रामदास कदम यांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
शिवसेनेला मोठं खिंडार पडलेलं असताना आता आणखी एक धक्का बसला आहे. पक्षात साइडलाइन करण्यात आलेल्या रामदास कदम यांनीही राजीनामा दिला आहे. शिवसेना सोडली आहे की नाही हे त्यांनी सांगितलेलं नाही. मात्र आज बाळासाहेब ठाकरे असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती म्हणत ऱामदास कदम यांनी राजीनामा दिला आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया […]
ADVERTISEMENT

शिवसेनेला मोठं खिंडार पडलेलं असताना आता आणखी एक धक्का बसला आहे. पक्षात साइडलाइन करण्यात आलेल्या रामदास कदम यांनीही राजीनामा दिला आहे. शिवसेना सोडली आहे की नाही हे त्यांनी सांगितलेलं नाही. मात्र आज बाळासाहेब ठाकरे असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती म्हणत ऱामदास कदम यांनी राजीनामा दिला आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी?
मी रामदास कदम यांच्याशी बोलतो. मात्र आमदार योगेश कदम हे पहिल्या दिवसापासून आमच्यासोबत आहेत. तसंच रामदास कदम यांच्या शुभेच्छाही आमच्यासोबत आहेत. आम्ही जी भूमिका जी घेतली आहे, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही म्हणतोय. आमचं हे ध्येय अनेकांना मान्य आहे. ऱाज्याचा सर्वांगिण विकास करणं हेच आमचं उदीष्ट आहे. युवा सेनेचे पूर्वेश सरनाईक यांनीही आम्हाला पाठिंबा दिला आहे. मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधीही आमची भूमिका स्वीकारत आहेत याचा आनंद आहे. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रामदास कदम यांनी राजीनामा देताना काय म्हटलंय?
उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात रामदास कदम म्हणतात, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचं निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही, हे मला पाहायला मिळालं.”
“विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मला अचानक मातोश्रीत बोलावून घेतलं आणि मला आदेश दिले की यापुढे तुमच्यावरती कुणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बोललं किंवा मातोश्रीवर कोण काही बोललं तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही.”
“मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही. यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही. मागील ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करीत आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटं आली, त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे. “
“राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत युती करू नका, ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल, अशी विनंती केली होती. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही, याचंही दुःख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेनाप्रमुख असते, तर माझ्यावर ही वेळ आली नसती आणि म्हणून मी आज ‘शिवसेना नेता’ या पदाचा राजीनामा देत आहे. असं म्हणत रामदास कदम यांनी राजीनामा दिला आहे.