कल्याण-डोंबिवलीची अवस्था दयनीय : अनुराग ठाकूरांनी आयुक्तांना सर्वांसमोर सुनावले…
कल्याण : कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी आहे हे ऐकूनच मी हैराण झालो. कारण आतापर्यंत ज्या शहराला स्मार्ट सिटी घोषित केले, तिथे बदल आणि काम झालेले मी पाहिले आहे. मात्र कल्याण – डोंबिवली हे शहर स्मार्ट सिटी म्हणून घोषित केल्याचे मला वाटलेच नाही, असे खडेबोल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांना सर्वांसमोर […]
ADVERTISEMENT

कल्याण : कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी आहे हे ऐकूनच मी हैराण झालो. कारण आतापर्यंत ज्या शहराला स्मार्ट सिटी घोषित केले, तिथे बदल आणि काम झालेले मी पाहिले आहे. मात्र कल्याण – डोंबिवली हे शहर स्मार्ट सिटी म्हणून घोषित केल्याचे मला वाटलेच नाही, असे खडेबोल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांना सर्वांसमोर सुनावले.
मंत्री अनुराग ठाकूर नुकतेच कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले होते. या दरम्यान सोमवारी सायंकाळी त्यांनी कल्याण-डोंबिवली महानगपालिका मुख्यालयात आयुक्त भाऊसाहेब दांगडे, इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान मंत्री ठाकूर स्मार्ट सिटीच्या कार्यालयात गेले. यावेळी त्यांना स्मार्ट सिटी संदर्भातील काही व्हिडीओ दाखवण्यात आले.
मात्र हे व्हिडीओ पाहताच मंत्री ठाकूर म्हणाले, ही स्मार्ट सिटी आहे हे ऐकूनच मी हडबडलो. कारण ज्या शहरात स्मार्ट सिटीची घोषणा केली आहे तेथे रस्ते, स्वच्छता, वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबवल्याने शहरे सुंदर झालेली मी पहिली आहेत. मात्र कल्याण-डोंबिवली शहरात हा बदल मला कुठेही दिसला नाही. मंत्री ठाकूर यांनी सर्वांसमोच आयुक्तांना सुनावल्यांने सर्वांच्याच चेहऱ्यावरील अक्षरशः रंग उडाला होता.
“हे शहर स्मार्ट सिटीमध्ये आहे का ? हे ऐकून मी आश्चर्यचकीतच झालो,रस्ते पण खराब आहेत”… केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांचे आयुक्तांना खडे बोल..@ianuragthakur जी,आमची #KDMC फक्त सेटींगमध्ये स्मार्ट आहे. मग ती टक्केवारीची असो की नवनवीन पुरस्कार असो….बरं झाले आपणच घरचा आहेर दिला.
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) September 12, 2022
काही वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवली शहर सर्वात घाणेरडे शहर आहे असे वक्तव्य केले होते. त्यानंतर अनुराग ठाकूर यांच्या रुपाने आणखी एका केंद्रीय मंत्र्यांनी शहराच्या अवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. दरम्यान, कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनीही ट्वीटवरवरुन महापालिकेवर टीका केली. कल्याण-डोंबिवली महापालिका ही फक्त सेटींगमध्ये स्मार्ट आहे. मग ती टक्केवारीची असो की नवनवीन पुरस्कार असो, बरं झाले आपणच घरचा आहेर दिला, अशा शब्दात त्यांनी महापालिकेवर टीका केली.