उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांचा हल्ला, ठाकरे विरूद्ध शिंदे गट संघर्ष शिगेला

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

बंडखोर आमदार म्हणजेच शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातला संघर्ष शिगेला पोहचल्याचं चित्र पुण्यात पाहण्यास मिळालं. पुण्यातल्या कात्रज या भागात आक्रमक शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे गटासोबत गेलेल्या उदय सामंत यांची कार फोडली. शिवसैनिकांनी या कारवर हल्ला केला. यामध्ये उदय सामंत यांच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या घराकडे जात असताना ही घटना घडली.

आदित्य ठाकरेंची सभा संपताच उदय सामंत यांच्या कारवर हल्ला

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची आज कात्रज मध्ये सभा पार पडली. त्या सभेनंतरच उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी हल्ला केला. या कारची तोडफोड केली. गद्दारी केली असं म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे हे प्रकरण जोरदार तापण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आव्हानही पोलिसांसमोर असणार आहे.

ठाकरे विरूद्ध शिंदे गट संघर्ष शिगेला

२१ जूनला आमदारांनी बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आधी सुरतला आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले. यानंतर काय काय घडलं ते महाराष्ट्राने पाहिलंच आहे. हे आमदार जेव्हा गुवाहाटीमध्ये होते तेव्हाही त्यांच्याविरोधात उद्रेक पाहण्यास मिळाला होता. अनेक आमदारांची कार्यालयं फोडण्यात आली होती. आता आज उदय सामंत यांची कार फोडली गेली आहे. तसंच त्याच्या कारचा ताफा अडवण्याचाही प्रयत्न झाला. या सगळ्याचे पडसाद आता कसे उमटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आदित्य ठाकरे यांनी आजच कात्रजमध्ये सभा घेतली. यावेळी गद्दारांना जनताच आता धडा शिकवेल असंही वक्तव्य त्यांनी केलं. त्यानंतर अवघ्या काही वेळातच हा हल्ला झाला आहे. याठिकाणी पोलीसही लगेच आले. मात्र कारची तोडफोड झाल्यानंतर शिवसैनिकांनी गद्दार अशा घोषणाही दिल्या.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील पुण्यातल्या कात्रजमध्ये होते. त्यानंतर त्यांनी जेजुरी गडावर जाऊन खंडोबाचंही दर्शन घेतलं. पुरंदर या ठिकाणी झालेल्या सभेत त्यांच्यासोबत असलेल्या विजय शिवतारे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांवरही टीका केली. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन हे सगळे आमदार बाहेर पडले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि त्यांचा हिंदुत्वाचा विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत असं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे. तसंच त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्या आमदारांचंही म्हणणं आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे हे शिवसेना वाचवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. तर आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT