Suhas Kande : ‘कोणत्या चेंबर्समधून दिल्लीत हॉटलाइन सुरू होत्या’; ‘त्या’ मतावरून शिवसेनेचं गंभीर विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण आणखीनच रंगलं आहे. सुहास कांदे या अपक्ष आमदारांवर दगाबाजीचा आरोप करणाऱ्या शिवसेनेनं आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केला आहे.

शिवसेनेनं सामना अग्रलेखातून राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना सुहास कांदे यांच्या बाद मताबद्दल प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे.

“राज्यसभा निवडणुकीत भाजपने सहावी जागा जिंकली आहे. या निकालामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. सरकारच्या तंबूत घबराट पसरली, असे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. चार-पाच अपक्ष व वसई-विरारच्या बहुजन विकास आघाडीवाल्यांचे गणित भाजपच्या बाजूने गेले व त्यांचे उमेदवार निसटत्या फरकाने जिंकले.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले नाहीत व फडणवीसांचे उमेदवार जिंकले म्हणून राज्यात महाप्रलय तर आला नाही ना? सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना? मुंगीने मेरू पर्वत तर गिळला नाही ना? अरे बाबांनो, तुम्ही मतांचे जुगाड करून जिंकलात, एवढ्यापुरतेच या निकालाचे महत्त्व आहे. या जुगाडबाजीच्या गणितात महाविकास आघाडीस अपयश आले म्हणून जगबुडी तर झाली नाही ना?,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत बाद करण्यात आले. हे एक गौडबंगालच आहे, पण त्याच पद्धतीचा आक्षेप सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदान प्रक्रियेवर घेण्यात आला. निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले. हे आमच्या निवडणूक आयोगाचे ‘स्वतंत्र’ व ‘निष्पक्ष’ वर्तन मानायचे काय?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

“खरे तर राज्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रियेतील सर्व आक्षेप फेटाळले. हा त्यांचा अधिकार असतानाही त्या अधिकारावर दिल्लीतून अतिक्रमण झाले. विधिमंडळातील कोणत्या चेंबर्समधून दिल्लीत हॉटलाइन सुरू होत्या व त्याबरहुकूम काय घडविण्यात आले त्याचा स्फोट झाला तर देशातील लोकशाही व निवडणूक पद्धतीचा मुखवटा जगासमोर गळून पडेल,” असं गंभीर विधान शिवसेनेनं केलं आहे.

ADVERTISEMENT

“आता राज्यात विधान परिषदेची निवडणूक होईल व ते मतदान गुप्त पद्धतीने असल्याने अनेकांच्या आशा-आकांक्षांना नवे कोंब फुटले आहेत. अशा निवडणुकांत ‘आमदार’रूपी माणसे गोळा करणे, त्यांना सांभाळणे, टिकवणे हे लोकशाही पद्धतीत दिव्य होऊन बसले आहे. ज्यांच्या हाती ससा तो पारधी असा प्रकार त्यातूनच होतो.”

“केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर अशा पद्धतीच्या निवडणुका जिंकण्यासाठी केला जावा हे लोकशाहीसाठी चांगले लक्षण नाही. राज्यसभेची सहावी जागा भाजपने जिंकून दाखवली याबद्दल त्यांचे अभिनंदन! पण त्यामुळे आकाश कोसळले काय? मुंगीने मेरू पर्वत गिळला काय? छे, छे! असे अजिबात झाले नाही!,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT