vedanta foxconn Project : ‘तुम्ही भित्रे होतात, आम्ही 40 वार पाठीवर घेतलेत आणि आणखी घेऊ’; आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

फॉक्सकॉन-वेदांता प्रकरणावरून माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरेंनी उदय सामंत यांच्यावर टीकास्त्र डागलं. दुसऱ्या राज्यात हे घडलं असतं, तर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता. या डबल इंजिन सरकारचं एक इंजिन फेल झालंय, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदेंवर त्यांनी टीका केली आहे.

शिव संवाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यांची रत्नागिरी सभा झाली. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “ज्या एक लाख नोकऱ्या आपल्या राज्यात येणार होत्या, त्या गेल्या कशा? जी पावणेदोन लाखांची गुंतवणूक आपल्या राज्यात येणार होती. ती गेली कशी? जो प्रोजेक्ट शंभर टक्के येणार होता. इथल्या मुलामुलींना नोकऱ्या देणार होता. याची उत्तर तर देत नाहीत, पण आमच्यावर आरोप करताहेत आमच्यामुळे गेला”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

शिव संवाद यात्रा : फॉक्सकॉन प्रोजेक्ट पुन्हा महाराष्ट्रात; आदित्य ठाकरेंचं शिंदेंच्या वर्मावर बोट

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“आम्हाला तुम्ही सरकारमधून बाहेर काढलं. तुम्ही आमच्यापेक्षा सक्षम आहात, तर मग हा प्रोजेक्ट हातातून गेला कसा. दुसरा प्रोजेक्ट रायगड लोह्यामध्ये आणणार होतो. बल्क ड्रग्ज पोर्टचा प्रोजेक्ट. महाराष्ट्रात औषधी बनवणाऱ्या कंपना सर्वाधिक आहेत. लस बनवणाऱ्या कंपन्या आहेत. त्या प्रोजेक्टमुळे ७० ते ८० हजार नोकऱ्या उपलब्ध झाल्या असत्या”, असं सांगत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला प्रकल्प जाण्यासाठी जबाबदार ठरवलं.

“केंद्रावर मी टीक करत नाहीये. कारण मागच्या सात वर्षात हेच सरकार केंद्रात आहे. महाविकास आघाडी सरकार असतानाही हेच सरकार होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. या महाराष्ट्रात साडे सहा लाख कोटींची गुंतवणूक आणली. या डबल इंजिन सरकारचं एक इंजिन फेल झालं. झोपले असतील”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीकेचे बाण डागले.

ADVERTISEMENT

“बल्क ड्रग्ज पोर्टही गेला हेच यांना माहिती नव्हतं. उद्योग खातं त्याचा पाठपुरावा करत होतं. तेही उद्योगमंत्र्यांना माहिती नाही. तेही आपल्या हातून निघून गेलं. हेच जर दुसऱ्या राज्यात झालं असतं, तर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्याचा राजीनामा घेतला असता, पण आपले मुख्यमंत्री खूप व्यस्त आहेत”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना गणपती दर्शनावरून टोला लगावला.

ADVERTISEMENT

“तुम्ही कुणासोबत उभे राहणार, शिवसेनेसोबत की या खोके सरकार सोबत? तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत उभे राहणार की, गद्दारांसोबत उभे राहणार? ही राजकीय गद्दारी नाहीये, तर माणुसकीची गद्दारी झालीये. ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्वकाही दिलं. तुम्हाला राजकीय ओळख दिली. सरकार नसताना तुम्हाला जपलंय”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Foxconn Project साठी ठाकरे आणि शिंदे सरकारच्या काळात काय घडलं? असा आहे घटनाक्रम

पाठीवर वार केलेत; शिंदे गटावर आदित्य ठाकरेंचा प्रहार

“उद्धव ठाकरेंनी यांना काय कमी केलं. यांच्यावर काहीतरी दडपण असू शकतं, ते मला माहिती नाही. असू शकतात दडपणं. ही दडपणं त्यांनी सांभाळायला हवी होती. त्यांनी सांगायला हवं होतं की, समोरून या छातीवर वार करा. हे गद्दार आज सांगताहेत आम्ही बंड केलं. उठाव केला. हे बंड नाही. हा उठाव नाही, ही गद्दारी आहे. तुम्ही भित्रे होतात. तुमच्यावर दडपण होती म्हणून तुम्ही पळून गेलात. तुम्ही छातीवर वार झेलण्यापेक्षा आमच्या पाठीवर वार करून निघून गेलात. ४० वार घेतलेत आणि अजून कितीही वार झेलायला तयार आहोत. हिंमत होती, तर समोरून यायला हवं होतं”, असं टीकास्त्र आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांवर डागलं.

follow whatsapp

ADVERTISEMENT