‘शेतकऱ्यांसमोर माफी मागणार का?’; उद्धव ठाकरेंवर भाजपकडून प्रश्नांची सरबत्ती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. परतीच्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी ठाकरे करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावरून भाजपनं काही प्रश्न उपस्थित केलेत. भाजपचे मुख्य प्रवक्त केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आलेल्या घोषणावरून ठाकरेंना लक्ष्य केलंय.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्ह्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करणार आहे. ठाकरेंच्या एकदिवसीय दौऱ्यावरून भाजपनं टीका केलीये. “उद्धव ठाकरे हे आज मराठवाडा दौऱ्यावर शेतकऱ्यांना भेटायला जात आहेत. जरूर जावे पण काही प्रश्नांची उत्तरे ही द्या…”, असं म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती केलीये.

“चिपळूण येथील अपरांत रुग्णालयात मागील वर्षी जुलै महिन्यात पूर परिस्थितीमुळे मरण पावलेल्या ८ कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना विशेष बाब म्हणून प्रत्येकी ४ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली होती. पुढे एक वर्ष उलटल्यानंतरही ही मदत मिळालीच नाही. तुमच्या पोकळ आश्वासनावर आपत्तीग्रस्तांनी आज प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर देणार?”, असा सवाल केशव उपाध्ये यांनी केलाय.

हे वाचलं का?

शिंदे बंडानंतर ठाकरे पहिल्यांदा मुंबईबाहेर; थेट औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार

“वारंवार संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन सर्व संबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल, अशी घोषणा आपण गेल्या वर्षी २५ जुलै रोजी केली होती. तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात पुढील वर्षभरात ही घोषणा कोणत्या बासनात बांधली?”, असा प्रश्न केशव उपाध्ये यांनी ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केलाय.

ADVERTISEMENT

शेतकऱ्याला सावरण्यासाठी तुमच्या सरकारने काय केलंं? -केशव उपाध्ये

“अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसण्याची गरज होती तेव्हा मुख्यमंत्री असूनही तुम्ही पुलावर अंथरलेल्या रेड कार्पेटवर उभे राहून मदतीची केवळ आश्वासने दिलीत. तेव्हा संकटात खचलेला शेतकरी पुढे वर्षभरात सावरावा यासाठी तुमच्या सरकारने काय केले?”, असं उपाध्ये यांनी म्हटलंय.

ADVERTISEMENT

“शेतकऱ्यांना वरदान ठरलेली जलयुक्त शिवार ही शेततळी योजना बंद करून शेतकऱ्याचे पाणी तोडल्यावर तुम्ही ४ फेब्रुवारी २०२१ रोजी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबविण्याची घोषणा केली होती. पुढच्या दीड वर्षात या घोषणेचे कागदी घोडे कोणत्या बासनात बांधले?”, असा प्रश्न उपाध्ये यांनी ठाकरेंना केलाय.

शेतकऱ्यांची माफी मागणार का? भाजपचा उद्धव ठाकरेंना सवाल

“जिरायत, बागायत जमिनीसाठी ₹ ६,८०० प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे. त्यामुळे आम्ही ती दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ₹ १०,००० देणार, फळपिकांसाठी १८,००० रुपये प्रति हेक्टर ऐवजी २५,००० रुपये प्रति हेक्टर (२ हेक्टरच्या मर्यादेत) मदत करण्यात येईल. असे २३ ऑक्टोबर २०२० रोजी जाहीर केले होते. दोन वर्षांनंतरही अनेक शेतकऱ्यांना ही मदत मिळालीच नाही. याची जबाबदारी घेऊन आज शेतकऱ्यासमोर माफी मागणार का?”, असा थेट सवाल उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना केलाय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT