सिंधुदुर्ग: राजन तेलींचा राजकीय गेम नेमका कोणी केला.. फडणवीसांशी बंद दाराआड काय झाली चर्चा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भरत केसरकर, सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील मास्टरमाईंड म्हणून ओळखले जाणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी जिल्हा बँकेतील आपल्या पराभवानंतर आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवणारे आणि नेहमी चर्चेत असणारे राजन तेली यांचा नेमका राजकीय प्रवास कसा आहे? मात्र आता त्यांचा राजकीय गेम नेमका कुणी केलाय? या सगळ्याविषयी जाणून घेऊयात सविस्तरपणे.

ADVERTISEMENT

राजन तेली हे कणकवलीमधील बहुआयामी व्यक्तिमत्व. कुडाळ तालुक्यातील घोडगे सारख्या ग्रामीण भागात त्यांचा जन्म झाला. यानंतर ते कणकवलीमध्ये स्थायिक झाले. नारायण राणे यांच्या बंगल्यासमोरच काही अंतरावर त्यांचा बंगला आहे.

1997 मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नारायण राणे यांनी पहिल्यांदाच काँग्रेसकडून सत्ता खेचून घेतली आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवला. राजन तेली हे जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच निवडून गेले आणि थेट शिवसेनेचे पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष झाले.

हे वाचलं का?

पहिला अडीच वर्षाचा कार्यकाल राजन तेली यांना मिळाला. त्यानंतर 2002 मध्ये कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांनी निवडणूक लढवली पण अवघ्या दोन मताने त्यांचा राष्ट्रवादीचे बाळा भिसे यांनी त्यांचा धक्कादायक पराभव केला. यानंतर 23 नोव्हेंबर 2003 मध्ये बाळा भिसे यांचे बंधू कैलासवासी सत्यविजय भिसे यांचा कणकवली कळसुली रस्त्यावर दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. याचे तीव्र पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटले.

यावेळी नारायण राणे यांचा बंगला जाळण्यात आला होता. यानंतर राजन तेली ना अटक झाली होती. त्यावेळी नारायण राणे विरोधी पक्ष नेते होते. बरेच महिने राजन तेली तुरुंगात राहिले यानंतर त्यांना जामीन मिळाला. त्यानंतर जून 2005 मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

ADVERTISEMENT

अशा वेळी नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असलेले राजन तेली यांच्यासह नारायण राणे यांच्या अनेक समर्थकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राणेंसोबत जात काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला. कणकवली, मालवण विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत नारायण राणे यांनी जीजी उपरकर यांचे डिपॉझिट जप्त करत मोठा विजय मिळवला होता. त्यावेळी मोठी जबाबदारी राजन तेलींनी पेलली होती.

ADVERTISEMENT

नारायण राणे यांच्या विजयात तेलीं यांचा मोठा वाटा होता. राजन तेली व जी.जी. उपरकर हे नारायण राणे यांचे डावे-उजवे समजले जायचे. राजन तेलींनी आणि राण्यांसोबत येणे पसंत केलं तर उपरकर हे शिवसेनेतच राहिले.

नारायण राणे यांना शह देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी 2006 च्या विधान परिषद निवडणुकीत जीजी उपरकर यांना उमेदवारी दिली. अशावेळी शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणे यांनी काँग्रेस हायकमांडशी शब्द घेऊन राजन तेलींना मैदानात उतरवले. उपरकर विजयी झाले तर राजन तेली सुद्धा विजय झाले. पण बेगमी मतांच्या जोरावर काँग्रेसचे विजय सावंत हे विजयी झाले होते.

या निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसला आणि शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. राजन तेली आमदार झाल्यानंतर तेली आणि राणे यांची जवळीक खूप वाढली होती. सहाजिकच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली आणि राजन तेली यांनी ती समर्थपणे पार पाडली.

2009 च्या नारायण राणे यांच्या निवडणुकीत राणेंनी वैभव नाईक यांचा तब्बल 25 हजार मतांनी पराभव केला. तर 2009च्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांना उमेदवारी मिळाली.

काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवताना निलेश राणे यांनी सुरेश प्रभू यांचा तब्बल 45 हजारपेक्षा जास्त मताने पराभव केला होता. या विजयातही राजन तेली यांचा मोठा वाटा होता.

यानंतर 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा धक्कादायक पराभव झाला आणि हा पराभव विनायक राऊतांनी तब्बल दीड लाख पेक्षा जास्त मतांनी केला होता. यानंतर झालेल्या आरोप-प्रत्यारोपात नारायण राणे यांचे अनेक समर्थक राणे यांना सोडून जाऊ लागले. यावेळी राजन तेली व काका कुडाळकर यांनी राणेंची साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजन तेली यांना सावंतवाडी मतदार संघातून भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे तेलींनी ऐनवेळेस राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि ही निवडणूक लढवली.

परंतु या निवडणुकीत शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी राजन तेली यांचा पराभव केला. हा तेलींचा दुसरा पराभव होता.

यानंतर 2016 च्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजन तेली हे भाजपकडून लढले पण राष्ट्रवादीच्या नवख्या प्रमोद धुरी यांनी त्यांचा धक्कादायक पराभव केला.

नारायण राणेंनी काँग्रेसला रामराम करून स्वाभिमान पक्ष काढला. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 2019 मध्ये भाजप मध्ये प्रवेश केला.

2019 च्या निवडणुकीत तेली भाजपमध्ये असताना शिवसेना-भाजप युतीशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी विनायक राऊत यांना मदत केली आणि 2019 मध्ये विनायक राऊत यांनी निलेश राणेंचा तब्बल 1 लाख 75 हजार मतांनी पराभव केला.

नारायण राणे भाजपमध्ये आले आणि राजन तेली यांचे राणेंशी पुन्हा चांगले संबंध निर्माण झाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती झाली. राजन तेली हेच सावंतवाडीमधून इच्छुक होते.

मात्र पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. त्यावेळी राणे यांनी मोठी ताकद उभी केली. पण राजन तेली यांचा दिपक केसरकर यांनी तब्बल 15 हजार मतांनी पराभव केला.

भाजपचे चिन्ह मिळाले असते तर कदाचित या ठिकाणी वेगळा निकाल पाहायला मिळाला असता. असं राजकीय विश्लेषकांचे मत आहे. हा राजन तेली यांचा चौथा पराभव होता. यानंतर राजन तेली यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष पद मिळाले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष झाल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडवण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतर गेल्या दोन वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष वाढविण्यामध्ये त्यांनी मोठे काम केले.

नारायण राणे यांच्याशी त्यांचे संबंध चांगले व सलोख्याचे होत जात होते. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत पतसंस्था मतदारसंघातून त्यांना भाजपने उमेदवारी दिली. पण त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले सुशांत नाईक यांनी त्यांचा पराभव केला आणि राजन तेली हे प्रचंड नाराज झाले.

हा पराभव तेली यांचा झाला की करण्यात आला? असे अनेक प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत. राजन तेली जर निवडून आले असते तर निश्चितच जिल्हा बँकेचे चेअरमन झाले असते. परंतु भाजपची व्यवस्था ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी झाली. यानंतर व्यथित झालेल्या तेलींनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर तडकाफडकी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

मुंबईहून थेट कणकवलीत दाखल झालेल्या नारायण राणे यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. परंतु या स्वागताला व पत्रकार परिषदेला राजन तेली अनुपस्थित राहिल्याने तेली यांची नेमकी कोणावर नाराजी? याची चर्चा सुरू झाली.

दोन जानेवारीला गोवा दौऱ्यावर असलेल्या भाजपचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोव्यातील ‘सिद्धा दी गोवा’ या हॉटेलमध्ये बंद खोलीत भेट घेतली आणि या दोघांमध्ये तब्बल 45 मिनिटे बंद खोलीत चर्चा झाली.

जिल्हा बँकेत अपयश तरीही वैभव नाईकांचा राणेंना धक्का, समर्थक राजन तेलींचा केला पराभव

ही नेमकी चर्चा काय झाली? हे समजू शकले नसले तरी राजन तेलींना मुंबईमध्ये फडणवीसांनी येण्याचे निमंत्रण दिले आहे. राजन तेली भाजपमध्ये नाराज आहेत का?

राजन तेलींना पराभूत करून भाजपमधील काही नाराज गटाने तेलींचा राजकीय गेम केलाय का? क्रॉस वोटिंग करून तेलींना कोणी पाडले? तेलींना पाडण्यामध्ये कोणाचा हात आहे? असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात झाले आहेत.

नारायण राणेंवर नाराज असलेले राजन तेली दुसऱ्या पक्षाची कास करणार का? 2002 पासून 2021 पर्यंत 19 ते 20 वर्षाच्या काळात राजन तेली यांचा तब्बल पाच वेळा पराभव झाला आहे. फक्त विधानपरिषदेच्या आमदारकीच्या निवडणुकीत 2006 मध्ये ते विजयी झाले होते. मात्र, हे पाच पराभव पचवणारे राजन तेली आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT