Mla Disqualification : “ठाकरेंना न्याय मिळेल, कारण…”, शरद पवारांनी त्या मुद्द्यावर ठेवलं बोट
Mla Disqualification Case latest News : २० जून २०२२ रोजीच्या रात्री राजकीय हालचाली झाल्या आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदेंसह ३० पेक्षा जास्त आमदार आधी सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी २२ जून रोजी बैठक बोलावली. त्यासाठी व्हीप जारी करण्यात आला. बैठकीला गैरहजर असणाऱ्या १६ आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे करण्यात आली. तेव्हापासून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष आता अंतिम टप्प्यात आला. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं असलं, तरी मूळ शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची, हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हा ऐतिहासिक निकाल असणार आहे. यासंदर्भातील सर्व अपडेट्स तुम्हाला येथे वाचायला मिळतील…
ADVERTISEMENT
लाइव्हब्लॉग बंद
- 09:05 PM • 10 Jan 2024
Shiv Sena MLA Disqualification: शरद पवार म्हणाले, निकालामुळे उद्धव ठाकरेंना संधी
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे. त्यांना गटनेते पदावरून हटवण्याचे अधिकार उद्धव ठाकरेंना नव्हते, असे नमूद करत निकाल दिला. त्याबरोबर व्हीप बजावण्यात आला होता, तो संबंधित आमदारांना पोहोचला होता, हे दोन्ही गट सिद्ध करू शकले नाही, असे सांगत नार्वेकर यांनी दोन्ही बाजूंच्या अपात्रता याचिका फेटाळून लावल्या. - 07:20 PM • 10 Jan 2024
विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया
ठाकरे गटाच्या राज्यसभेतील खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर टीका केली. या निकालावरून त्यांनी थेट मोदी-शाहांवर टीकास्त्र डागलं. त्या म्हणाल्या, "मला या निर्णयाबद्दल आश्चर्य वाटत नाही. आपण असं ऐकलं आहे की, वही होता है जो मंजूरे खुदा होता है, पण २०१४ नंतर नवीन पायंडा सुरू झाला आहे. वही होता है जो मंजूरे खुदा ए नरेंद्र मोदी और अमित शाह होता है. तेच आपण महाराष्ट्रात घडताना बघत आहोत. तत्वाशी तडजोड झालीये हे खूप दुर्दैवी आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्याला 'बेकायदेशीर' आणि 'असंवैधानिक' म्हटले होते ते 'कायदेशीर' बनवले जात आहे. हे दुर्दैव आहे." - 07:04 PM • 10 Jan 2024
ठाकरे गटातील आमदारांना दिलासा!
उद्धव ठाकरे गटातील आमदारांवर अपात्रता कारवाई करण्यासाठी भरत गोगावले यांनी दाखल केली होती. मात्र, त्यांना व्हीप मिळाल्याचे पुरावे ते सादर करू शकले नाही, त्यामुळे ठाकरे गटातील आमदारांवर अपात्रता कारवाई होऊ शकत नाही, असे सांगत नार्वेकरांनी याचिका फेटाळून लावली. - 06:55 PM • 10 Jan 2024
एकूण दाखल झालेल्या 34 याचिकांचे सहा गट तयार केले असून सहा याचिका होत्या
शिवसेना ठाकरे गटाकडून दाखल झालेल्या चार आणि शिवसेना शिंदे गटाकडून दाखल झालेल्या 2 दोन याचिकांचा यामध्ये समावेश आहेएकूण 6 याचिका - 1) पहिल्या बैठकीत हजर राहिले नाहीत (ठाकरे गट याचिका) 2) दुसऱ्या बैठकीला हजर राहिले नव्हते (ठाकरे गट याचिका) 3) विधानसभा अध्यक्ष निवडीमध्ये व्हीप मोडला (ठाकरे गट याचिका) 4) बहुमत चाचणीत व्हीप विरोधात मतदान ( शिंदे गट याचिका) 5) शिंदे गटाने बजावलेला व्हीप मोडल्या संदर्भात याचिका (शिंदे गट याचिका) 6) अपक्ष आमदार गट याचिका (ठाकरे गट याचिका) - 06:54 PM • 10 Jan 2024
शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रता कारवाई होऊ शकत नाही -नार्वेकर
शिंदे गटाला व्हीप वा नोटीस बजावण्यात आली होती, हे सिद्ध करण्यात उद्धव ठाकरे गट अपयशी झाला. कोणताही व्हीप मिळाला नसल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे. सुनील प्रभू यांनी व्हॉट्सअप द्वारे व्हीप बजावला असे म्हटले मात्र हे ते सिद्ध करू शकले नाही. एकनात शिंदेंच्या पीएला बैठकीचा मेसेज मिळल्याचे कथित स्क्रीनशॉटवरून हे सिद्ध होत नाही.सुनील प्रभू यांना बैठक बोलवण्याचा अधिकार नाही. त्यामुळे शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्या प्रकरणात अपात्र घोषित करण्यासाठी पात्र ठरवलं जाऊ शकत नाही. बैठकीला अनुपस्थित राहणे, हे १०व्या परिशिष्टानुसार अपात्रता ओढवून घेत नाही. बैठकीला अनुपस्थित राहणे पक्षाविरोधात जाणे असे होत नाही. भाजपला मदत केल्याचे माध्यमांच्या वृत्ताशिवाय कोणतीही पुरावे नाही. माध्यमातील वृत्त पुरावे म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे शिंदे गटातील १६ आमदारवर अपात्रता कारवाई करता येत नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळत आहे. - 06:24 PM • 10 Jan 2024
सुनील प्रभूंना बैठक बोलवण्याचा अधिकारच नाही -नार्वेकर
एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. - 06:16 PM • 10 Jan 2024
शिंदे गटच खरी शिवसेना; उद्धव ठाकरेंना जबर झटका!
शिवसेनेत फूट झाल्यानंतर शिंदे गटाकडे बहुमत असून, शिंदे गटच मूळ शिवसेना आहे, असे राहुल नार्वेकरांनी सांगितले. - 06:12 PM • 10 Jan 2024
त्या सात ठरावांवर विश्वास ठेवू शकत नाही, कारण...; नार्वेकरांनी ठाकरे गटाचा युक्तिवाद फेटाळला
Shiv Sena MLA Disqualification: महेश जेठमलानी यांनीही आपल्या युक्तिवादात शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय सर्वोच्च आणि सर्वत्र मान्य असल्याचे सांगितले. 25 जून 2022 रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात मंजूर झालेल्या सात ठरावांमध्ये फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांनाही माझ्यासमोर आणले. त्यावर संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणजेच प्रतिनिधीगृहाऐवजी केवळ सचिव विनायक राऊत यांनी स्वाक्षरी केली होती. राष्ट्रीय कार्यकारिणीचा सदस्य नसलेल्या राहुल शेवाळे यांनी अरविंद यांच्यासाठी साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे ही कागदपत्रे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. - 06:05 PM • 10 Jan 2024
उद्धव ठाकरेंचा व्हीप वैध नाही -नार्वेकर
Shiv Sena MLA Disqualification: उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपदावरून हटविण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांचा दावा मान्य करता येणार नाही. त्यांच्या गटाचा व्हीपही वैध नाही. पक्षांतरविरोधी कायद्यातील तरतुदींचाही दहाव्या अनुसूचीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. एखाद्या पक्षात नेतृत्वाबाबत वाद निर्माण झाल्यास नेतृत्व रचनेकडे पाहिले जाते. उद्धव ठाकरे गटाला नेतृत्व रचनेचा पाठिंबा नव्हता. - 06:02 PM • 10 Jan 2024
सर्वाधिकार पक्षप्रमुखाला देणं लोकशाहीसाठी घातक -नार्वेकर
- पक्षप्रमुखाचं मत याच्याशी मी सहमत नाही, पक्षप्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम असणार, पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाहीत. - 06:00 PM • 10 Jan 2024
ठाकरेंना धक्का! नार्वेकरांचे महत्त्वाचे निरीक्षण
निकालात नार्वेकरांनी म्हटले आहे की, "शिवसेनाप्रमुख हे शिवसेनेतलं सर्वोच्च पद आहे, कार्यकारिणीत 19 सदस्य आहेत. ( घटनेनुसार ) 2018 च्या बदलानुसार शिवसेनेत 13 सदस्य आहेत, पक्षप्रमुख हे सर्वोच्च पद आहे, असा दावा करण्यात आला. मात्र ते ग्राह्य नाही. कारण ते शिवसेनेच्या ( 1999 ) घटनेशी जुळत नाही. उद्धव ठाकरे गटाने केलेल्या दाव्याला पुष्टी करणारे कुठलेही कागदोपत्री पुरावे मिळत नाहीत. शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुख पद नाही, त्यामुळे त्यांच्याकडे पक्षाबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून काढण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे नाहीत (घटनेनुसार). शिवसेना पक्षप्रमुख कोणालाही पदावरून काढू शकत नाहीत, उद्धव ठाकरेंनी धरलेला निर्णय ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंची हकालपट्टी मान्य करता येत नाही. - 05:54 PM • 10 Jan 2024
Shiv Sena MLA Disqualification : पक्षाध्यक्ष कोण?
नार्वेकर म्हणाले, "2018 मध्ये घटनेत अध्यक्षांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा करण्यात आला, तर 1999 मध्ये अध्यक्षांना शिवसेनाप्रमुख असे संबोधण्यात आले. शिवसेनाप्रमुख हे केवळ दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे असलेले पद असल्याचे यूबीटीने म्हटले आहे. पक्षाध्यक्षांना कसे संबोधित केले जाते, हे अप्रासंगिक असून पक्षाध्यक्ष कोण आहे हे महत्त्वाचे आहे, असा युक्तिवाद कामत यांनी केला. 2018 ची नेतृत्व रचना शिवसेनेच्या घटनेशी सुसंगत नव्हती. 2018 ची नेतृत्व रचना पदाधिकाऱ्यांच्या तीन श्रेणींना प्रदान करते. घटनेत पदाधिकार्यांच्या तीन श्रेणींचीही तरतूद आहे पण या श्रेणी वेगळ्या आहेत. - 05:51 PM • 10 Jan 2024
Shiv Sena MLA Disqualification verdict Live : आमदार अपात्रता प्रकरण निकाल
सुनावणी दोन प्रश्न निर्माण झाले1. 2018 ची नेतृत्व रचना शिवसेनेच्या घटनेशी सुसंगत आहे की नाही?2. प्रमुख किंवा बहुसंख्य नेत्यांची इच्छा पक्षाची इच्छा प्रतिबिंबित करते का? - 05:48 PM • 10 Jan 2024
Shiv Sena MLA Disqualification: खरी शिवसेना कोणती?
शिवसेनेची 2018 ची सुधारित घटना वैध मानली जाऊ शकत नाही कारण ती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डमध्ये नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मी इतर कोणत्याही घटकाचा शोध घेऊ शकत नाही, ज्यावर संविधान वैध आहे. नोंदीनुसार, मी वैध घटना म्हणून शिवसेनेच्या 1999 च्या घटनेवर अवलंबून आहे. २०१८ मध्ये शिवसेनेच्या घटनेमध्ये कोणतीही दुरुस्ती झाली नाही. त्याचबरोबर पक्षात संघटनात्मक कोणत्याही निवडणुकाही झाल्या नाही. खरी शिवसेना आणि शिवसेनेच्या घटनेवरुनच ठरणार, नेते आणि पदांची रचना यावरून खऱ्या पक्षाचा निर्णय होणार, असे नार्वेकरांनी निकालात म्हटले आहे. - 05:41 PM • 10 Jan 2024
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण निकाल
निवडणूक आयोगानं दिलेली घटना मी ग्राह्य धरत, ठाकरे गटानं केलेली घटनादुरुस्ती ही नियमबाह्य.. 2023 मध्ये शिंदे गटाने दिलेली घटना मी ग्राह्य धरतो. - 05:35 PM • 10 Jan 2024
उद्धव ठाकरेंची घटना दुरुस्तीची आयोगाकडे नोंदच नाही -नार्वेकर
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंनी सादर केलेली पक्षाची घटना दुरुस्ती नाकारली. तर एकनाथ शिंदे यांनी सादर केलेली पक्षाची घटना वैध मानली. ते म्हणाले, "निवडणूक आयोगानं घटनेची एक प्रत दिली, पण त्यावर तारीख नाही. म्हणून शिवसेनेने जी घटना दिली, ती मान्य नाही.. दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत. 2018 ला पक्षाच्या घटना जी दुरुस्ती करण्यात आली ती चूक आहे."ठाकरे गटाने २०१८ मध्ये घटना दुरुस्ती केल्याचे सुनावणी म्हटले होते. मात्र, असे कोणतीही घटना दुरुस्तीची नोंद निवडणूक आयोगाकडे नसल्याचे नार्वेकरांनी निकाल देताना म्हटले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. - 05:28 PM • 10 Jan 2024
शिवसेना घटनेबद्दल निकालात काय?
1999 ची घटना विचारात घ्यावी लागेल कारण 2018 ची घटना ECI च्या आधी नव्हती. - 05:26 PM • 10 Jan 2024
राहुल नार्वेकरांकडून निकालाचं वाचन
खरी शिवसेना कोणती? आणि व्हीप कोण? हा माझ्यासमोर मुद्दा होता. - 04:49 PM • 10 Jan 2024
विधानभवनात काय सुरूये... पहा महत्त्वाच्या अपडेट्स
विधानसभा अध्यक्ष अद्यापही त्यांच्या दालनात, निकाल अधिकाऱ्यांसोबत गेली 15 मिनिटं नार्वेकरांची खलबतं - 04:06 PM • 10 Jan 2024
कायद्यानुसार न्याय मिळेल याची आम्हाला आधीपासूनच अपेक्षा नव्हती -वडेट्टीवार
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, "वरून जे लिहून पाठवलं जाईल, तो निकाल येणे अपेक्षित आहे. कायद्यानुसार किंवा कायद्याच्या चौकटीत बसेल अशा प्रकारच्या निकालाची अपेक्षा आम्हाला पूर्वीपासूनच नव्हती. असं आहे की प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री हे अध्यक्षांकडे जातात. न्यायधीश जर आरोपीकडे जात असेल, तर चुकीचं आहे. निकालाच्या अगोदर जाऊन भेटणे हे प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत", असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही शंका उपस्थित केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT