‘नड्डाजी, जरा जपून! तुम्हाला परवडणार नाही’; इतिहासाचा दाखला देत शिवसेनेचे टीकेचे बाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजपला लढा देईल, असा राष्ट्रीय पक्ष देशात नाही. प्रादेशिक पक्षही संपतील आणि फक्त भाजपच राहिल, असं विधान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनी केलं. नड्डांच्या या विधानाचा शिवसेनेनं सामना अग्रलेखातून समाचार घेतला आहे. ‘नड्डा हे हुकूमशहांच्या चेल्याची भाषा बोलत आहेत व ही भाषा घराणेशाहीपेक्षा भयंकर आहे’, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर वंशावरून टीकेचे बाण डागले आहेत.

ADVERTISEMENT

शिवसेनेनं सामना अग्रलेखात म्हटलं आहे, “भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ही व्यक्ती इतरांच्या तुलनेत बरी आहे, असा एकंदरीत समज होता. एक तर ते हिमाचलसारख्या शांत, थंड प्रदेशातून आलेले आहेत व अ. भा. विद्यार्थी परिषदेपासून ते समाजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे लोकशाहीचे भान त्यांना असावे, पण अखेर नड्डाही सब घोडे बारा टके या हिशेबानेच बोलू लागले आहेत. नड्डा यांनी आता सांगितले आहे की, देशात फक्त भाजपच टिकेल. शिवसेनेसह प्रादेशिक पक्ष संपतील. नड्डा यांचे विधान अहंकार व गर्वाने फुगलेले आहे.”

शिवसेनेनं नड्डांना सांगितला इतिहास

“नड्डा यांनी शिवसेनेचा उल्लेख केला म्हणून सुरुवातीलाच सांगायला हवे. शिवसेनेला संपविण्याची भाषा करणे हा कृतघ्नपणाचा कळस आहे. याच शिवसेनेने पंचवीसेक वर्षे भाजपास खांद्यावर घेऊन फिरवले. आज संबंधात दुरावा नक्कीच आहे, पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या नावावरच महाराष्ट्रात आपण तरलात. दुसरे म्हणजे संपूर्ण जग मोदी यांच्याविरोधात उभे ठाकले असताना हिंदुत्वासाठी म्हणून एकमेव बाळासाहेब ठाकरेच मोदींची पाठराखण करीत होते.”

हे वाचलं का?

“गुजरातमधील दंगलीचे निमित्त करून मोदींना राजधर्माची आठवण करून देणारे त्यांच्याच पक्षाचे लोक होते. तेव्हा ‘राजधर्म वगैरे ठेवा बाजूला, हिंदू धर्म म्हणून मोदींना हात लावू नका, गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उठवू नका,’ असे ठणकावून बोलणारे देशात एकमेव शिवसेनाप्रमुखच होते. त्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना संपवायला निघालेले जे.पी. नड्डा हे कोणत्या हवेत आहेत? नड्डा हे हुकूमशहांच्या चेल्याची भाषा बोलत आहेत व ही भाषा घराणेशाहीपेक्षा भयंकर आहे.”

बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘त्या’ फॉर्म्युल्यावरच उद्धव ठाकरे पुन्हा करत आहेत शिवसेनेची उभारणी

ADVERTISEMENT

प. बंगाल, केरळ, बिहार, ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश अशा राज्यांत प्रादेशिक पक्ष मजबूत स्थितीत आहेत. शेवटी ही प्रादेशिक अस्मिता आहे व ती राहणारच. सगळेच काही तुमच्या मागे फरफटत जाणार नाहीत. पंजाब व दिल्लीत ‘आप’चे राज्य आहे. आम आदमी पक्ष आता नड्डांच्या हिमाचलात घुसला आहे. त्यामुळे हिमाचलात नड्डांची दमछाक होईल. महाराष्ट्रात शिवसेनेशी लढता येत नाही म्हणून त्यांनी ‘ईडी’ वगैरेंचा धाक दाखवून शिवसेना फोडली व हे फुटक्या कवडीचे फुटीर लोक खिशात ठेवून ते शिवसेनेस आव्हान देत आहेत.”

