‘नड्डाजी, जरा जपून! तुम्हाला परवडणार नाही’; इतिहासाचा दाखला देत शिवसेनेचे टीकेचे बाण
भाजपला लढा देईल, असा राष्ट्रीय पक्ष देशात नाही. प्रादेशिक पक्षही संपतील आणि फक्त भाजपच राहिल, असं विधान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनी केलं. नड्डांच्या या विधानाचा शिवसेनेनं सामना अग्रलेखातून समाचार घेतला आहे. ‘नड्डा हे हुकूमशहांच्या चेल्याची भाषा बोलत आहेत व ही भाषा घराणेशाहीपेक्षा भयंकर आहे’, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर वंशावरून टीकेचे बाण डागले आहेत. शिवसेनेनं […]
ADVERTISEMENT

भाजपला लढा देईल, असा राष्ट्रीय पक्ष देशात नाही. प्रादेशिक पक्षही संपतील आणि फक्त भाजपच राहिल, असं विधान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनी केलं. नड्डांच्या या विधानाचा शिवसेनेनं सामना अग्रलेखातून समाचार घेतला आहे. ‘नड्डा हे हुकूमशहांच्या चेल्याची भाषा बोलत आहेत व ही भाषा घराणेशाहीपेक्षा भयंकर आहे’, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर वंशावरून टीकेचे बाण डागले आहेत.
शिवसेनेनं सामना अग्रलेखात म्हटलं आहे, “भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ही व्यक्ती इतरांच्या तुलनेत बरी आहे, असा एकंदरीत समज होता. एक तर ते हिमाचलसारख्या शांत, थंड प्रदेशातून आलेले आहेत व अ. भा. विद्यार्थी परिषदेपासून ते समाजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे लोकशाहीचे भान त्यांना असावे, पण अखेर नड्डाही सब घोडे बारा टके या हिशेबानेच बोलू लागले आहेत. नड्डा यांनी आता सांगितले आहे की, देशात फक्त भाजपच टिकेल. शिवसेनेसह प्रादेशिक पक्ष संपतील. नड्डा यांचे विधान अहंकार व गर्वाने फुगलेले आहे.”
शिवसेनेनं नड्डांना सांगितला इतिहास
“नड्डा यांनी शिवसेनेचा उल्लेख केला म्हणून सुरुवातीलाच सांगायला हवे. शिवसेनेला संपविण्याची भाषा करणे हा कृतघ्नपणाचा कळस आहे. याच शिवसेनेने पंचवीसेक वर्षे भाजपास खांद्यावर घेऊन फिरवले. आज संबंधात दुरावा नक्कीच आहे, पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या नावावरच महाराष्ट्रात आपण तरलात. दुसरे म्हणजे संपूर्ण जग मोदी यांच्याविरोधात उभे ठाकले असताना हिंदुत्वासाठी म्हणून एकमेव बाळासाहेब ठाकरेच मोदींची पाठराखण करीत होते.”
“गुजरातमधील दंगलीचे निमित्त करून मोदींना राजधर्माची आठवण करून देणारे त्यांच्याच पक्षाचे लोक होते. तेव्हा ‘राजधर्म वगैरे ठेवा बाजूला, हिंदू धर्म म्हणून मोदींना हात लावू नका, गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उठवू नका,’ असे ठणकावून बोलणारे देशात एकमेव शिवसेनाप्रमुखच होते. त्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना संपवायला निघालेले जे.पी. नड्डा हे कोणत्या हवेत आहेत? नड्डा हे हुकूमशहांच्या चेल्याची भाषा बोलत आहेत व ही भाषा घराणेशाहीपेक्षा भयंकर आहे.”