राज्यपालांचा फक्त २५०-३५० वर्षांपूर्वीचाच नाही, तर ७० वर्षातील इतिहासही कच्चा; रोहित पवार कोश्यारींना असं का म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती. नरेंद्र मोदींच्या जादूमुळे जगात भारतीयांचा गौरव वाढला, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. त्यांच्या याच विधानावर बोट ठेवतं, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त टोला लगावला आहे.

“देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांचाही काळ मी पाहिला आहे. मात्र, पहिल्यांदा देशासाठी वीस तास काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जादूमुळे जगात भारताचा गौरव वाढला आहे. मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती. आमच्या प्रथा,परंपरांना लोक नावं ठेवायची”, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नागपुरात केलं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर रोहित पवार काय म्हणाले?

रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाबद्दल ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणाले आहेत, “राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५० वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. नरेंद्र मोदी हे मोठे नेते असून, देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“आज कळस दिसत असेल तर त्याचा भक्कम पाया हा आधीच घातला गेलेला आहे आणि त्यात आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांचा वाटा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. तसंच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचंच योगदान असतं असं नाही, तर आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरिकांचं योगदान तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून ‘आधी भारतीयांना किंमत नव्हती’ असं वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीनं करणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे”, अशी टीका रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली आहे.

रोहित पवारांनी यापूर्वीहीच्या विधानावरूनही राज्यपाल कोश्यारींवर साधला होता निशाणा

काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी गुजराती आणि मारवाडी परत गेले, तर मुंबईत पैसाच राहणार नाही, असं विधान केलं होतं. त्यावरूनही रोहित पवारांनी राज्यपालांनावर टीका केली होती. “महाराष्ट्राला ‘कोरोना स्प्रेडर’ म्हणून संसदेत हिणवलं गेलं आणि २३ हजार कोटींचा एबीजी शिपयार्ड घोटाळा पुढं आला तेंव्हा १४ फेब्रुवारी रोजी फुले दाम्पत्याबाबत राज्यपालांनी कुत्सितपणे वादग्रस्त विधान करुन लोकांचं लक्ष त्या मुद्द्यावरून दुसरीकडं वळवलं.”

“राज्यात ईडीच्या गैरवापराचा आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांचा मुद्दा ऐरणीवर होता, तेंव्हाही (२७ फेब्रुवारी) महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल महोदयांनी वादग्रस्त विधान करुन मूळ मुद्द्यावरून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. आणि आताही राज्यात पूरग्रस्तांना तातडीने द्यावयाच्या मदतीचा मुद्दा तापला असताना आणि मराठा, ओबीसी आरक्षणावरुन लोकांमध्ये संताप असताना (२९ जुलै) मुंबईच्या आर्थिक उभारणीत मराठी माणसाचं योगदान नाकारून राज्यपालांनी महाराष्ट्राचा अवमान करत मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला,” अशी टीका रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली होती.

ADVERTISEMENT

“राज्यात ज्या-ज्या वेळी विविध प्रश्न निर्माण झाले, त्या प्रत्येक वेळी राज्यपालांनी महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंधित वादग्रस्त विधानं करून मूळ मुद्द्यावरून लोकांचं आणि माध्यमांचं लक्ष वळवण्याचं काम जाणीवपूर्वक केल्याची शंका लोकांकडून निर्माण केली जातेय”, असं रोहित पवार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आरोपावर म्हणाले होते.

ADVERTISEMENT

“वास्तविक संविधानाला अभिप्रेत असलेला कारभार राज्यात सुरू आहे की नाही हे पाहण्याची राज्यपालांची जबाबदारी असते. पण आज तेच राज्यपाल आपल्या पदाची गरिमा न राखता वादग्रस्त विधाने करून राज्यातील सामाजिक वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आधीही विधानपरिषदेतील आमदारांच्या नियुक्तीच्या संदर्भाने संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न झाला.पण हा महाराष्ट्र स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजलखानाची कबर खोदणाऱ्या शिवरायांचा आणि ‘नाठाळाच्या माथी हानू काठी’, असं सांगणाऱ्या तुकोबारायांचा आहे, हे प्रत्येकानेच ध्यानात घ्यायला हवं!”, असं रोहित पवार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उद्देशून म्हणाले होते.

राज्यपाल कोश्यारींनी मागितल्यानंतर रोहित पवारांनी काय केली होती मागणी?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या विधानाबद्दल माफी मागितली होती. त्यानंतर रोहित पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पूर्वीच्या विधानांची आठवण करून दिली होती. “मनावर दगड ठेवून राज्यपालांनी मागितलेल्या माफीचा स्वीकार करून मराठी माणूस त्यांना माफ करण्याचा प्रयत्न करेल देखील,मात्र अशाच प्रकारे त्यांनी छ.शिवाजी महाराज,महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची देखील माफी मागितली असती तर अधिक चांगले झाले असते अजूनही वेळ गेलेली नाही”, असं रोहित पवार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना म्हणाले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT