Malin: काळीज पिळवटून टाकणाऱ्या माळीण दुर्घटनेला 7 वर्ष पूर्ण, माळीणवासियांची ठाकरे सरकारला ‘ही’ विनंती
माळीण दुर्घटनेला 30 जुलै 2021 रोजी 7 वर्ष पूर्ण होत आहेत. दुर्घटनेपासून सतत चर्चेत राहिलेलं माळीण पुन्हा एकदा चर्चेत आलं ते रायगडमधील तळीयेमुळे. राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नातून साकारलं गेलेलं आणि अल्पावधीत उभं राहिलेलं राज्यातलं पहिलं पुनर्वसन झालेलं स्मार्ट ग्राम म्हणून माळीणची नवी ओळख पुढे आली आहे आणि आता पुन्हा माळीण गावची चर्चा सुरू झाली […]
ADVERTISEMENT

माळीण दुर्घटनेला 30 जुलै 2021 रोजी 7 वर्ष पूर्ण होत आहेत. दुर्घटनेपासून सतत चर्चेत राहिलेलं माळीण पुन्हा एकदा चर्चेत आलं ते रायगडमधील तळीयेमुळे. राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नातून साकारलं गेलेलं आणि अल्पावधीत उभं राहिलेलं राज्यातलं पहिलं पुनर्वसन झालेलं स्मार्ट ग्राम म्हणून माळीणची नवी ओळख पुढे आली आहे आणि आता पुन्हा माळीण गावची चर्चा सुरू झाली आहे. याचनिमित्त एक विशेष रिपोर्ट.
30 जुलै 2014 पुणे जिल्ह्यातील माळीण गाव डोंगरकडा कोसळून मातीखाली गाडलं गेलं होतं. त्यामुळे अवघ्या माळीण गावावर शोककळा पसरली होती. पण त्यानंतर मदतीचे ओघ सुरु झाले. लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन माळीणला तात्पुरतं सावरलं. सुरवातीला जागा उपलब्ध न झाल्याने पाहिलं वर्ष वाया गेलं. पण जागा उपलब्ध झाल्यावर पुढील 3 वर्षात हे गाव वेगाने उभारलं गेलं आहे.
फोरजी आणि वाय-फायच्या गप्पा मारणारऱ्या आणि प्रगत समजल्या जाणाऱ्या देशात या माळीण दुर्घटनेची बातमी अनेक तास झाले तरी ना मीडियाकडे पोहचली होती ना प्रशासनाकडे. त्यामुळे मदतही उशिरा पोहचली. या घटनेची माहिती तालुका प्रशासनापर्यंत पोहचवण्यासाठी येथून जाणाऱ्या एसटी बसची मदत घ्यावी लागली होती. आजही ती वेदनादायक घटना येथील गावकरी विसरलेले नाहीत. महाड मधील तळीये गावात घडलेल्या घटनेमुळे माळीणमधील नागरिकांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
मधल्या काळात काहींची लग्न होऊन दोनाचे चार हात झाले. तर काहींच्या घरात पाळणाही हलला. या घटनेत वाचलेला सर्वात लहान असलेला रुद्र आता 7 वर्षाचा झाला आहे. या दुर्घटनेत रक्ताच्या नात्यांना मुकलेल्या ग्रामस्थांनी तब्बल पावणेतीन वर्ष ऊन, वारा व पावसाशी लढा देत आपल्या जिवलगांच्या विरहात पत्र्याच्या शेडमध्ये आपला संसार थाटला.