एक चांगला माणूसही वाया गेला; शिवसेनेचा नड्डांना टोला

“तुमच्या खिशातले फुटक्या कवडीचे लोक संपतील, पण बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा आकाशाला गवसणी घालेल. तुमच्या धमक्यांना भीक घालणारी शिवसेना नाही. ‘संपवू’ वगैरे भाषा तुमच्या खिशातल्या फुटक्या कवडीच्यांना करा. नड्डा यांची भाषा लोकशाहीसाठी मारक आहे, पण ते ज्यांच्या सावलीत वावरत आहेत ते पाहता त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करावी? एक चांगला माणूसही वाया गेला याचेच दुःख जास्त आहे.”

ADVERTISEMENT

“आजचा भाजपचा वंश हा खरेच खऱ्या भाजपच्या गर्भातून वाढला आहे काय? महाराष्ट्रापासून देशात सर्वत्र काँग्रेससह अनेक पक्ष फोडूनच भाजपची वाढ झाली. म्हणजे भाजपचे डोके असले तरी हात, पाय, नाक, कान वगैरे सगळे दुसऱ्यांचे आहे व शिवणकाम करून ते शरीर जुळवले आहे. तुमच्याच वंशवेलीचा पत्ता नाही आणि तुम्ही देशातील इतर पक्षांना संपवायची भाषा करताय. कोणी राहायचे व कोणी जायचे हे लोकांना ठरवू द्या, पण लोकभावनांचा तरी कोठे आदर होतोय? लोकांचा आग्रह आहे निवडणुका ‘ईव्हीएम’ने न करता मतपत्रिकेने व्हाव्यात. कारण ‘ईव्हीएम’वर लोकांचा विश्वास नाही आणि मतपत्रिकेवर भाजपचा विश्वास नाही.”

जळगावमध्ये शिंदेंच्या गुलाबरावांसमोर ठाकरेंचे गुलाबराव, कसा असेल संघर्ष?

‘ईडी’च्या कारवायांवर बोट, शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

“जे आपल्या विरोधात आहेत त्यांना ‘ईडी’ अधिकाऱ्यांना हाताशी धरून तुरुंगात टाकायचे व विरोधकांतील जे कलंकित शरण येतील, त्यांना वॉशिंग मशीनमध्ये धुऊन आपल्या गाठीशी बांधायचे, ही काय लोकशाही म्हणायची? राजकारणात फक्त आम्ही आणि आम्हीच ही भाषा हुकूमशाहीची आहे. एकाधिकारशाहीची आहे. ही जनमानी नसून मनमानी आहे. जे जे नजरेस येईल त्या सगळ्यांचा मालक मीच आहे या विचाराने भाजप वागत असेल तर त्यांचा आणीबाणीविरुद्धचा लढा एक ढोंग होते असेच मानावे लागेल.”

“भाजपचे वाढणारे बळ कृत्रिम आहे. इतर पक्षांचे सदस्य व नेते फोडण्यासाठी भाजप फक्त दडपण आणि दहशत याचाच वापर करीत आहे, असे नव्हे तर या दडपशाहीला किंवा प्रलोभनांना बळी न पडलेल्यांना सरळ तुरुंगाची वाट दाखवली जात आहे. तरीही या सगळ्याला भीक न घालता प. बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक पक्ष उभे आहेत व लढत आहेत. कारण त्यांची नाळ पक्की आहे. जे. पी. नड्डा यांनी हे समजून घेतले पाहिजे. नड्डा यांनी सर्व प्रादेशिक पक्षांना असा शाप दिला आहे की, भाजपच राहील व बाकीचे सगळे संपतील.”

शिवसेनेची झेप तुम्हाला परवडणार नाही, नड्डांना इशारा

“मऱ्हाटीत एक म्हण आहे ती म्हणजे, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही! नड्डा साहेबांना या म्हणीचा अर्थ समजावून सांगितला पाहिजे. दुसरे असे की, भाजपने खोटा खोटा का होईना, गोवंश हत्याबंदीचा कायदा केला आहे. त्यामुळे कावळ्याच्या शापाने प्रादेशिक पक्षांच्या गायी मरणार नाहीत. उलट गोवंश वाढतच जाईल. कावळे मात्र नष्ट होतील. शिवसेना तर वाघ आहे. त्यामुळे वाघाची झेप तुम्हाला परवडणार नाही.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT