रवी राणा-बच्चू कडू अखेर समोरासमोर! शिंदे-फडणवीसांची मध्यस्थी, मध्यरात्री काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर टीकेच्या फैरी झाडणारे आमदार बच्चू कडू आणि रवी राणा अखेर आमने सामने आले. ठिकाण होतं मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा बंगला. आमदार कडू आणि आमदार राणा यांच्यात सुरू असलेला वाद एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहचला असून, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची दोघांसोबत बैठक झाली. मध्यरात्री अडीच तास ही बैठक सुरू होती.

ADVERTISEMENT

आमदार बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात सुरु झालेला वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतलाय. शिंदे-फडणवीस यांनी मध्यस्थी करत रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यासोबत रविवारी मध्यरात्री चर्चा केली.

आमदार रवी राणांनी बच्चू कडूंवर टीका करताना ५० खोके घेतल्याचा आरोप केल्यानंतर कडू आणि राणा यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली. गुवाहाटीला जाण्यासाठी बच्चू कडू यांनी ५० खोके घेतल्याचा आरोप रवी राणांनी केला होता.

हे वाचलं का?

रवी राणांच्या आरोपानंतर बच्चू कडूंनी आक्रमक भूमिका घेतली. ५० खोके कुणी घेतले आणि कुणी दिले याचे पुरावे द्यावेत अन्यथा १ नोव्हेंबरला व्हिडीओ बाहेर आणू, असा इशारा दिला. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी यावर भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा वेगळा विचार करू असंही कडू म्हणाले होते.

राणांविरुद्ध बच्चू कडू दिवसेंदिवस आक्रमक होत असल्याचं दिसत असून, राणा-कडू वादावर तोडगा काढण्यासाठी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतलाय.

ADVERTISEMENT

रवी राणा-बच्चू कडू यांनी बैठकीनंतर बोलणं टाळलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंना फोन केला होता. तर दुसरीकडे रवी राणांनाही भेटीसाठी बोलावलं होतं. या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनीही लक्ष घातलं असून, रविवारी रात्री मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा निवासस्थानी या वादावर चर्चा झाली.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रवी राणा, आमदार बच्चू कडू हे या बैठकीत होते. मध्यरात्री बैठक संपल्यानंतर नेते बाहेर पडले. बाहेर पडताना रवी राणा म्हणाले की, यावर सकाळी बोलतो. तर बच्चू कडू यांनीही बैठकीनंतर माध्यमांशी बोलण्यापासून स्वतःला दूर ठेवलं.

बच्चू कडू-रवी राणा आज भूमिका मांडणार?

दरम्यान, रात्री वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर बच्चू कडू आणि रवी राणा हे आज पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. या भेटीनंतर दोन्ही आमदार भूमिका स्पष्ट करणार आहेत. बच्चू कडू आणि रवी राणा हे पत्रकार परिषद घेऊन गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकणार असल्याचं समजतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT