नागपुरात आरोग्य व्यवस्थेवर ताण, कोविड-नॉन कोविड रुग्णांना एकाच बेडवर उपचार
एकीकडे राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने विकेंड लॉकडाउनची घोषणा केली. सामान्य जनतेपासून ते उद्योगधंद्यांसाठी सरकारने नवे नियम आणि निर्बंध घालून दिले आहेत. राज्याच्या आरोग्यव्यवस्थेवर गेल्या काही दिवसांपासून किती ताण येतो आहे याचं चित्र नागपुरात पहायला मिळतंय. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शनिवारी रात्री एकाच बेडवर कोविड-नॉन कोविड रुग्णांवर उपचार केले जात असल्याचं धक्कादायक […]
ADVERTISEMENT

एकीकडे राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने विकेंड लॉकडाउनची घोषणा केली. सामान्य जनतेपासून ते उद्योगधंद्यांसाठी सरकारने नवे नियम आणि निर्बंध घालून दिले आहेत. राज्याच्या आरोग्यव्यवस्थेवर गेल्या काही दिवसांपासून किती ताण येतो आहे याचं चित्र नागपुरात पहायला मिळतंय. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शनिवारी रात्री एकाच बेडवर कोविड-नॉन कोविड रुग्णांवर उपचार केले जात असल्याचं धक्कादायक चित्र पहायला मिळालं. नागपुरात दर दिवशी वाढत असलेली रुग्णसंख्या आणि मृत्यूचं प्रमाण यामुळे शहरात रुग्णांवर उपचारासाठी बेडच उपलब्ध नसल्याचं पहायला मिळतंय. नागपुरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना वॉर्डात बेड रिकामे नसल्यामुळे दोन रुग्णांना सामान्य वॉर्डात एकाच बेडवर संपूर्ण रात्र काढावी लागली.

कोरोनाची लागण झाल्यानंतर होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण परिस्थिती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात धाव घेत आहेत. परंतू शहरात बेडची कमतरता भासत असल्यामुळे रुग्णांसमोर नवीन संकट तयार होताना दिसत आहे. शनिवारी रात्री नागपुरातील दोन पेशंटवर सामान्य वॉर्डात उपचार करण्यात आले. यावेळी बहुतांश रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असल्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसवरही ताण दिसत होता. त्यातच सामान्य वॉर्डात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनाही तपासणी झाल्यानंतर रात्री उशीरापर्यंत बेड मिळत नसल्यामुळे त्यांच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या.











