शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरातांना मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात; काय आहे चिथावणीखोर विधान?

शिवसेना आणि एकनाथ शिंदे समर्थक यांच्यातील संघर्ष : हिंगोलीतील मेळाव्यात बबनराव थोरात काय म्हणाले?
shiv sena leader babanrao thorat provocative speech
shiv sena leader babanrao thorat provocative speech

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार, खासदारांनी शिवसेनेविरोधात बंड केलं आहे. त्यामुळे पक्षात उभी फूट पडली असून, आता याचे पडसाद गावपातळीपर्यंत उमटू लागले आहेत. शिवसैनिक विरुद्ध शिंदे समर्थक यांच्यात संघर्षाच्या ठिणग्या उडताना दिसत आहेत. त्यातच आता शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी एक विधान केलं. या विधानामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख असलेल्या बबनराव थोरात यांच्या उपस्थितीत हिंगोलीत शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. या कार्यक्रमात बबनराव थोरात यांनी भाषण केलं. भाषणातील विधानांवर आक्षेप घेत त्यांच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पुणे पोलिसांनी बबनराव थोरात यांना ताब्यात घेतलं आहे.

बबनराव थोरात नेमकं काय म्हणाले?

शिवसैनिकांचा हिंगोलीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यातील भाषणादरम्यान बबनराव थोरात यांनी जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छुक असलेल्यांना एक आवाहन केलं होतं. 'बंडखोर आमदार-खासदारांच्या गाड्या फोडणाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल', असं विधान बबनराव थोरांनी केलं. त्यानंतर बबनराव थोरात यांच्यावर शांतता भंग केल्याप्रकरणी तसेच चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदेंच्या बंडखोरीनंतर जिल्ह्यातील राजकारण तापले

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी शिंदे गटाला समर्थन दिलं आहे. त्याचबरोबर अनेक स्थानिक पदाधिकारीही शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसैनिक आणि शिंदे समर्थक आमने-सामने येताना दिसत आहे. त्यातच संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण तापल्याचं बघायला मिळत आहे.

पुण्यात उदय सामंत यांच्यावर हल्ला, ५ शिवसैनिकांना अटक

पुण्यातील कात्रज चौकात आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रेची सभा झाली. या सभेनंतर माघारी परतणाऱ्या शिवसैनिकांना तिथून उदय सामंत हे जाताना दिसले. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली. या प्रकरणी कोथरूड पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण भारती विद्यापीठ पोलिसांकडे वर्ग केलं होतं.

या प्रकरणात शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, संभाजीराव थोरवे, राजेश पळसकर, सुरज लोखंडे, चंदन साळुंखे, विशाल धनवडे, अनिकेत घुले, रुपेश पवार, शेहबाज पंजाबी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

भारती विद्यापीठ पोलिसांनी पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह ५ शिवसैनिकांना अटक केली आहे. पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी याची माहिती दिली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in