लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोलापुरात केला आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर भाष्य करत असताना शरद पवार यांनी हा मोठा आरोप केला आहे. “आपल्या मागणीसाठी शेतकरी गेल्या अडीच महिन्यांपासून जास्त काळ दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. आम्हाला फुकट काहीही नको आमच्या घामाची किंमत आम्हाला द्या असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या आंदोलनाचं मुख्य वैशिष्ट्य हे की शेतकऱ्यांनी कायदा हातात घेतला नाही.” असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
दिल्ली हिंसाचारावर भाष्य
“26 जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीच्या वेळी जो काही हिंसाचार उसळला ते खरे शेतकरी नव्हते. त्यामागे शेतकरी आंदोलनाला बदनाम करणारे घटक होते, सत्ताधारी पक्षातील काही घटक होते. याबद्दल आम्ही जेव्हा खोलात जाऊन माहिती घेतली तेव्हा ही माहिती मिळाली. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमधले शेतकरी हे टप्प्या टप्प्याने उपोषण करत आहेत. खरेदी आणि मालाची योग्य किंमत मिळावी ही देखील शेतकऱ्यांची मागणी आहे.” असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
काय घडलं होतं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी?
दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर काही आंदोलकांनी ट्रॅक्टर चढवले. तसंच येथील लाल किल्ल्याच्या बुरूजांवर झेंडाही फडकवला. यानंतर बराच गदारोळ झाला होता. तसंच आंदोलनाची भूमिका रास्त असली तरीही ही कृती गैर आहे असंही सगळ्या पक्षांनी म्हटलं होतं. 26 जानेवारीच्या या आंदोलनानंतर काही दिवसांनी भाजपचा यामागे हात होता अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या.
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून जास्त काळ दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू आहे. आंदोलक शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या आहेत. चर्चेच्या 11 फेऱ्या पार पडूनही काही फरक पडलेला नाही. त्यामुळे अद्यापही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे.