लावणीचा सुरेल सूर विसावला! लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांचं निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सुरेल सुराने संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या सुलोचना चव्हाण यांचं निधन झालं. त्या ९२ वर्षांच्या होत्या. मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी वृद्धपकाळाने त्यांचं निधन झालं.

ADVERTISEMENT

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा परिचय

सुलोचना श्यामराव चव्हाण यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव सुलोचना महादेव कदम असे होते. त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले. वयाच्या दहाव्या वर्षी सुलोचना कदम यांचे पहिले गाणे ध्वनिमुद्रित झाले.

‘कृष्णसुदामा’ या चित्रपटासाठी त्यांनी सर्वप्रथम मराठी गाणे गायले. या चित्रपटाच्या श्यामसुंदर पाठक व भट्टाचार्य या संगीत दिग्दर्शकांच्या जोडीने त्यांना प्रथम गायनाची संधी दिली. वयाच्या अकराव्या वर्षापासून सुलोचना चव्हाण यांनी पार्श्वगायनास सुरुवात केली.

हे वाचलं का?

संगीताचे कोणतेही शिक्षण नसताना आवड म्हणून सुलोचना चव्हाण संगीत क्षेत्राकडे वळल्या. कोणत्याही गुरूच्या तालमीत तयार झालेल्या नसताना त्यांच्याकडे देण्यात आलेल्या गाण्याचा परिपूर्ण अभ्यास करून त्या गाण्याचा ताल, शब्द सर्व समजून घ्यायच्या. प्रत्येक तालमीच्या वेळी ते गाणे संगीतकाराकडून समजून घेण्याकडे त्यांचा विशेष कल होता. मराठीबरोबर सुलोचना चव्हाण यांनी अनेक हिंदी, पंजाबी व गुजराती गाणीही म्हटली आहेत.

वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचे कोल्हापूरच्या श्यामराव चव्हाण यांच्याशी लग्न झाले. विशेष म्हणजे श्यामराव यांनाही संगीताची अत्यंत आवड होती व संगीत शिक्षण घेतलेले नसताना कुठले गाणे कसे म्हणायचे, कुठल्या जागी शब्द तोडायचे, गाण्याची तान कशी घ्यायची, याची त्यांना माहिती होती.

ADVERTISEMENT

श्यामराव तबलाही उत्तम वाजवीत. सुलोचना यांना शब्दांचे अर्थ समजून लावणी कशी गायची याचे शिक्षण श्यामराव चव्हाण यांनीच दिले. लावणी गाण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण सुलोचना चव्हाण यांनी आपल्या पतीकडूनच घेतले, म्हणूनच आपल्या पतीलाच त्या गुरू मानत.

ADVERTISEMENT

‘खेळताना रंग बाई होळीचा’ लावणी केली अजरामर

सुलोचना चव्हाण यांनी १९६२ मध्ये ‘रंगल्या रात्री’ या चित्रपटासाठी पहिली लावणी गायली. ती जगदीश खेबूडकर यांनी लिहिली होती व वसंत पवार यांनी संगीत दिले होते. ‘नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची’ या लावणीनंतर सुलोचना यांचे सर्व आयुष्यच बदलून गेले.

या लावणीनंतर मात्र त्यांनी ‘खेळताना रंग बाई होळीचा’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला’, ‘राग नका धरू सजना’, ‘पाडाला पिकला आंबा’, ‘लाडे लाडे बाई करू नका’, अशा एकापेक्षा एक ठसकेबाज लावण्या गायल्या.

सुलोचना चव्हाण यांनी स्वतःला समाजकार्यातही झोकून दिले आहे. कार्यक्रमातून मिळणाऱ्या मानधनातील मोठा हिस्सा त्या धार्मिक संस्थांसाठी किंवा एखाद्यासाठी मदतनिधी उभा करण्यासाठी वापरतात, तसेच कार्यक्रम व पुरस्कारांतून मिळणाऱ्या रकमेचा काही हिस्सा गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

आचार्य अत्रे यांनी सुलोचना चव्हाण यांना दिली होती लावणी सम्राज्ञी उपाधी

सुलोचना यांनी लावणीमधला ठसका व रुबाब बरोबर समजून घेतला आणि काही वर्षांतच त्या लावणीच्या अनभिषिक्त सम्राज्ञी बनल्या. आचार्य अत्रे यांनी सर्वप्रथम दिलेली ‘लावणी सम्राज्ञी’ ही उपाधी त्यांनी आयुष्यभर सांभाळली.

सुलोचना यांचा मोठा मुलगा जय याचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांचा दुसरा मुलगा विजय उत्कृष्ट ढोलकी व तबलावादक आहे. प्रेमनाथ, एस.एन. त्रिपाठी, अविनाश व्यास, चित्रगुप्त, वसंत देसाई, मोतीराम, सोनिक ओमी, के. दत्ता, प्रेमचंद प्रकाश अशा जुन्या जमान्यातील संगीतकारांच्या चित्रपटांत त्यांनी गाणी गायली आहेत.

‘मल्हारी मार्तंड’साठी मिळालेला सर्वोत्कृष्ट लावणी गायिकेचा सन्मान, ‘पी. सावळाराम-गंगा जमना’ पुरस्कार आणि राज्यशासनामार्फत २०१० या वर्षासाठी संगीत क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर’ पुरस्कार त्यांना मिळाला.

लावणीचा बाज आणि त्याची लोकप्रियता सुलोचना यांच्यामुळे टिकून राहिली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सुलोचना चव्हाण यांनी ‘माझे गाणे माझे जगणे’ हे आत्मचरित्र लिहिले असून लावणीच्या संदर्भातील अनेक आठवणी त्यांत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT