Shiv Sena: “अमित शाह महाराष्ट्राचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू”, ठाकरेंचा घणाघात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Uddhav Thackeray hits Out Union Minister Amit Shah : ‘धोका देणाऱ्यांना कधी सोडायचे नसते’, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात केलं. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर शाह यांनी हे विधान केलं. शाह यांच्या विधानाला उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं. ‘मिंध्यांना धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले ते याच अमित शहांच्या मेहेरबानीने हे काय आता लपून राहिले?’, असं म्हणत ठाकरेंनी घणाघाती हल्ला केला.

ADVERTISEMENT

सामना अग्रलेखात ठाकरेंनी काय म्हटलंय?

-“शिवसेना हे नाव व चिन्ह विकत घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाची कमळी पायातले घुंगरू तुटेपर्यंत नाचत आहे. मिंधे गटापेक्षा भाजपलाच आनंदाचे भरते आले आहे. एखाद्या दुकानातून चणे, शेंगदाणे विकत घ्यावेत, अशा पद्धतीने शिवसेना हे नाव आणि चिन्हाबाबतचा ‘निकाल’ विकत घेतला हे आता लपून राहिलेले नाही. एखाद्या प्रॉपर्टीचा सौदा करावा अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने ठाकऱ्यांनी निर्माण केलेली, जोपासलेली शिवसेना दिल्लीचे तळवे चाटणाऱ्या मिंध्यांच्या हातात दिली. शिवजयंतीच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले व त्यांनी मिंध्यांना शिवसेना-धनुष्यबाण मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मिंध्यांना धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले ते याच अमित शहांच्या मेहेरबानीने हे काय आता लपून राहिले? हा माणूस महाराष्ट्र व मराठी माणसाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. त्यामुळे श्रीमान शहांच्या कच्छपी लागून जे स्वतःचा राजकीय कंडू शमवीत आहेत, त्या सगळ्यांना महाराष्ट्राचे दुष्मन मानावे लागेल.”

-“छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या स्वराज्याच्या मुळावर आलेल्या प्रत्येक ‘शाह्यां’चा कोथळा छत्रपती व त्यांच्या मावळ्यांनी काढला. छत्रपतींचा तोच विचार घेऊन महाराष्ट्र आजही जिवंत, धगधगत आहे. बेइमान व गद्दारांना शिवाजी महाराजांनी जन्माची अद्दल घडवली हा इतिहास कुणालाच विसरता येत नाही. त्याच शिवरायांचा वारसा शिवसेना सांगते. निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबतचा निकाल मिंध्यांच्या बाजूने दिला तरी शिवसेना ही ठाकऱ्यांचीच होती, आहे व राहील. 40 बेइमान आमदार, 12 खासदार म्हणजे शिवसेना, असा निकाल देऊन लोकभावना व कायद्याचे धिंडवडे काढले गेले. मग लाखो शिवसैनिकांनी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या पुढ्यात त्यांची प्रतिज्ञापत्रे ‘ट्रक’ भरून पाठवली, त्यांना किंमत नाही?”

हे वाचलं का?

Shiv Sena: चिन्ह, पक्षानंतर ठाकरेंना आणखी धक्का, ‘या’ दोन गोष्टीही निसटल्या!

-“शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, उपनेते यांच्या प्रतिज्ञापत्रांना मोल नाही? शिवसैनिकांनी ज्यांना निवडून आणले त्यांची डोकी मोजून धनुष्यबाण व पक्षाच्या स्वामित्वाचा निकाल देणे ही घटनेशीच बेइमानी आहे. ठाकऱ्यांच्या नावावर त्यांना मते मिळाली. उद्याही ती मिळतीलच व पुन्हा हे लोक निवडून येतीलच अशी खात्री नसताना त्या बाजारबुणग्यांच्या भरवशावर शिवसेना व धनुष्यबाणाचे भविष्य ठरवण्यात आले. निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षाचा गुलाम बनल्याचेच हे लक्षण आहे.”

ADVERTISEMENT

“बेइमान आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने त्यांचा निकाल थांबवायला हवा होता. उद्या एखादा अदानी, अंबानी, नीरव मोदी उठेल व अशा प्रकारे आमदार – खासदारांना विकत घेऊन संपूर्ण पक्षावर, सरकारवरच मालकी हक्क सांगेल. देशातली सरकारे रोज पत्त्याच्या बंगल्यासारखी पाडली जातील. महाराष्ट्रात किमान दोन हजार कोटींचा सौदा करून आधी सरकार विकत घेतले व आता धनुष्यबाणाचा, शिवसेना नावाचा सौदा करण्यात आला. ही कसली लोकशाही?”

Sanjay Raut: ‘CM.. XXX चाटतायेत का?, राऊतांची जीभ घसरली; शाहांनाही सुनावलं

ADVERTISEMENT

-“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना भारतीय जनता पक्षाने हे नीच कृत्य घडवून आणलं. पंतप्रधान मोदी यांनी आता लाल किल्ल्यावरून घोषणा करायला हवी की, ’75 वर्षांचे स्वातंत्र्य आम्ही मोडीत काढले असून देशात ‘हम करे सो’ कायद्याची हुकूमशाही प्रस्थापित झाली आहे. न्यायालये, संसद, वृत्तपत्रे आणि निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्था यापुढे आमच्या गुलाम म्हणूनच काम करतील. स्वातंत्र्यासाठी आवाज उठवणाऱ्यांना व त्यासाठी लढणाऱ्यांना देशाचे अपराधी ठरवून फासावर लटकवले जाईल. देशात प्रामाणिकपणाला किंमत मिळणार नसून चोर व लुटारूंना मान्यता दिली जाईल.’ म्हणजे ‘लोकशाही’ व ‘स्वातंत्र्य’ हे शब्द कायमचे सरणावर जाण्याचा मार्ग मोकळा होईल.”

-“महाराष्ट्रात या विकृतीची सुरुवात झाली, पण महाराष्ट्रावरील हा घाव म्हणजे तुमच्या हुकूमशाहीच्या अंताची सुरुवात ठरणार आहे. सत्तेचा आज एवढा बेगुमान गैरवापर इतिहासात याआधी कधीच झाला नव्हता. आता गृहमंत्री अमित शहा पुण्यात येऊन सांगतात, ‘धोका देणाऱ्यांना कधी सोडायचे नसते!’ हे भंपक विधान ते एक नंबरच्या धोकेबाजांच्या मांडीस मांडी लावून करीत आहेत. मोदींच्या नावाने मते मागितली, मात्र मुख्यमंत्री होण्यासाठी विरोधकांचे तळवे चाटले, असे दिव्य विचार त्यांनी मांडले. असे बोलणारे स्वतःच्या ढोंगबाजीवरच शिक्कामोर्तब करीत आहेत.

-“मोदी युग संपले आणि बाळासाहेब ठाकरे व त्यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेशिवाय महाराष्ट्रात भाजपला कुत्रेही विचारणार नसल्यानेच त्यांनी शिवसेनेवर दरोडा टाकला व आपले तळवे चाटणाऱ्या मिंध्यांना मुख्यमंत्री केले. हिंदुत्वरक्षक, मराठी माणसाचा मानबिंदू असलेल्या शिवसेनेचे अस्तित्वच नष्ट करणारा हा निकाल महाराष्ट्राला मान्य नाही. न्याय झाला नाही व निकाल विकत घेतला. व्यापाऱ्यांच्या राज्यात दुसरे काय होणार? लढाई सुरूच राहील!”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT