Aditya Thackeray: “गद्दारांना सगळं दिलं तरीही राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठी शिवसेनेला संपवू पाहात आहेत”
शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे दुभंगली आहे. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट पडले आहेत. शिंदे गटाने शिवसेनेवरही दावा सांगितला. त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगाच्या दारात गेला होता. निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही गोठवलं आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. अशात आदित्य ठाकरे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया […]
ADVERTISEMENT

शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे दुभंगली आहे. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट पडले आहेत. शिंदे गटाने शिवसेनेवरही दावा सांगितला. त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगाच्या दारात गेला होता. निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही गोठवलं आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. अशात आदित्य ठाकरे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. राक्षसी महत्वाकांक्षेपोटी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न होतो आहे. अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.
काय म्हटलं आहे आदित्य ठाकरे यांनी?
राक्षसी महत्त्वाकांक्षेच्या पोटी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. वार करायचे असतील तर समोरून या असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला आव्हान दिलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या चिन्हाबाबत आणि पक्षाच्या नावाविषयी जो निर्णय दिला त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी शिंदे गटावर जोरदार प्रहार केला.
शिवसेना संपवण्याचे प्रयत्न अडीच वर्षांपासून
खोके सरकारमधला गद्दारांचा एक गट आहे त्या गटाने राजकारण निर्ल्लजपणे खालच्या पातळीवर नेलं आहे. इतकं घाणेरडं राजकारण मी माहराष्ट्राच्या राजकारणात कधीही पाहिलं नव्हतं. शिवसेना संपवण्याचा जो असुरी आनंद त्यांना घ्यायचा आहे तो त्यांना कधीच मिळणार नाही. महाराष्ट्रातली जनते, देशाची जनता शिवसेनेच्या सोबत आहे. खोके सरकारने स्वतःला विकलं आहे. दोन-तीन नेत्यांच्या स्टेटमेंटवरून असं दिसतंय की त्यांना शिवसेना संपवायची आहे.
हिंमत असेल तर राजीनामा द्या
जे खोके सरकारमधे गेलेले गद्दार आमदार आहेत त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला पुन्हा सामोरं जावं. उद्धव ठाकरे यांनी या चाळीस आमदारांना सगळं काही दिलं. मात्र राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे ते पक्ष संपवायला निघाले आहेत. वार करायचे असतील तर समोरून या. पाठीत वार करू नका असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गट दिल्ली कोर्टात
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेनेने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. नैसर्गिक न्यायाच्या नियमानुसार निर्णय झाला नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. आपल्या तीन पर्यायी चिन्हांना संरक्षण मिळावे ही मागणीदेखील शिवसेनेने कोर्टात याचिकेद्वारे केली आहे. आमच्या विचारसरणीशी निगडित चिन्ह फ्री सिम्बॉल यादीत नाही. पण आम्हाला चिन्ह निवडण्याचा अधिकार आहे. त्यानुसारच पर्याय दिले आहेत असेही शिवसेनेने म्हटले आहे. दिल्ली हायकोर्ट या प्रकरणी काय आदेश देते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सोमवारी अथवा मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे.