शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर नाही तर ‘या’ ठिकाणी होणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्क मैदानावर होणार नाही. यंदा दसरा मेळावा घेतला जाणार आहे मात्र त्याचं ठिकाण बदलण्यात आलं आहे. गेल्या वर्षी वीर सावरकर सभागृहात हा मेळावा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला होता. आता हा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये घेण्यात येणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या संबंधीची माहिती दिली आहे. कोरोनाचं सावट असल्याने गेल्या वर्षी भव्य दिव्य असा मेळावा पार पडला नव्हता. यावर्षीही दसरा मेळावा होणार की नाही? हा प्रश्न होता. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा मेळावा होणार असल्याचं सांगितलं.

ADVERTISEMENT

माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये हा मेळावा पार पडणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी बंदिस्त हॉलमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात अर्थातच प्रमुख वक्ते असणार आहेत ते मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे यावेळी काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विरोधकांना दरवर्षीच्या दसरा मेळाव्यात टार्गेट केलं जातं. आता भाजप हा एकमेव विरोधी पक्ष शिवसेनेला आहे कारण शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हात मिळवणी करत महाविकास आघाडी सरकार आणलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा गेल्यावर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कसमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आला होता. तसेच, मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईनने शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं होतं. मात्र, यंदाच्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने मेळावा होणार नसून, प्रत्यक्ष मेळावा घेणार अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली होती.

हे वाचलं का?

षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा पार पडणार असून, 50 टक्के उपस्थितीत दसरा मेळावा पार पडणार आहे. शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते उपनेते, मंत्री, मुंबईचे आमदार, महापौर आणि मुंबई महानगरपालिकेतले काही काही महत्वाचे नगरसेवक या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. राज्यात कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नसल्याने शिवाजी पार्क ऐवजी शिवसेनेने यंदाही दसरा मेळावा हॉलमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाकरे कुटुंबाचा शिवाजी पार्कशी जवळचा संबंध आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी पहिला मेळावा 27 नोव्हेंबर 1966 रोजी शिवाजी पार्क येथे घेतला होता, तेव्हापासून आजतागायत याच मैदानावर सेनेचा दसरा मेळावा होत आलेला आहे. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्या हाती सोपवले आणि नातू आदित्य ठाकरे यांना सेनेची जबाबदारी दिली, त्याचे हे मैदानही साक्षीदार आहे. त्याच बरोबर 1995 मध्ये जेव्हा शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री झाला तेव्हा त्यांचा शपथविधीही याच मैदानात झाला होता. त्यानंतर जेव्हा स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हादेखील त्यांनीही याच मैदानात शिवसैनिकांच्या उपस्थितीत शपथ घेतली होती. आता मात्र सलग दोन वर्षे या मैदानावर म्हणजेच शीव तीर्थावर मेळावा पार पडणार नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT