शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी वर्षावर पोहचले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहचले आहेत. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा होते याविषयी आता विविध तर्क लावले जात आहेत. एवढंच नाही तर राजकीय वर्तुळात या भेटीबाबत विविध चर्चाही सुरू झाल्या आहेत. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे 28 जूनला घडलेल्या घडामोडी.

काय घडलं 28 जूनला?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 28 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षावर जाऊन भेट घेतली. मागील तीन दिवसांमधली ही दुसरी भेट होती. शनिवारी संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मातोश्री वर जाऊन भेटले होते. तर सोमवारी त्यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. एवढंच नाही तर त्यानंतर काही वेळाने संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सिल्वर ओक या ठिकाणी जाऊन भेटले. शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात जवळपास वीस मिनिटं चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांशी दीड तास चर्चा करून संजय राऊत नेमका कोणता निरोप घेऊन शरद पवारांना भेटले याबद्दल विविध चर्चा सुरू झाल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या सगळ्या भेटीगाठी सूचक आहेत असं चित्र महाराष्ट्रात निर्माण झालं आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी शिवसेनेला सोबत घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे म्हणजेच 2024 ला शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढतील असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर शरद पवारांच्या दिल्ली या निवासस्थानी राष्ट्रीय मंचाची एक बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेला बोलवण्यात आलं नव्हतं. मात्र पुढच्या बैठकीत शिवसेनेला बोलवा अशी सूचना स्वतः शरद पवार यांनी केली होती.

या सगळ्या बैठकांचं सत्र सुरू असतानाच संजय राऊत यांनी तीन दिवसात दोनवेळा घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट आणि त्यानंतर शरद पवारांची भेट ही चांगलीच चर्चेत राहिली. सरकार अस्थिर आहे असे भ्रम पसरवले जात आहेत, उद्धव ठाकरे यांना मी नेहमीच भेटतो तसंच शरद पवार हे मार्गदर्शक आहेत त्यांना भेटलो तर गैर काय? अशी एक मोघम प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. मात्र संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात सोमवारी वीस मिनिटं चर्चा झाल्यानंतर शरद पवार यांनी आज वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री हे कुठेतरी नाराज आहेत आणि ही नाराजी दूर करण्यासाठी शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली आहे का? अशाही चर्चा सध्या होत आहेत.

ADVERTISEMENT

31 मे रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतरही राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. कारण 2019 च्या विधानसभा निवडणूक प्रचारात शरद पवारांना आव्हान देणारे आणि त्यांच्यावर टीका करणारे नेते होते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांची टीका शरद पवारांना इतकी लागली की त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपला पाठिंबा द्यायला नकार दिला असंही बोललं जातं. शरद पवार यांच्या मनात असलेली कटुता दूर कऱण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी 31 मे 2021 ला शरद पवार यांची भेट घेतली असं बोललं गेलं. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंवर दबाव टाकण्यासाठी ही गोष्ट घडली का? अशीही चर्चा तेव्हा रंगली होती.

ADVERTISEMENT

त्यानंतर 8 जून 2021 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. त्यांनी मराठा आरक्षण आणि इतर प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. मात्र यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात वैयक्तिक अशी सुमारे चाळीस मिनिटं भेट झाली. त्यानंतरही महाराष्ट्रातली समीकरणं बदलणार का यावर चर्चा सुरू झाली होती. तसंच काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं पत्रही चांगलंच व्हायरल झालं होतं. शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपसोबत गेलं पाहिजे हा त्या पत्रातला मुख्य सूर होता. अर्थात त्यांना सामनातून संदेश देण्यात आला खरा.. मात्र या पत्राचीही चर्चा चांगलीच रंगली होती. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहचले आहेत. त्यांच्यात काय चर्चा होणार त्याचं फलित काय असणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT