माझ्या नवऱ्याची एक भानगड काढा, मी राजकारण सोडेन; चित्रा वाघांचं खुलं आव्हान
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक प्रचारात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपत घमासान सुरू आहे. प्रचाराच्या रिंगणातून एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच रविवारी रात्री झालेल्या दगडफेकीच्या घटनेनं भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर हल्ला चढवला आहे. त्याला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी उत्तर दिल्यानंतर चित्रा वाघ यांनी थेट सतेज पाटलांनाच खुलं आव्हान दिलं आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीवर भाजपनं लक्ष्य केंद्रीत […]
ADVERTISEMENT

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक प्रचारात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपत घमासान सुरू आहे. प्रचाराच्या रिंगणातून एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच रविवारी रात्री झालेल्या दगडफेकीच्या घटनेनं भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर हल्ला चढवला आहे. त्याला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी उत्तर दिल्यानंतर चित्रा वाघ यांनी थेट सतेज पाटलांनाच खुलं आव्हान दिलं आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीवर भाजपनं लक्ष्य केंद्रीत केलं असून, ही निवडणूक काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. दरम्यान, सध्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ प्रचारानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. प्रचार सभा घेत असताना रविवारी मुक्त सैनिक वसाहतीमध्ये दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यावरून चित्रा वाघांनी सतेज पाटील आणि आघाडी सरकारवर टीका केली.
घटनेसंबंधी माहिती दिल्यानंतर सतेज पाटील यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती. सतेज पाटील यांनी केलेल्या टीकेला आता चित्रा वाघ यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना उत्तर दिलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारनं सुशासन राबवलं. सर्वसामान्य नागरिक, महिला यांच्या हिताचा नेहमी विचार केला. म्हणूनच उत्तर प्रदेशसह ४ राज्यातील जनतेनं भाजपला विजयी केलं. महाराष्ट्राची मानसिकताही वेगळी नाही, हे पंढरपूरच्या निकालावरून दिसून आलंय. त्यामुळं कोल्हापुरातही सत्यजित कदम निश्चितच विजयी होतील,” असा चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.
“पालकमंत्री जिल्ह्यात दहशत माजवत आहेत. दबावाचं राजकारण खेळतायेत. मात्र तुम्ही पालक आहात, मालक नाही आहात. तुम्ही म्हणजे कोल्हापूर नव्हे,” अशा शब्दात चित्रा वाघ यांनी पालकमंत्र्यांवर पलटवार केला.









