चंद्रपूर जिल्ह्यात महिन्याभरात तिसऱ्यांदा पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला

अनेक घरात पाणी शिरले असून काही नद्यांना पूर आल्याने गावांचे संपर्क तुटले आहे.
Flood in chandrapur
Flood in chandrapur

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीमुळे पूर आले आहे. गेल्या महिन्याभरात चंद्रपूरमध्ये तिसऱ्यांदा पूर आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक घरात पाणी शिरले असून काही नद्यांना पूर आल्याने गावांचे संपर्क तुटले आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरु आहे. एका महिन्यात तिसऱ्यांदा नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांना आपले घर सोडून सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

धरणाचे दरवाजे उघडल्याने नद्यांना पूर

गेल्या दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आले आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अप्पर वर्धा, लोअर वर्धा, गोसीखुर्द धरण आणि ईराई धरण ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे या धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्याने परिसरातील नद्या-नाल्याना पूर आले आहे. वर्धा, वैनगंगा आणि ईराइ नदीला पूर आले आहे. तिसऱ्यांदा धरणाचे दरवाजे उघडल्याने पुराचा सामना करावा लागत आहे. धरणात पाणी वाढत असल्याने परिस्थिती बिकट होत चालली आहे.

अनेक गावांचे संपर्क तुटले

पुरामुळे पूल पाणीखाली गेले आहे. त्यामुळे डझनभर गावांचा चंद्रपूर शहराशी संपर्क तुटला आहे. वर्धा नदीच्या पुलावर पाणी आल्याने वर्धाहून तेलंगणाकडे जाणारा मार्ग मागच्या 24 तासांपासून बंद आहे. बल्लारपूर आणि राजुरा शहराला जोडणारा पूल महिन्यातून तिसऱ्यांदा पाणीखाली गेला आहे. मार्ग बंद असल्याने रस्त्यांवर गाड्यांच्या रांगा लागल्या आहे. भद्रावती तालुक्यातील संपूर्ण पळसगाव पाण्याखाली आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे.

प्रशासनाने लक्ष देण्याची गरज; नागरिकांची मागणी

महिन्यात तिसऱ्यांदा पूर आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मानसिक त्रासासह आर्थिक नुकसानाला येथील नागरिकांना सामना करावा लागत आहे. प्रशासन मदत म्हणून धनादेश आणि राशन देत आहे. मात्र, नद्यांच्या खोलीवर लक्ष देत नाही. म्हणून यावर लक्ष देणं गरजेचं आहे, असं येथील पूरग्रस्त नागरिक सांगत आहेत. रस्त्यांची उंची वाढवणे गरजेचे आहे, अशी देखील नागरिक मागणी करत आहेत. तर अवैधरित्या करण्यात आलेल्या प्लॉटिंगमुळे पाणी भरत आहे, असं नागरिकांचं म्हणणं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in