विधान परिषद निवडणूक: काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, ठाकरेंच्या उमेदवाराबाबत केली मोठी घोषणा
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार न देण्याची भूमिका जाहीर केली आहे. तसंच शिवसेना UBT पक्षाचे उमेदवार अंबादास दानवे यांना पाठिंबा देणार असल्याचेही घोषित केले.
ADVERTISEMENT

मुंबई: शिवसेना UBT पक्षाने काल (29 एप्रिल) विधान परिषद निवडणुकीसाठी अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीत मात्र चलबिचल पाहायला मिळाली होती. शिवसेना UBT ने कोणतीही चर्चा न करता उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. एवढंच नव्हे तर या निवडणुकीत काँग्रेस आपला उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहे असंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसने एक मोठा निर्णय घेतला.
विधान परिषद निवडणुकीत जर काँग्रेसने उमेदवार दिला तर महाविकास आघाडीत निवडणुकीदरम्यान, फूट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अशावेळी शिवसेना UBT पक्षाचे नेते आणि NCP शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी आज (30 एप्रिल) चर्चा केली.
आज सकाळपासूनच या तीनही पक्षाच्या नेत्यांची चर्चा सुरू होती. अखेर काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेत हर्षवर्धन सकपाळ यांनी काँग्रेस उमेदवार देणार नसल्याचं जाहीर केलं. ज्यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पाहा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले?
'नुकतंच राज्यसभेवर महाराष्ट्राचे अनुभवी नेतृत्व पवार साहेब गेले.. त्यांना सर्वांनी पाठवलं. आताच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची जी भूमिका होती आणि इतर मित्र पक्षाची जी भूमिका होती.. किंबहुना.. शिवसेना UBT पक्षाची जी भूमिका होती की, उद्धवजींनी महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून विधान परिषदेत जावं. जवळपास आमची सर्वांची तीच धारणा असताना काल त्यांनी त्यांचा अंतरात्माचा जो आवाज आहे. त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की, मी जाणार नाही.'









