मोफत सॅनिटरी पॅड्स वाटणारी खान्देशातली ‘पॅड-वूमन’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पाळीसाठी आणलेले सॅनिटरी नॅपकिन्स नंतर टाकूनच तर द्यायचे असतात, मग दर महिन्याला 30 – 40 रुपये खर्च करायचे कशाला?, हा सवाल करणा-या प्रत्येकीला जळगावच्या वैशाली विसपुते गेली 7 वर्षं सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापराचं महत्त्व पटवून देत आहेत आणि कापडमुक्त पाळीची मोहिम खेडोपाडी, गावोगावी नेत आहेत.

‘8 वर्षांपूर्वी माझ्या पोटी मुलगी जन्माला आली, पण दुर्दैव असं की एका वर्षाच्या आत तिचा मृत्यू झाला. त्यानंतर माझ्या निधीला कधीच कोणी विसरू नये म्हणून तिच्यासाठी आई म्हणून मी जे जे केलं असतं ते सगळं गरजू मुलींसाठी करायला मी सुरूवात केली. त्यातूनच याकामाला दिशा मिळाली’, असं त्या सांगतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सुरूवातीला त्या एकट्याच हे काम करायच्या, पण नंतर त्यांचे पती आणि मुलानीही या कामात त्यांना मदत करायला सुरूवात केली. ‘कामाला सुरूवात केली तेव्हा सॅनिटरी पॅड्सबद्दलच्या बायकांच्या मनातल्या अनेक अंधश्रद्धा समोर आल्या. काहींना वाटायचं की, सॅनिटरी पॅड्स जाळावे लागतात त्याने आम्हाला कधीच मुल होणार नाही. तर काहींना वाटायचं की, हे पॅड्स सापाच्या तोंडी गेले तर आमचा नवरा आंधळा होईल. मंगळवार आणि शुक्रवारी तर पाळी, पॅड्सबद्दल बोलणं म्हणजे विटाळ असंही काहींना वाटायचं. त्यामुळे तर एकदा मी जागृतीसाठी गेलेले तेव्हा एका गावातून मला आणि माझ्या पूर्ण टीमला हकललेलं. त्यामुळे अशा परिस्थितीत या महिलांना पॅड्सकडे वळवणं हे सर्वात मोठं आव्हान सुरूवातीला आमच्या समोर होतं. आता परिस्थिती थोडी बरी असली तरी पूर्णपणे सुधारलेली नाही’, असं त्या सांगतात.

या सगळ्या अनुभवांमधून जाताना वैशाली यांनाही कधीतरी थांबावसं वाटलं, पण खचून न जाता त्या अविरतपणे काम करत राहिल्या. ‘महिलांच्या मत परिवर्तनासाठी आम्ही मग आम्ही एक गाव दत्तक घेऊन त्या गावातल्या प्रत्येक महिलेला वर्षंभरासाठी सॅनिटरी पॅड्स मोफत द्यायला सुरूवात केली. आमच्याकडे प्रत्येकाच्या पाळीच्या तारखांनुसार माहिती असायची त्यानुसार आम्ही त्यांच्याकडे पॅड्स पोहोचवायचो. एक वर्षं पॅड्स मिळाल्यावर त्या बायकांना पॅड्सचे फायदे समजू लागले, मग त्या स्वत: पॅड्ससाठी खर्च करू लागल्या. शिवाय मेडिकलच्या दुकानात जाऊन पॅड्स विकत घ्यायला लाजणा-या बायकांसाठी आम्ही बाजारात बसून पॅड्स विकण्याचा प्रयत्न देखील केला. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचं त्या सांगतात.’

ADVERTISEMENT

इतक्या वर्षाच्या मेहनतीतून काय हाती आलं याबद्दल त्या सांगतात की, ‘आम्ही पॅड्स विकायला बाजारात बसलेलो असताना एकदा एक वृद्ध महिला आमच्या पाशी आली. आम्ही काय विकत आहोत याची तिने चौकशी केली. आम्ही सॅनिटरी नॅपकिन्स विकत असल्याचं कळल्यावर तिने आपल्या नात सुनेला बोलवून घेतलं आणि म्हणाली की, आम्ही कापड वापरत राहिलो, पण आता तू ते वापरू नकोस. तू हे पॅड वापर. मग तिने स्वत: पैसे देऊन पॅड्स घेतले. त्या दिवशी माझ्या डोळ्यातून पाणी आलं, असं वाटलं की आपण करत असलेल्या कामाची ही खरी पोचपावती आहे.’

ADVERTISEMENT

वैशाली यांच्या या कामासाठी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी त्यांचा गौरव केला होता. शिवाय आपल्या कार्यामुळेच जळगाव मनपाच्या त्या पहिल्या महिला सदिच्छा दूत बनल्या.

त्याबद्दल त्या म्हणतात की, ‘माझ्या कामाचा आदर करणारे अनेक आहेत. त्या सगळ्यांमुळे मला बळ मिळतं. पण जेव्हा एखादी पॅड्सला नकार देणारी महिला समजून उमजून पॅड्स वापरायला लागते तेव्हा मिळणारं समाधान सगळ्यात मोठं आहे. त्याला कशाचीच तोड नाही.’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT