एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना झटका! नांदेड जिल्ह्यात शिवसेनेला मोठं खिंडार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेतील ४० आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना ताब्यात घेण्याचे जोराचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे. एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शिवसेनेचे दोन जिल्हाप्रमुख, १२ तालुकाप्रमुख आणि ६ शहरप्रमुखांसह पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होणार आहे. त्यामुळे शिंदे नांदेड-हिंगोली दौऱ्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका देणार असल्याची चर्चा होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी (८ ऑगस्ट) नांदेड दौऱ्यावर असणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात शिवसेनेत अनेक महत्त्वाच्या घडामोडी होण्याची चिन्हं आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर हे शिंदे गटात सामील झाले होते.

खासदार हेमंत पाटील यांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेच्या दोन विद्यमान जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि शिवसेनेच्या विविध विभागाचे पदाधिकारी गटात सहभागी होणार आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, आनंद बोंढारकर एकनाथ शिंदे यांच्या गटात

जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांचा खासदार हेमंत पाटील यांची भेट घेतल्याचा फोटो समोर आला होता. या फोटोनंतर उमेश मुंडे यांची शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली. तर दुसरीकडे दुसरे जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर यांनीही हेमंत पाटील यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात सामील होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

शिवसेनेचे नांदेड शहरप्रमुख तुलजेश यादव यांनी सांगितलं की, १२ तालुकाप्रमुख आणि ६ शहरप्रमुखांसह असंख्य पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होणार आहेत. “पद देण्यासाठी आधी १० ते १५ लाख रुपये घेतले”, असा आरोप तुलजेश यादव यांनी शिवसेनेचे नांदेडचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्यावर केला आहे.

ADVERTISEMENT

उमेश मुंडे, आनंदराव बोंढारकर यांच्याबरोबर शेतकरी आघाडीचे प्रमुख प्रल्हाद इंगोले, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांचे सुपुत्र आकाश रेड्डी, अर्धापूर तालुकाप्रमुख संतोष कपाटे, सचिन येवले, मुदखेडचे संजय कुऱ्हे, सचिन माने, भोकरचे अमोल पवार, माधव बिन्नेवाड, जयवंतराव कदम उद्धव शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी शिंदे गटात दाखल होणार आहे. दरम्यान, शिंदे गटात दाखल होणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

युवा सेनेतही राजीनामा सत्र

एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही युवा पदाधिकाऱ्यांनी युवा सेनेचे राजीनामे दिले आहेत. युवा सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निष्ठावंतांना डावलून इतरांना पदे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. युवा सेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिल्याच्या बातम्या प्रसार माध्यमात आल्या होत्या. मात्र राजीनामा दिलेल्यांपैकी केवळ तीन पदाधिकारी आहेत, इतर कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला नसल्याचा दावा युवा सेना जिल्हाप्रमुख गजानन कदम यांनी केला आहे.

शनिवारी युवा सेनेची नांदेड जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. निष्ठवंताना डावलून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षात काम न केलेल्यांना संधी दिली, असा आरोप या युवा सैनिकांनी केला आहे. या युवा सैनिकांनी राजीनामे दिले असले, तरी आपण कुठल्याही पक्षात आणि इतर कुठल्याही गटात न जाण्याचा निर्णय या युवा सैनिकांनी घेतला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT