राजकीय खाज शमेल इतकेच, पण…; एसटी संपावरून शिवसेनेनं भाजपला सुनावलं
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी जाहीर केल्यानंतरही कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यामुळे पगारवाढीच्या निर्णयानंतरही तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी संपातून माघार घेतली आहे. यावरून शिवसेनेनं आता भाजपच्या नेत्यांसह गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा साधला आहे. शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाजपवर टीकेचे बाण […]
ADVERTISEMENT
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी जाहीर केल्यानंतरही कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यामुळे पगारवाढीच्या निर्णयानंतरही तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी संपातून माघार घेतली आहे. यावरून शिवसेनेनं आता भाजपच्या नेत्यांसह गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाजपवर टीकेचे बाण डागले. “एस.टी. संपाचे काय होणार? असा प्रश्न कोणास पडला असेल, तर तो निरर्थक आहे. एस.टी.चा संप तसा संपल्यात जमा आहे, पण संपकऱ्यांचा एक गट संप सुरूच असल्याचे सांगत आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांनी भरघोस वेतनवाढीनंतरही ‘आम्ही संपावर आहोत व मागे हटणार नाही’, असं सांगणं हा आत्मनाश आहे. ते लोक आपल्या कुटुंबास विनाशाकडे ढकलत आहेत. गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत या दोन पुढाऱ्यांनी भरघोस वेतनवाढीचे स्वागत करून संपातून माघार घेतली. भरघोस वेतनवाढ हेच संपकऱ्यांचं मोठं यश आहे, पण संप सुरू करतानाच कधी व कुठे माघार घ्यायची, हे ज्यास कळते तोच कामगार नेता.”
“कामगारांचा पुरता विध्वंस झाला तरी चालेल, कामगारांच्या संसाराच्या होळ्यांवर आपली चूल पेटविणारे पुढारी या संपातही दिसत आहेत. एखाद्याने अंगावर काळा कोट चढविला व राज्यकर्त्यांवर असभ्य, एकेरी भाषेत हल्ला केला म्हणून आपणच नेते या भ्रमात जे लोक आहेत, त्यांनी कामगारांना संकटाच्या खाईत ढकलू नये. पण, नेत्यांनी आततायी वर्तन केले म्हणून कामगारांना आपले हित का कळू नये?”, असं म्हणत शिवसेनेनं गुणरत्न सदावर्तेवरही निशाणा साधला आहे.
हे वाचलं का?
“खोत व पडळकर या पुढाऱ्यांचा तसा एस.टी. कामगारांशी संबंध नव्हता. तरीही ते संपकऱ्यांत घुसले, पण संप हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच दोन्ही नेत्यांनी आझाद मैदानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात. तरीही हे शहाणपण महत्त्वाचे आहे. भाजपने सुरुवातीलाच समंजसपणाची भूमिका घेतली असती, तर एस.टी. कर्मचाऱ्यांचे असे हाल झाले नसते,” असं म्हणत शिवसेनेनं भाजपवरही टीकास्त्र डागलं आहे.
“एस.टी. महामंडळच मोडीत काढण्याचे व ते शासनात विलीन करायचे, अशी संपकऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे कामगारांना सुरक्षा व स्थैर्य मिळेल, पण सरकारने घसघशीत पगारवाढ करून, कर्मचाऱ्यांच्या पगाराची हमी घेऊन सकारात्मक पाऊल टाकले. तरीही एस.टी. कामगारांचे पुढारी संपाचा हेका सोडायला तयार नाहीत. याचा एकच अर्थ काढता येईल. कामगारांच्या पुढाऱयांना कोणीतरी एस.टी. कायमची बंद करण्याची सुपारी दिलेली दिसते. शासकीय एस.टी. बंद करून प्रवासी वाहतूक खासगी लोकांच्या घशात टाकण्याचे हे उद्योग आहेत.
ADVERTISEMENT
“भारतीय जनता पक्षाने एअर इंडियाचे खासगीकरण केले, रेल्वेबाबत विचार सुरू आहेत. आता एस.टी. बंद पाडण्यासाठी संपकऱ्यांच्या आगीत तेल ओतण्याचे प्रयत्न झाले, ते राज्याच्या हिताचे नव्हतेच. पडळकर व खोत हे भाजपचेच पुढारी आहेत. आता त्यांनी माघार घेतली असली, तरी पहिल्या दिवसापासून त्यांची भूमिका आक्रस्ताळेपणाचीच होती. भाजपचे प्रमुख लोक तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघडपणे समोर येऊन संपकऱ्यांना कामावर जाण्याचे आवाहन केले पाहिजे.”
ADVERTISEMENT
“पडळकर, खोत यांनी आग लावली, पण आता ती त्यांना विझविता येत नाही. हे आंदोलकांच्या नेतृत्वाचे अपयश आहे. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल परब यांच्या नावाने शिमगा करून प्रश्न सुटणार नाहीत. राजकीय खाज शमेल इतकेच! संप हे भरघोस पगारवाढीसाठीच होत असतात. सरकारने एस.टी. कर्मचाऱ्यांना पगारवाढ करूनही संपाचा हट्ट कायम असेल तर कामगारांचे पुढारीच कामगारांचे रक्षण करोत. अशा प्रसंगी परमेश्वर व सरकार तरी काय करणार?”, असं म्हणत शिवसेनेनं एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर चिंता व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT