आमदार बनसोडेंवर गोळीबार : प्रकरणाला नवं वळण, मुलगा सिद्धार्थवरही गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर बुधवारी झालेल्या गोळीबार प्रकरणाला आता वेगळं वळण लाभलं आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात परस्परविरोधी ३ गुन्ह्यांची नोंद केली असून यात आमदार बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडेविरुद्धही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यातला पहिला गुन्हा हा तानाजी पवारविरोधात तर उर्वरित दोन गुन्हे हे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे आणि पी.ए. सावन कुमार याच्याविरोधात दाखल करण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

त्यातच आमदार बनसोडे यांच्यावर गोळीबार करणारा तानाजी पवार आणि बनसोडे यांची एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यात आमदार बनसोडे तानाजी पवारला शिवीगाळ करत आहेत. याचसोबत आमदार बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ आणि पी.ए. यांच्याविरोधात कंपनीच्या कार्यालयात शिरुन लोकांना मारहाण करणे, तानाजी पवार यांचं अपहरण करुन मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भातलं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हातात लागलं आहे. बुधवारी दुपारी आमदार बनसोडेंवर गोळीबार झाला ज्यात ते सुखरुप बचावले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील कचरा उचलण्याचं कंत्राट अँथनी नावाच्या एका कंत्राटदाराकडे दिलं होतं. तानाजी पवार हा या कंत्राटदाराच्या कंपनीत कामाला होता. कचरा उचलण्याच्या कामात स्थानिक युवकांना संधी द्यावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून आमदार बनसोडे व कंपनीत चर्चा सुरु होती. आमदार बनसोडे यांनी तानाजी पवार याला फोन करुन, भेटायला का आला नाहीस असं विचारत शिवीगाळ करायला सुरुवात केली. ज्यानंतर बुधवारी तानाजी पवार आपल्या दोन साथीदारांसोबत आमदार बनसोडे यांच्या कार्यालयात गेला. काही वेळ चर्चा केल्यानंतर तानाजी पवारने बनसोडेंच्या दिशेने गोळीबार केला, ज्यात ते बालंबाल बचावले. पोलिसांनी या प्रकरणात तानाजी पवार याच्यासह संकेत जगताप आणि श्रीनीवास बिरासदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

यानंतर आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे ज्यात आमदार बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ, पी.ए. सावन कुमार १०-१२ माणसांसह ११ मे रोजी तानाजी पवार काम करत असलेल्या कंपनीत घुसून गोंधळ घालून कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यामुळे या प्रकरणात सिद्धार्थ बनसोडेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर आपलं अपहरण करुन डांबून ठेवत आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार तानाजी पवारने केली असल्यामुळे सिद्धार्थ बनसोडेविरुद्ध आणखी एक अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलीस आता कसा तपास करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT