शहरी भागात आठवी ते बारावीपर्यंचे वर्ग सुरू होणार आहेत. यासाठी सरकारने नियमावलीही जाहीर केली आहे.

‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’

राज्यभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पहिला दिवस शिक्षणोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. शाळांच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभरातील विद्यार्थी-शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ या कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संदेश देणार आहेत.

कोरोना आणि लॉकडाउनमुळे कराव्या लागलेल्या स्थलांतरामुळे अनेक भागातील विद्यार्थी शिक्षणापासून तुटले गेले आहेत. या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत येण्याचा संदेश देणारं 'शाळेकडे परत फिरूया..' असं गीत शालेय शिक्षण विभागाच्या मंत्री वर्षां गायकवाड यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केलं आहे.

अशी आहे शाळांसाठीची नियमावली

- शालेय स्तरावर शैक्षणिक वातावरण निर्मिती व्हावी, यासाठी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अनौपचारिक स्वागत करण्यात यावं.

- शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा भेटींचं नियोजन करुन त्याची एक प्रत प्राथमिक/माध्यमिक शिक्षण संचालनालयाला द्यावी.

- शाळा भेटीचे फोटो, व्हिडीओ आपल्या अथवा आपल्या सहकाऱ्याच्या फेसबुक/ इन्स्टाग्राम/ ट्विटर यापैकी एका किंवा सर्व समाजमाध्यमांवर पोस्ट कराव्यात. पोस्टसोबत आपले नाव, पद, जिल्हा, तालुका, भेट घेतलेल्या शाळेचे नाव, यु डायस क्रमांक, भेटीचा दिनांक व वेळ आदी तपशील देखील अपलोड करण्यात यावा.

- फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर या समाज माध्यमावर पोस्ट करताना ती Public असायला हवी. तसेच फेसबुकवरही पोस्ट करताना Story मध्ये शेअर न करता Wall वर शेअर करण्यात यावी.

- भेटीच्या फोटोसोबत आपण आपल्या भेटीचा / शाळेतील कार्यक्रमाचा व्हिडीओ पोस्ट करताना तो जास्तीत जास्त २ ते ३ मिनिटांपर्यंतचा असावा. फोटो व व्हिडीओ सुस्पष्ट असेल याची काळजी घ्यावी.

- समाजमाध्यमावर पोस्ट करताना #MVMJ2021, #शिक्षणोत्सव या हॅशटॅगचा (#HASHTAG) वापर करावा.

- पोस्ट करताना फेसबुकवर @SCERT,Maharashtra, @thxteacher, ट्विटरवर @scertmaha, @thxteacher आणि इन्स्टाग्रामवर @scertmaha, @thankuteacher या सगळ्यांना टॅग करावं.

- शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात यावे. त्याचे देखील फोटो सूचनांप्रमाणे अपलोड करण्यात यावं.

- आपण पोस्ट केलेली समाजमाध्यमावरील पोस्ट कॉपी करून घ्यावी आणि https://scertmaha.ac.in/mvmj या प्रणालीवर जाऊन आवश्यक तपशील भरून सबमिट करण्यात यावी.

- शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या भेटीची नोंद राज्यस्र्तरीय प्रणालीवर करण्यात येईल.

- शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक देखील आपल्या शाळेतील शिक्षणोत्सवाचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करू शकतात.

- विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शालेय गणवेश वाटप करावे.

- शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्राधान्यानं लसीकरण करुन घ्यावं. लसीकरण झालं नाही या कारणास्तव अनुपस्थित राहता येणार नाही. विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांची १०० टक्के हजेरी असावी. लसीकरण झालंय त्यांना कोरोना चाचणीचं बंधन नसेल,इतरांना ही चाचणी करावी लागेल.

- मुख्यमंत्र्यांचं ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ सर्व शिक्षकांनी पाहावा. विद्यार्थ्यांनाही हा कार्यक्रम दाखवावा.

- ग्रामीण भागात १ ली ते चौथी आणि शहरी भागात १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी गृहभेटी घेऊन मार्गदर्शन करावं.

Related Stories

No stories found.