Uddhav Thackeray : “आपल्या हातून भगवा खेचणं दूरच, कुणी हात लावायचा प्रयत्न केला….”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. तर या सरकारमुळे शिवसेना दुभंगली आहे. खरी शिवसेना कुणाची हे सिद्ध करण्याचं आव्हान आता उद्धव ठाकरेंसमोर आहे. अशात उद्धव ठाकरे यांनी जे आवाहन शिवसैनिकांना केलं आहे ते चांगलंच चर्चेत आहे. संख्याबळाच्या जोरावर आम्हीच शिवसेना आहोत असा दावा एकनाथ शिंदे […]
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. तर या सरकारमुळे शिवसेना दुभंगली आहे. खरी शिवसेना कुणाची हे सिद्ध करण्याचं आव्हान आता उद्धव ठाकरेंसमोर आहे. अशात उद्धव ठाकरे यांनी जे आवाहन शिवसैनिकांना केलं आहे ते चांगलंच चर्चेत आहे.
संख्याबळाच्या जोरावर आम्हीच शिवसेना आहोत असा दावा एकनाथ शिंदे गट करत आहे. अशात उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना उद्देशून एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोघांनाही निवडणूक आयोगात खरी शिवसेना कुणाची सिद्ध करायचं आहे. कारण या दोघांमधला वाद सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग यांच्यासमोर गेला आहे.
मूळ शिवसेना कोणती आणि शिवसेनेचं पक्षचिन्ह असलेला धनुष्यबाण कुणाकडे राहणार यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याबाबत कोणताही ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय निवडणूक आयोगाने घेऊ नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना उद्देशून काय आवाहन केलं आहे?
“शिवसैनिकाचं रक्त असलेलं आपलं मनगट आहे. तुमच्या हातून भगवा खेचणं तर दूरच पण भगव्याला हात लावण्याचा प्रयत्न जरी कुणी केला तरीही त्याला दाखवून द्या” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या सदस्य नोंदणीच्या मोहिमेबाबत बोलत असताना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं तसंच नाशिकमध्ये सदस्य संख्या १ लाखाच्या वर गेली पाहिजे असंही म्हटलं आहे.
आणखी काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?
माझा विश्वास तुमच्यावर आहे. तुम्हाला सोडून माझ्याकडे कुणीही नाही. त्यांच्या यंत्रणा या ठिकाणी काम करत आहे. मात्र मी कुणालाही कमी लेखत नाही. आपल्याला मर्दासारखं जिंकलं पाहिजे. त्यांच्या यंत्रणा काम करत आहेत. मात्र आपल्या सदस्यसंख्या आणि प्रतिज्ञापत्रांची संख्या एवढी झाली पाहिजे की भविष्यात कुणीही शिवसेनेच्या वाटेला जाण्याचा विचार कुणी स्वप्नातही करता कामा नये असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
२१ जूनला राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बाहेर पडले आहेत. तेव्हापासून ते उद्धव ठाकरेंना आव्हानच देत आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वाला म्हणजेच उद्धव ठाकरेंनाच त्यांनी आव्हान दिलं आहे. शिवसेनेवरही एकनाथ शिंदे यांनी दावा सांगितला आहे. या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेलं हे आवाहन महत्त्वाचं ठरतं आहे तसंच ते चर्चेतही आहे.