मंत्री छगन भुजबळांना कोरोनाची लागण, लग्नसोहळ्यात होते हजर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाविकास आघाडी सरकारमधील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. भुजबळ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे. आपली प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे काही कारण नाही. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि मास्क व सॅनिटायजरचा वापर करावा असं आवाहन भुजबळ यांनी केलंय.

ADVERTISEMENT

दरम्यान छगन भुजबळांसह शरद पवारांनी रविवारी देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. त्यामुळे या लग्नसोहळ्यात भुजबळांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला कोरोनाची चाचणी करुन घ्यावी लागणार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील नेते व मंत्र्यांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. सर्वात आधी जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली. यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखही कोरोनाग्रस्त झाले. राज्याच्या आरोग्यव्यवस्थेवर लक्ष ठेवून असणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपेंनाही कोरोना झाला. याव्यतिरीक्त डॉ. राजेंद्र शिंगणे, एकनाथ खडसे यांच्यानंतर छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रविवारी जनतेशी संवाद साधताना येत्या ८ ते १० दिवसांनंतर लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असे संकेत दिले आहेत. अमरावती, अकोला या भागात जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन जाहीर केलं आहे. मुंबईतही ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळणाऱ्या सोसायट्या सील केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आता पुन्हा एकदा लॉकडाउनच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिला आहे. असंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT