हिंदू-मुस्लिम दंगा घडवण्याचे प्रयत्न केले जाताहेत; शरद पवार यांचं गंभीर विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

‘हिंदू-मुस्लिम दंगा करता येईल का, दलित-अदलित करता येईल का, याचा प्रयत्न केला जात आहे,’ असं गंभीर विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमरावती येथे पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केलं. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान मोदींची भेट घेतलेल्या पवारांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवरही टीका केली. ‘राज्यांना मदत करायची नाही, त्यांच्या अडचणी वाढवायच्या या प्रकारची भूमिका घेऊन केंद्र सरकार चालत आहे,’ असं पवार म्हणाले.

ADVERTISEMENT

अमरावती विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा रविवारी झालेल्या मेळाव्यात शरद पवारांनी राज्यातील आणि देशातील मुद्द्यांवर भाष्य केलं. “महाराष्ट्रात आज आपली सत्ता आली, पण ज्यांच्या हातात सत्ता राहिली नाही अशा अस्वस्थ लोकांचा मोठा वर्ग राज्यात आहे. त्यामुळेच केंद्राची सत्ता वापरून महाराष्ट्र राज्य संकटात कसे आणता येईल, यासाठी अखंड प्रयत्न सध्या सुरू आहेत. अनेकांवर खटले भरले जातात, चौकशा केल्या जातात. मंत्रिमंडळातील दोन सहकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचं काम केलं. सतत काहीना काही करून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाला कसा त्रास देता येईल, असा एककलमी कार्यक्रम देशात सुरू आहे. अशा वेळेला आपली सामूहिक शक्ती आपण उभी केली, तर प्रयत्न हाणून पाडणं अशक्य नाही,” असं शरद पवार म्हणाले.

“एसटी कामगारांबाबत माझ्या आधीच्या वक्त्यांनी उल्लेख केला. एसटी कामगार समाजातील लहान घटक आहे. गेली ४०-५० वर्षे त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे कामगारांना दोष देऊन चालणार नाही. नेतृत्व चुकीचे असले तर त्याची किंमत कामगारांना चुकवावी लागते. एसटी कामगारांबाबत काय घडलं, हे लोकांनी टीव्हीवर पाहिलं. त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, सर्वसामान्य एसटी कामगारांना भडकावून चुकीच्या मार्गाला नेले असल्याचे दिसून येते,” असं भाष्य पवारांनी सिल्व्हर ओक बाहेर झालेल्या हिंसक आंदोलनावर मांडली.

हे वाचलं का?

“राजकारणात सार्वजनिक जीवनात काम करताना अनेक प्रकारची संकटे येतात. काही संकटे आयोजित केलेली असतात, काही अचानक परिस्थितीमुळे उद्भवतात. त्यांना न घाबरता तोंड दिले पाहिजे. कालचं संकट हे काही संकट नव्हतंच. कुणीतरी चिथावणी दिल्यामुळे तो प्रसंग घडला. त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज नाही. आज देशात वेगळ्या प्रकारचे वातावरण सुरू आहे. हिंदू-मुस्लिम दंगा करता येईल का, दलित-अदलित करता येईल का, याचा प्रयत्न केला जात आहे. जो धर्मा-धर्मात, जाती-जातींमध्ये, भाषांमध्ये वाद निर्माण करतोय, अशा प्रवृत्तीविरोधात संघर्ष करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार आहे,” असा इशारा पवारांनी यावेळी सामाजिक धुव्रीकरणाच्या मुद्द्यावरून दिला.

“आज महाराष्ट्रात आपण तीन पक्षाचे सरकार निर्माण केले. समस्या आहेत, पण आपण तीनही पक्ष एकत्र बसून मार्ग काढत आहोत. केंद्राचे सहकार्य नसले तरी आपण सामान्य जनतेचे प्रश्न सोडवत आहोत. आज देशाच्या पुढे सर्वात महत्त्वाचा प्रश्न महागाईचा आहे. इंधनाचे दर दररोज वाढत आहेत. देशातील शिक्षित पिढीला रोजगार मिळत नाही. रोजगार वाढविण्यासाठी देशाची सत्ता राबवायची असतानाही त्याकडे लक्ष दिले जात नाही. राज्यांना मदत करायची नाही, त्यांच्या अडचणी वाढवायच्या या प्रकारची भूमिका घेऊन जर केंद्र सरकार चालत असेल तर तुमची माझी जबाबदारी अधिक वाढते,” असं आवाहन कार्यकर्त्यांना पवारांनी केलं.

ADVERTISEMENT

“जे एका विचाराचे आहेत, त्यांना सोबत घेऊन सामान्य माणसाचे दुखणे दूर केले पाहिजे. सांप्रदायिक विचार घेऊन माणसांमध्ये अंतर वाढविण्याचे काम कुणी करत असेल तर त्यांच्यासोबत संघर्ष करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता पार पाडेल, असा विश्वास मला वाटतो,” असं शरद पवार म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT