‘वर्षा राऊत यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा केले गेले’, ईडीचं चौकशीसाठी समन्स
मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक केली आहे. संजय राऊत यांच्यापाठोपाठ आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. आज (५ ऑगस्ट) ११ वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संदर्भात ईडी […]
ADVERTISEMENT

मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक केली आहे. संजय राऊत यांच्यापाठोपाठ आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. आज (५ ऑगस्ट) ११ वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे.
पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संदर्भात ईडी तपास करत आहे. याच प्रकरणात ईडीने आता संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी प्रविण राऊत हे संजय राऊत यांचे फ्रंटमॅन असल्याचं ईडीने न्यायालयाला सांगितलं.
संजय राऊतांवर आरोप करतानाच ईडीने त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यावर मोठ्या प्रमाणात रकमा जमा झाल्याचं आढळून आल्याचा दावा कोर्टात केला. प्रविण राऊत यांच्याकडे पैसे आल्यानंतर ते वेगवेगळ्या व्यक्तीकरवी संजय राऊत यांना पोहोचवण्यात आले. सुरुवातीला १.०६ कोटी रुपये बँक खात्यावर पाठवण्यात आल्याचं आढळून आलं आहे. त्यानंतर १.१७ कोटी रुपये, आणि आता १.०८ कोटी रुपये पाठवण्यात आल्याचं ईडीने न्यायालयात सांगितलं.
वर्षा राऊत यांच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात रकमा जमा करण्यात आल्या असून, या प्रकरणाशी संबंधित लोकांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती ईडीने न्यायालयात दिली होती. आता या व्यक्तीची चौकशी केली जाणार असून, वर्षा राऊत यांची आज चौकशी केली जाणार आहे. वर्षा राऊत यांच्यासह इतर समन्स बजावण्यात आलेल्या व्यक्ती आणि संजय राऊत यांची एकत्रित चौकशी करणार असल्याचंही ईडीने म्हटलेलं आहे. त्यामुळे वर्षा राऊत चौकशीला हजर राहणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
संजय राऊतांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला, न्यायालयात कुणी काय सांगितलं?
वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं होतं. वर्षा राऊत या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिल्या होत्या.
संजय राऊत ज्यामुळे अडकले, तो पत्रा चाळ जमीन घोटाळा काय?
गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी गुरू आशिष कन्स्ट्रक्शननं म्हाडासोबत करार केला होता. करारानुसार गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला याठिकाणी 3,000 पेक्षा अधिक फ्लॅट बांधायचे होते. या एकूण फ्लॅटपैकी 672 फ्लॅट हे पत्रा चाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि गुरु आशिष फ्लॅटकडे राहणार होते.
पत्रा चाळ जमीन प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप काय?
गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीनं कोणतंही बांधकाम न करता म्हाडा आणि पत्रा चाळीतील रहिवाशांची फसवणूक केल्याचं नंतर समोर आलं. गुरू आशिष कन्स्ट्रक्शननं ही जमीन 1,034 कोटी रुपयांना दुसऱ्या बिल्डरला विकली होती.
या प्रकरणात ईडीनं प्रवीण राऊत यांना अटक केलेली. प्रवीण राऊत हे पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या एचडीआयएलचे सारंग आणि राकेश वाधवान यांच्यासह फर्मचे एक संचालक होते.
मार्च 2018 मध्ये म्हाडानं गुरु आशिष बांधकामांविरोधात एफआयआर दाखल केला. फेब्रुवारी 2020 मध्ये प्रवीण राऊत यांना EOW (आर्थिक गुन्हे शाखा) ने अटक केली होती, तर सारंग वाधवान अटकेत होता. मार्च 2018 मध्ये म्हाडानं गुरु आशिष बांधकामांविरोधात एफआयआर दाखल केला होता.
फेब्रुवारी 2020 मध्ये प्रवीण राऊतला EOW ने अटक केली होती तर सारंग वाधवानला EOW ने त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये EOW ने अटक केली होती. त्यानंतर राऊत यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती.
ईडीनं या प्रकरणी ईसीआयआर नोंदवला आणि 1 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत आणि त्यांचे सहकारी सुजित पाटकर यांच्या निवासस्थानांसह सुमारे सात ठिकाणी झडती घेतली. राऊत यांना 2 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती, तर पाटकरांचा जबाब ईडीनं नोंदवला होता.
पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत वर्षा राऊत यांचं नावं कसं आलं?
प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मित्र असून, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असताना त्यांचं नावही समोर आले होतं. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 55 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज दिल्याचं समोर आलं होतं. या कर्जाच्या रकमेतून राऊत कुटुंबानं दादरमध्ये फ्लॅट खरेदीसाठी केला होता. त्यानंतर ईडीने वर्षा आणि माधुरी राऊत यांचे जबाब नोंदवले होते.
ईडीतील सूत्रांच्या माहितीनुसार 2010 मध्ये प्रवीण राऊत यांना त्याच्या बँक खात्यात इक्विटी आणि जमीन व्यवहाराच्या नावाखाली 95 कोटी रुपये मिळाले होते, तरीही कंपनी प्रकल्प पूर्ण करू शकली नाही आणि कोणतेही उत्पन्न मिळाले नाही.
या प्रकरणात ईडीने ज्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली ते सुजित पाटकर हे प्रवीण राऊत यांचे सहकारी आहेत, तर संजय राऊत यांच्याशी जवळचे संबंध आहेत. पाटकर हे संजय राऊत यांच्या मुलींसह वाईन ट्रेडिंग फर्ममध्ये गेल्या वर्षभरापासून भागीदार आहेत. पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने यापूर्वी अलिबाग येथे संयुक्तपणे जमीन खरेदी केली होती.
या प्रकरणात ईडीने संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील जमीन जप्त केलेली आहे. याच प्रकरणात ईडीने १ जुलै २०२२ रोजी संजय राऊत यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी केली होती.