Layer’r Shot Ad : बॉडी स्प्रेच्या जाहिरातींवर गँगरेपला प्रोत्साहन देण्याचा आरोप?, केंद्राच्या नोटीसमध्ये काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कंपन्यांकडून वस्तूंच्या जाहिराती करणं आणि त्या वादात सापडणं नवं नाही. याच वादात आता लेयर शॉट बॉडी स्प्रेच्या दोन जाहिराती सापडल्या आहेत. या जाहिरातींवरून बॉलिवूड कलाकारांसह अनेकांनी फटकारलं आहे. संतप्त प्रतिक्रिया उमटताच केंद्राने तातडीने यूट्यूब आणि ट्विटरला नोटीस बजावली असून, त्या डिलीट करण्यास सांगितलंय.

ADVERTISEMENT

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने शनिवारी लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या युट्यूब आणि ट्विटरला नोटीस बजावली. लेअर शॉट बॉडी स्प्रे च्या दोन जाहिराती प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. दोन्ही जाहिराती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर केंद्राने हे आदेश दिले.

नेमकं प्रकरण काय?

हे वाचलं का?

लेअर शॉट बॉडी स्प्रेच्या दोन जाहिराती चर्चेत आल्या आहेत. जाहिरातीमधील दृश्ये आणि संवाद सामूहिक बलात्काराच्या विकृतीला प्रोत्साहन देणारे असल्याचं सांगत सिने कलाकारांसह लोकांनी संताप व्यक्त केला.

पहिल्या जाहिरातीत काय?

ADVERTISEMENT

लेअर शॉट बॉडी स्प्रेच्या दोन जाहिराती प्रदर्शित झाल्या. यातील पहिल्या जाहिरातीत मॉलमध्ये चार तरुण उभे आहेत आणि शॉट बॉडी स्प्रेच्या एका बाटलीकडे बघून ते बोलताना दाखवले आहेत. ज्याठिकाणी एक तरुणी शॉटची बाटली असलेल्या रॅकजवळ वस्तू बघण्यासाठी वाकलेली असते.

ADVERTISEMENT

याचवेळी त्या चौघांपैकी एक तरुण म्हणतो की, ‘ही एक आणि आपण चौघे.’ त्यावर दुसरा तरुण म्हणतो ‘मग शॉट कोण घेणार?’ हा संवाद ऐकून तरुणी दचकते आणि घाबरून मागे बघते. त्यानंतर ते तरुण शॉटच्या बाटली बघत असल्याचं बघून ती शांत होते.

दुसऱ्या जाहिरातीत काय?

शॉट बॉडी स्प्रेची दुसरी जाहिरात एका बेडरूममध्ये शूट करण्यात आलीये. एक तरुण-तरुणी बेडवर बसलेले आहेत. त्याचवेळी चार तरुण त्या रुममध्ये येतात. तरुणीसोबत बसलेल्या तरुणाला बाहेरून आलेल्या तिघांपैकी एकजण म्हणतो, शॉट मारलाय वाटतं?, त्यावर तरुणीसोबत बसलेला तरुण हो, मारला ना, असं म्हणतो.

त्यानंतर बाहेरून आलेल्या चार तरुणांपैकी एक जण म्हणतो आता आमची बारी. त्यानंतर तो पुढे जाऊन टेबलवर ठेवलेली शॉट बॉडी स्प्रेची बाटली उचलतो.

केंद्राने पत्रात काय म्हटलंय?

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने ट्विटर आणि यूट्यूबला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ नैतिकता आणि सभ्यतेच्या अनुषंगाने चांगला नाही. करण्यात आलेलं चित्रीकरण महिलांसाठी धोकादायक आहे.

जाहिरातींच्या आशयातून माहिती तंत्रज्ञान (इंटरमीडिअरी गाईडलाईन्स आणि डिजिटल मीडिया आचार संहिता) कायद्यातील नियम ३ (१) (ब) (ii) चं उल्लंघन होत आहे. नियमानुसार लिंगधारित अपमानास्पद वा त्रासदायक ठरेल अशी माहिती प्रदर्शन, अपलोड, प्रकाशित, जपून ठेवणे अथवा अपडेट करून नये, असं केंद्राने म्हटलंय.

टिव्हीवर प्रसारित करण्यात आलेल्या या जाहिराती अॅडव्हरटायझिंग स्टँडर्ड कॉउन्सिल ऑफ इंडियाने (ASCI) केबल टेलिव्हिजन नेटवर्क १९९४ मधील नियम ७ (२) (ix) नुसार मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन करणाऱ्या आहेत, असं म्हटलं आहे. ASCI ने या जाहिराती तत्काळ हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

कलाकारांसह महिला आयोगाच्या अध्यक्षाही संतापल्या

“अशा घाणेरड्या बॉडी स्प्रेच्या जाहिरातीसाठी ज्यात सामूहिक बलात्काराच्या अंगाने विचार करून, स्वीकारण्यासाठी आणि त्या बनवण्यासाठी विकृत विचार असणाऱ्याचीच गरज आहे. हे लज्जास्पद आहे,” अशा शब्दात फरहान अख्तरने संताप व्यक्त केला आहे.

अभिनेत्री रिचा चढ्ढानेही यावरून टीका केली आहे. “ही जाहिरात अपघात नाही. एक जाहिरात बनवण्यासाठी कोणताही ब्रॅण्ड अनेक टप्प्यातून जात असतो. क्रिएटिव्ह, स्क्रिप्ट, एजंन्सी, ग्राहक, कास्टिंग… बलात्कार एक मस्करी आहे, असं प्रत्येकजण विचार करतो का?,” असं रिचाने म्हटलं आहे.

स्वरा भास्करनेही या जाहिरातींवर संताप व्यक्त केलाय. हैदराबादमध्ये गाडीत एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा उल्लेख करत स्वराने ही जाहिरात अत्यंत घृणास्पद पद्धतीने दाखवण्यात आलीये, असं म्हटलं आहे.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही लेअर शॉट परफ्यूमच्या जाहिरातींवरून कंपनीच्या मालकांना जबाबदार ठरवलंय. स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केलीये.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT