समीर वानखेडेंवरील ‘त्या’ आरोपांची होणार चौकशी; विश्वास नांगरे-पाटलांनी काढले आदेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

समीर वानखेडे हे नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे. कारण त्यांनी २ ऑक्टोबरला कॉर्डिलिया क्रूझवर केलेली कारवाई. आर्यन खानला अटक करण्यात आली आणि त्यानंतर NCB आणि समीर वानखेडे या दोहोंची चर्चा सुरू झाली. या सगळ्या प्रकरणात नवाब मलिक यांनी काही आरोप केले होते. ज्या आरोपांमध्ये प्रमुख आरोप होता की ही सगळी कारवाई खोटी आणि बनाव आहे. मात्र या प्रकरणाला ट्विस्ट आला तो प्रभाकर साईलमुळे.

ADVERTISEMENT

रविवारी प्रभाकर साईलने असा आरोप केला की आर्यन खानला पकडल्यानंतर त्याला सोडण्यासाठी के.पी. गोसावीने शाहरुख खानकडे 25 कोटींची लाच मागितली. एवढंच नाही तर त्यातले आठ कोटी हे समीर वानखेडेंना मिळणार होते. प्रभाकर साईल हा के. पी. गोसावीचा बॉडीगार्ड आणि ड्रग्ज प्रकरणातला साक्षीदार क्रमांक एक आहे. त्याने हे वक्तव्य केल्यानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं. आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी करण्याचं ठरवलं असून चार अधिकारी ही चौकशी करणार आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत हे या चौकशीवर लक्ष ठेवून असणार आहेत. सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हा आदेश दिला आहे.

हे वाचलं का?

प्रभाकर साईल हा इतके दिवस समोर आला नव्हता. मात्र रविवारी तो मीडियासमोर आला. तसंच त्याने आपल्याला समीर वानखेडेंपासून जिवाचा धोका आहे असाही आरोप केला. एवढंच नाही तर या प्रकरणातला एक दुसरा साक्षीदारही आज असेच आरोप करतो आहे.

ADVERTISEMENT

या सगळ्या नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर मनिष भानुशाली आणि किरण गोसावी हे दोघेही मीडियासमोर आले आणि त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. मात्र दुसरीकडे प्रभाकर साईल, सिद्धा द्विवेदी, कनिष्क जैन आणि नितीन देशमुख यांनी तक्रार दाखल केली आहे. समीर वानखेडेंनी लाच मागितली होती यासंदर्भातल्या या चार तक्रारी आहेत. जे चार अधिकारी या आरोपांची चौकशी करणार आहेत त्यापैकी दोन अधिकारी हे आझाद मैदान आणि कुलाबा पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत. तर अँटी नार्कोटिक्स सेलचा एक अधिकारी आणि सायबर सेल विभागातील एक अधिकारी असे चौघेजण या प्रकरणी चौकशी करणार आहेत. हे चारही अधिकारी अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनाच रिपोर्ट करणार आहेत.

ADVERTISEMENT

समीर वानखेडे विरूद्ध नवाब मलिक असाही सामना आपल्याला राज्यात रंगलेला पाहण्यास मिळतो आहे. समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक गेल्या तीन दिवसांपासून व्यक्तीगत पातळीवर आरोप करत आहेत. समीर दाऊद वानखेडे असा ट्विटरवर त्यांचा केलेला उल्लेख, समीर वानखेडे यांचं जात प्रमाणपत्र, त्यांचा निकाहनामा या सगळ्या गोष्टी नवाब मलिक यांनी समोर आणल्या आहेत.

दुसरीकडे समीर वानखेडे, त्यांची पत्नी क्रांती रेडकर, त्यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे या सगळ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. नवाब मलिक हे गुंडगिरीचा वापर करत आहेत त्यांना समीर वानखेडे यांना पदावरून हटवायचं आहे त्यामुळे ते असे बेछुट आरोप करत आहेत असं क्रांती रेडकरने म्हटलं आहे. अशात आता समीर वानखेडेंच्या विरोधात चार तक्रारी दाखल झाल्याने मुंबई पोलीस दलातील चार अधिकारी या आरोपांची चौकशी करणार आहेत. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणी कदाचित वाढण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT