RAY : माणसाच्या मनाची काळी बाजू दाखवणारा चित्रानुभव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

माणसाचं मन ही मोठी अजब गोष्ट आहे. त्याचा ठाव घेणं कधी कधी खूप सोपं असतं कधी कधी खूप कठीण. प्रत्येक माणसाच्या मनात एक काळी बाजू असतेच असते. कुणी त्याला राक्षसी वृत्ती म्हणतं. कुणी त्याला आणखी काही नाव देतं. पण प्रत्येक माणूस मनात अशी एखादी बाजू बाळगून असतो. आवेगाच्या क्षणी ती बाजू उफाळून येते. त्यातून मग गुन्हे घडतात. दरवेळी गुन्हा घडायचा म्हणजे तो खूनच व्हायला हवा किंवा दरोडाच पडायला हवा असं नाही. एखाद्या गोष्टीविषयीचा मनात दडवून ठेवलेला राग एखाद्या क्षणी बाहेर येणं हा देखील त्या काळ्या बाजूचाच भाग असतो. सत्यजीत रे यांच्या कथांवर आधारित RAY नावाची वेबसीरिज नेटफ्लिक्सवर रिलिज झाली आहे. ही सीरिजही अशाच चार कथा सांगणारी आहे. या वेबसीरिजमध्ये चार कथा आहेत. या वेब सीरिजचा हा पहिला सिझन आहे. साधारण 54 मिनिटं ते 1 तास असा या प्रत्येक कथेचा कालावधी आहे. माणसच्या मनात दडलेल्या काळ्या बाजूवरच यात भाष्य करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

‘आप पहले इन्सान नहीं है और आखिरी इन्सान भी नही होंगे जो अपने आप को खुदा, भगवान समझ लेता है और फिर मुँह के बल गिरता है’ असा एक संवाद या सीरिजमध्ये आहे. हा संवाद म्हणजे या सीरिजचं सार आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. या सीरिजमध्ये चार कथा आहेत. ‘Forget Me Not’ ‘हंगामा क्यूँ है बरपा!’ ‘बहुरूपीयाँ’, ‘Spotlight’ अशा या चार कथा आहेत.

हे वाचलं का?

पहिली कथा आहे ‘Forget Me Not’ यामध्ये अली फजलने इप्सित रामा नायर हे पात्र साकारलं आहे. श्वेता बसू, अनिंदता बोस आणि श्रुती मेनन यांच्याही यात भूमिका आहेत. इप्सितचं जग हे कॉर्पोरेट विश्व आहे. त्या विश्वात त्याचा लौकिक असा आहे की तो कॉम्प्युटर इतकाच शार्प मेमरी असणारा आहे. त्याच्या आयुष्यात आलेली एक स्त्री त्याला एका घटनेची आठवण करून देते.. आणि ती आठवण करून दिल्यानंतर पुढे काय काय घडतं? याबाबत या कथेत भाष्य करण्यात आलं आहे. इप्सितच्या भूमिकेत अली फजल चपखल बसला आहे. त्याने कॉर्पोरेट विश्वातला त्याचा वावर, तिथे लोकांची वृत्ती कशी असते हे अगदी परफेक्ट दाखवलं आहे. या कथेचा शेवट आपल्याला अनपेक्षित आहे. या कथेत जे काही घडतं ते पाहणं खरंच रंजक ठरतं.

दुसरी कथा आहे ती ‘हंगामा क्यूँ है बरपा’ गुलाम अली यांची सुप्रसिद्ध गझल आहे त्यावरूनच या कथेचं शीर्षक निवडलं गेलं आहे. या कथेत आपल्याला भेटतात मुसाफिर (मनोज वाजपेयी) आणि अस्लम बेग (गजराज राव) मुसाफिर हा एक शायर आहे. तो ट्रेनने प्रवास करतो आहे. चांगला नाव लौकिक मिळवलेला शायर अर्थात मुसाफिर हा प्रवास करत असताना त्याची भेट अस्लम बेगसोबत होते. अस्लम बेगला भेटल्यानंतर एक घटना मुसाफिरला आठवते. ती घटना काय असते? पुढे काय काय घडतं हे ही कथा आपल्या कुठे घेऊन जाते हे पाहताना आपण त्यात हरवून जातो. या कथेचं यश आहे ते आपण गुंगून जातो यातच.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

तिसरी कथा आहे ‘बहुरूपिया’ इंद्राशिश शहा (के. के. मेनन) हा एक उत्तम मेकअप मॅन आहे. त्याच्याकडे होणारं दुर्लक्ष, कामाच्या ठिकाणी होणाऱी अवहेलना यामुळे तो वैतागला आहे. देवावर त्याचा विश्वास नाही. तो ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीचं व्यवहारी असणंही त्याला खटकलेलं आहे. त्याच्या आयुष्यात एक बदल घडतो. ज्यानंतर सगळ्या जगावरच सूड उगवायचं ठरवतो. तो बदल काय असतो? जगावर सूड उगवण्यासाठी तो काय करतो या सगळ्यात इंद्राशिषमधे कसे बदल होत जातात हे सगळं के. के. मेननने लीलया साकारलं आहे.

चौथी कथा आहे Spotlight या कथेची ओपनिंग फ्रेमच दीदीच्या प्रवचनाने होते. तिला पाहून आपल्याला राधे माँची आठवण येते. हर्षवर्धन कपूरने यात हर्षवर्धन कपूरने विक्रम अरोरा ही भूमिका साकारली आहे. विक्रम अरोरा हा एक प्रसिद्ध नट आहे. त्याच्या अभिनयाचं कौतुक होतं आहे. त्याच्या सगळे चित्रपट हिट होत आहेत. अशात तो एका हॉटेलमध्ये राहतो आणि… पुढे काय काय घडतं? या सगळ्या बदलांमुळे विक्रममध्ये काय बदल होतात हा सगळा प्रवास कथेत पाहण्यासारखा आहे.

या चार कथा पाहिल्यानंतर आपलं मन सून्न होतं. माणसाच्या आयुष्यात अशाही घटना घडू शकतात? सुखाच्या मागे पळणारा माणूस, वर वर चांगला आणि यशस्वी वाटणारा माणूस आतून इतका पोकळ असू शकतो का? हे सगळं या कथा सांगतात. रे या वेबसीरिजचं यश नेमकं या अस्वस्थ करण्यामध्येच दडलेलं आहे. आणखी एक महत्त्वाची बाब ती म्हणजे प्रत्येक कथा व्यवस्थित उलगडून सांगितली गेली आहे. त्यामुळे ती पाहण्यासाठी पेशन्स हवेत. सत्यजीत रे यांना भारतातले शेक्सपिअर अशी उपाधी का दिली गेली आहे त्याची साक्ष या कथा पाहिल्यानंतर कळते. शेक्सपिअरच्या कथांमध्ये जे चित्रण मानवी भाव-भावानांवर करण्यात आलं आहे तोच समान धागा आपल्याला सत्यजीत रे यांच्या कथांमध्ये आढळतो. चारही कथांमध्ये मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या चारही अभिनेत्यांनी उत्तम अभिनय केला आहे. अभिनय करताना त्यात झोकून दिलंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

निरेन भट आणि सिराज अहमद यांनी या वेबसीरिजसाठी लेखन केलं आहे. तर श्रीजीत मुखर्जी, अभिषेक चौबे आणि वसन बाला या तिघांनी मिळून या चार कथांचं दिग्दर्शन केलं आहे. अर्कोदेब मुखर्जी, स्वप्नील सोनवणे, अनुज धवन आणि इशित नारेन यांची सिनेमॅटोग्राफीही कमाल झाली आहे.

बहुरूपियाँ या कथेचा विशेष उल्लेख करावासा वाटतो कारण त्यात के. के. मेननने त्याच्या अभिनयाने जे रंग भरले आहेत आणि त्या कथेचा ज्या प्रकारे शेवट होतो ते पाहून अंगावर काटा येतो. देवाला न मानणारा, सगळी चिडचिड, राग मनात ठेवून हसतमुख राहणारा इंद्राशिष अत्यंत तडफेने के.केने साकारला आहे. या कथा पाहून आपल्याला सत्यजीत रे यांच्या इतर कलाकृतीही आठवतात. एक चित्रकार म्हणून त्यांनी त्यांची कारकीर्द सुरू केली होती. त्यामुळे कोणत्याही कथेत रंग कसे भरायचे याची उत्तम जाण त्यांना होतीच. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 37 चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. त्या सगळ्याच कलाकृती वेगळ्या आणि आपली छाप सोडणाऱ्या ठरल्या. मानवी मनाचा ठाव त्यांनी तेव्हाही घेतला होता. आता RAY पाहिल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला तोच अनुभव आल्याशिवाय राहात नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT