रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कहर! जगबुडी, काजळी नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
-राकेश गुडेकर, रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात आजही पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. मध्यरात्रीपासून जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला. गुहागर, दापोली, खेड, चिपळूणमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. तर दक्षिण भागात म्हणजेच संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूरमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत 182.56 मिमी पावसाची नोंद झाली आहे. […]
ADVERTISEMENT

-राकेश गुडेकर, रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात आजही पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. मध्यरात्रीपासून जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला. गुहागर, दापोली, खेड, चिपळूणमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. तर दक्षिण भागात म्हणजेच संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूरमध्ये पावसाचा जोर अधिक आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासांत 182.56 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दापोली, मंडणगड, गुहागर, चिपळूण, लांजा या 5 तालुक्यांत 200 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. लांजा तालुक्यामध्ये 290 मिमी, मंडणगडमध्ये 200, दापोली 220, गुहागर आणि चिपळूणमध्ये 205 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जगबुडी, काजळी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
खेडमधील जगबुडी नदी आणि लांजा तालुक्यातील काजळी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर संगमेश्वरमधील शास्त्री, बावनदी आणि राजापूरमधील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
रघुवीर घाटात कोसळली दरड
रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात रविवारी दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यानं या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील 20 गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. सातारा जिल्ह्यातील 20 गावांना संपर्कासाठी असणारा हा एकमेव रघुवीर घाट आहे. विशेष म्हणजे 15 दिवसांत तिसऱ्यांदा अशी घटना घडली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट
हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. त्यापुढे तीन दिवस ऑरेंज अलर्ट राहणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा व सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे.
रेड अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे
हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे ८ ऑगस्ट रोजी राज्यातील रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. IMD ने या चारही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे
राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. यात मुंबई, ठाणे जिल्ह्यांपासून ते विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ८ ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
९ ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले जिल्हे
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, नांदेड, अमरावती या जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
१० आणि ११ ऑगस्ट रोजी या जिल्ह्यांत मुसळधार पावसांचा अंदाज
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत १० ऑगस्ट आणि ११ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. उर्वरित जिल्ह्यांतही मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असून, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.