Hasan Mushrif : ३० तासांची चौकशी; ५ बडे अधिकारी ताब्यात; मुश्रीफांनाही अटक होणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याशी संबंधित कोल्हापूरमध्ये आज (गुरुवारी) मोठी घडामोड घडली. मुश्रीफ अध्यक्ष असणार्‍या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ईडीनं बुधवारपासून चौकशी सुरू केली आहे. तब्बल ३० तासांच्या चौकशीनंतर आज ईडीच्या अधिकार्‍यांनी बँकेच्या ५ अधिकार्‍यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तर ४ ते ५ बॉक्स कागदपत्रं ताब्यात घेतली आहेत. (While the whole of Maharashtra is in the news today for the Vidhan Parishad elections, a major development has taken place in Kolhapur)

ADVERTISEMENT

या कारवाईमुळं आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या पथकांनी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयासह हरळी आणि सेनापती कापशी इथल्या शाखांवर छापेमारी केली होती. तसंच आमदार हसन मुश्रीफ यांचे पुत्र अध्यक्ष असणार्‍या संताजी घोरपडे साखर कारखान्यावरही ईडीनं छापा टाकला. संताजी घोरपडे साखर कारखाना तसंच बँकेच्या हरळी आणि सेनापती कापशी बँकेची चौकशी, बुधवारी रात्री पूर्ण झाली.

MLC Election : नागो गाणार पराभूत : भाजपनं अंग काढलं? बावनकुळे म्हणाले…

हे वाचलं का?

मात्र केडीसीसीच्या मुख्य कार्यालयात तब्बल ३० तास ईडीच्या पथकानं चौकशी केली. बुधवारी रात्रभर कागदपत्र तपासणीचं काम सुरू होतं. साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करणार्‍या विभागातील कागदपत्रांची छाननी करण्यात आली. या विभागातील सुमारे २० कर्मचारी तब्बल ३० तास बँकेत होते. बुधवारी रात्री साडे अकरानंतर बँकेच्या अध्यक्षांच्या पीएकडे ईडीच्या अधिकार्‍यांनी चौकशी केली.

याच दरम्यान हसन मुश्रीफ यांचा बँकेच्या एका अधिकार्‍याला फोन आला. ईडीच्या अधिकार्‍यांनी स्पीकर ऑन करून बोलण्याची त्या अधिकार्‍याला सूचना केली. त्या अधिकार्‍यानं स्पीकर ऑन करताच, आपल्याच टेबलची ईडीच्या पथकाकडून तपासणी सुरू असल्याचं सांगितलं. या तपासणीमध्ये काही आक्षेपार्ह कागदपत्रं आढळून आल्याचं समजतं.

ADVERTISEMENT

MLC Election Result: फडणवीस उतरले मैदानात, तरीही ‘मविआ’ने नागपूर मिळवलं!

ADVERTISEMENT

ईडीच्या अधिकार्‍यांनी ४ ते ५ बॉक्स भरून कागदपत्रं ताब्यात घेतली. त्यानंतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहाय्यक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, बँक िनरीक्षक राजू खाडे आणि सचिन डोणकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याबद्दलचं समन्स देण्यात आलं. ही माहिती मिळताच कर्मचारी युनियननं तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच जोरदार घोषणा दिल्या.

तब्बल ३० तास बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी ईडीच्या दडपणाखाली आहेत. त्यांची प्रकृती अथवा आरोग्यविषयक कोणतीही समस्या निर्माण झाल्यास, ईडीच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा अतुल दिघे यांनी दिला. त्यानंतर काही वेळातच ईडीचे अधिकारी बँकेच्या ५ अधिकार्‍यांना घेऊन खाली आले. केंद्रीय सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात या अधिकार्‍यांना घेऊन ईडीचं पथक मुंबईच्या दिशेनं रवाना झालं. दरम्यान केडीसीसी बँकेच्या ५ अधिकार्‍यांना ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानं, सहकारी बँकिंग वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT