कारखाना चालवणं येरागबाळ्याचं काम नाही,अजित पवारांच्या टीकेला पंकजांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या

बारामतीचा रस्ताही केंद्राच्या निधीतूनच झाला - पंकजांचा अजित पवारांवर पलटवार
कारखाना चालवणं येरागबाळ्याचं काम नाही,अजित पवारांच्या टीकेला पंकजांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या

बीड जिल्ह्यात शुक्रवारचा दिवस गाजला तो अजित पवार आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांविरुद्ध केलेल्या आरोप आणि त्याच्या प्रत्युत्तरांमुळे. केज तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना अजित पवारांनी नाव न घेता पंकजा मुंडेंवर केलेल्या टीकेचा नंतर पंकजा यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या काळात उभारलेल्या आणि चांगल्या चालत असलेल्या वैद्यनाथ कारखान्याची आज काय अवस्था झाली आहे? कारखाना चालवायला कर्तृत्व लागते, येऱ्यागबाळ्याचे काम नाही, अशी टिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता केली. बापजाद्यांनी काढून दिलेल्या संस्था नीट चालवायला शिका, असा सल्लाही यावेळी अजितदादांनी पंकजा ताईंना दिला.

अजित दादांनी केलेल्या या टीकेला पंकजा मुंडेंनी प्रत्युत्तर देत समाचार घेतला. ''अजित पवार राज्याचे अर्थमंत्री आहेत, वाटलं होतं जिल्हयात येऊन शिल्लक ऊसाला तसेच इथल्या शेतकऱ्यांना काहीतरी अनुदान, मदत जाहीर करतील. पण, तसं काही झालं नाही, फक्त त्यांनी टिकाच केली. शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलं नाही, घोर निराशा झाली. सरकार म्हणून जे बोलता ते करून दाखवा, उगाच गप्पा मारू नका", अशा शब्दांत पंकजांनी अजित पवारांना सुनावलं आहे.

नीट अभ्यास करुन जिल्ह्यात येत जा - पंकजांचा अजितदादांना सल्ला

''अर्थमंत्री अजित पवार इथं येऊन चांगलं बोलतील, अशी अपेक्षा होती. पण, सुतगिरणी बुडविणारे त्यांच्या व्यासपीठावर होते, त्याबद्दलही बोलतील असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. खासदारांवर रस्त्यावरून त्यांनी टिका केली पण त्यांना हे माहित नाही की जिल्हयात अकरा राष्ट्रीय महामार्ग आम्ही आणले, अनेक छोटे, मोठे रस्ते जे तुमच्या काळात झाले नाहीत ते केले. एवढेच काय तुमच्या बारामतीचा रस्ता देखील केंद्र सरकारच्या निधीतून झाला, नीट अभ्यास करून जिल्हयात येत जा,'' असा पलटवार पंकजा मुंडेंनी केला.

Related Stories

No stories found.