भारताच्या अर्थव्यवस्थेत ‘डबल A व्हेरिएंट’ पसरतोय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चेला सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रपतींचे अभिभाषण सत्यापासून दूर आहे, त्यात बेरोजगारीचा उल्लेखही नाही. तर गेल्या वर्षी 3 कोटी तरुणांनी नोकऱ्या गमावल्या. गेल्या 50 वर्षांत भारतातील ही सर्वाधिक बेरोजगारी असल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे.

राहुल गांधी यांनी उद्योगपती अंबानी आणि अदानी यांनाही यावेळी लक्ष्य केले. राहुल यांनी या दोन उद्योगपतींना ‘डबल ए’ व्हेरिएंट (Double A Variant) असं म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे.

यावेळी राहुल गांधींनी दोन उद्योगपतींचा (मुकेश अंबानी आणि गौतम अदानी) उल्लेख केला. ते म्हणाले, ‘कोरोनाचे अनेक व्हेरिएंट येत आहेत. पण देशाच्या अर्थव्यवस्थेत ‘डबल ए’ व्हेरिएंट वाढत आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राहुल गांधी पुढे म्हणाले की, ‘एक व्यक्ती (मी नाव घेणार नाही) देशातील सर्व बंदरे, विमानतळ, वीज पारेषण, खाणकाम, हरित ऊर्जा, गॅस वितरण, खाद्यतेल… भारतात जे काही घडते, तिथे अदानीजी दिसतात. दुसरी बाजू पेट्रोकेमिकल्स, टेलिकॉम, रिटेल, ई-कॉमर्समध्ये अंबानींची मक्तेदारी आहे. त्यामुळे संपूर्ण पैसा हा काही निवडक लोकांच्याच हातात जात आहे.’ असं म्हणत राहुल गांधींनी अदानी-अंबानींवर निशाणा साधला.

वायनाडचे खासदार पुढे म्हणाले की, ‘आमच्या यूपीए सरकारने दहा वर्षांत 27 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आणि या सरकारने 23 कोटी लोकांना दारिद्र्यात ढकलले. मोदी सरकारने नोटाबंदी आणि जीएसटीसह असंघटित क्षेत्र संपुष्टात आणले. ज्यामुळे आता दोन भारत बनले आहेत एक गरीबांचा भारत आणि दुसरा श्रीमंतांचा भारत.’

ADVERTISEMENT

‘जोपर्यंत असंघटित क्षेत्र बळकट होत नाही, तोपर्यंत स्टार्टअप इंडिया, न्यू इंडियाचा नारा देऊन काहीही होणार नाही. दोन भारतांना जोडण्याचे काम पंतप्रधानांनी करावे.’

ADVERTISEMENT

‘राज्यघटनेत भारताला राष्ट्र नव्हे तर राज्यांचा संघ म्हटले आहे’

राहुल गांधी म्हणाले की, ;संविधानात भारताला राष्ट्र म्हटलेले नाही, भारत हा राज्यांचा संघ आहे. सरकारला इतिहासाचे ज्ञान नाही. संवादाशिवाय तुम्ही लोकांवर राज्य करू शकत नाही. प्रत्येक राज्याची स्वतःची संस्कृती, भाषा आणि इतिहास असतो. केंद्र राज्यांवर कोणताही दबाव आणू शकत नाही. आपला देश हा फुलांच्या गुलदस्त्यासारखा आहे. केंद्राच्या काठीने देश चालवता येत नाही.’

‘सरकारने शेतकऱ्यांचे ऐकलेच नाही’

कृषी कायद्यांबाबत राहुल गांधी म्हणाले की, ‘शेतकरी रस्त्यावर बसून राहिले, पण राजाने कोणाचाही आवाज ऐकला नाही. सरकारच्या चौकटीत शेतकर्‍यांना स्थान नाही.’ कायदे मागे घेण्याबाबत राहुल म्हणाले की, ‘हे सरकार संभ्रमात आहे.’

‘पंतप्रधान इस्रायलला गेले आणि त्यांनी पेगासस आणलं’

विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी पेगाससचा मुद्दा सभागृहात उपस्थित करतील, अशी अटकळ बांधली जात होती, तसेच घडलेही. पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून संस्था नष्ट केल्या जात असल्याचे यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान इस्रायलमध्ये गेले आणि त्यांनी पेगासस आणलं. ज्याचा वापर हेरगिरीसाठी केला जात आहे.

‘चीनचा प्लॅन स्पष्ट आहे’

केंद्र सरकारच्या धोरणामुळे पाकिस्तान आणि चीन एकत्र आले आणि आज भारत जगापासून अलिप्त आणि सर्व बाजूंनी वेढला गेला आहे. डोकलाम आणि लडाखबाबत चीनची योजना अतिशय स्पष्ट आहे. तर भारताच्या परराष्ट्र धोरणात अनेक चुका आहेत. त्यामुळे चीन आज भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान बनले आहे.

Pegasus : ‘मोदी सरकारनेच पेगासस खरेदी केलं’; न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्ताने देशात खळबळ

अर्थसंकल्पीय अधिवेशन ११ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे

31 जानेवारीपासून सुरू झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 11 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यानंतर, सत्राचा दुसरा भाग सुरू होईपर्यंत सुमारे एक महिन्याचा ब्रेक असेल. यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा भाग 14 मार्चपासून सुरू होईल जो 8 एप्रिलपर्यंत चालेल.

लोकसभेचे कामकाज दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालणार

संसदेची दोन्ही सभागृहे दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी चालतील. कोरोना महामारीमुळे लोकसभेच्या अधिवेशनाचे कामकाज 2 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालेल. तर राज्यसभेचे अधिवेशन दररोज सकाळी 10 वाजता सुरू होऊन दुपारी 3 वाजेपर्यंत चालेल. कोरोना महामारीमुळे विविध प्रकारचे कोव्हिड-19 प्रोटोकॉल देखील पाळले जातील.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT