Raj Thackeray: राज ठाकरेंचं ‘ते’ वक्तव्य पक्षाला भोवणार?
मिथिलेश गुप्ता, कल्याण: गुढीपाडवा मेळाव्यात शिवतिर्थावरील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे आणि मदरशासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मनसेतील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी नाराजी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांचं हे वक्तव्य पक्षाला भोवण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्य एका मनसे पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहली आहे. ’16 वर्षाचा फ्लॅश बॅक आठवला आणि […]
ADVERTISEMENT

मिथिलेश गुप्ता, कल्याण: गुढीपाडवा मेळाव्यात शिवतिर्थावरील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे आणि मदरशासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मनसेतील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी नाराजी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांचं हे वक्तव्य पक्षाला भोवण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्य एका मनसे पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहली आहे.
’16 वर्षाचा फ्लॅश बॅक आठवला आणि डोळ्यात पाणी आलं.’ अशी भावनिक पोस्ट इरफान शेख या पदाधिकाऱ्याने टाकली आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्यानवर नाराजी व्यक्त करत लवकरच मुस्लिम पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असं इरफान शेख यांनी सांगितलं आहे.
‘आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या? आज समाजाला सामोरे जाताना जाणीव झाली. 16 वर्षाचा प्लॅशबॅक आठवला आणि डोळ्यात पाणी आले.’ असे इरफान शेख यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या भावनिक पोस्टविषयी शेख यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ‘पक्ष प्रमुख ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर पक्षातील कार्यकर्ते आणि समाज प्रश्न विचारु लागला आहे की, पक्षाची नेमकी भूमिका काय आहे? पक्षात नेमके चाललंय काय? 2009 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिमेतून मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांना मुस्लिम मतदारांनी मतदान केले होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मेहनत घेतली होती.’
‘त्यानंतर 2019 साली कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांना देखील कचोरे, नेतिवली, डायघर विभागातून मुस्लिम मतदान झाले आहे. त्यामुळेच आता मनसेतील मुस्लिम कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची येत्या दोन दिवसात बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.’ असे शेख यांनी सांगितले.
‘समाजाला विश्वासात घेऊन काही गोष्टी करता आल्या असत्या. मशिदीवरील भोंगे आणि त्यावरुन दिली जाणारी बांग यासंदर्भात विशिष्ट डेसीबल, वेळ आणि अंतराची मर्यादा न्यायालयाने ठरवून दिली आहे. मुस्लिम समाज हा न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे वागण्यास तयार होईल. त्यामुळे पक्ष प्रमुख ठाकरे समाजाला विश्वासात घ्यायला हवं होतं. त्यांना समाजाला अंगावर घेण्याची गरज नव्हती.’ असे शेख यांनी म्हटले आहे.
मशिदींवरील भोग्यांबाबत काय म्हणाले होते राज ठाकरे?
‘माझी पंतप्रधानांना विनंती आहे. ईडीच्या, आयकरच्या धाडी टाकत आहात ना… आमच्या पोलिसांना विचारा, त्यांच्याकडे सोर्स आहे. झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांमध्ये एकदा धाडी टाका. तुम्हाला काय काय हाताला लागेल, ते कळेल. आपल्याला पाकिस्तानची गरजच नाही. कशाला हवाय पाकिस्तान?’
‘उद्या जर काही घडलं, तर आतलं आवरता आवरता नाकीनऊ येतील इतक्या गोष्टी आतमध्ये भरलेल्या आहेत. आमचं लक्ष नाहीये. आम्हाला मतं हवीत. आम्हीच त्या झोपडपट्ट्या, मदरसे वाढवत आहोत.”
‘अनेक मदरसे असे आहेत की जिथे काय घडतंय, तेच समजत नाही. ही सगळी पाकिस्तानच्या प्रोत्साहनामुळे आलेली आणि आपल्या लोकांनी स्वीकारलेली ही लोकं आहेत. नगरसेवक, आमदार, खासदारांना याच्याशी काही घेणंदेणं नाही. ते कशात लागले, आधार-रेशन कार्ड घेऊन जा आणि आमचीच मार. त्यांना सगळ्या गोष्टी पुरवणारे आमचेच.’
‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जाती-जातीत द्वेष, शरद पवारांना पण तेच हवंय’, राज ठाकरेंची जहरी टीका
‘एक दिवस असा येईल की त्यावेळी सगळ्यांचे डोळे उघडतील. काय करून ठेवलं म्हणून. एकदा पोलिसांशी बोलून बघा. कानोसा घ्या. तुम्हाला धडकी भरेल. आमचं कुणाचं लक्ष नाही.’
‘मशिदीवर लागणारे भोंगे खाली उतरवावे लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर आज आणि आता सांगतोय, ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील. त्याच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायची.’
‘मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. आमचा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. ज्याप्रकारे स्पीकरचा सकाळ पाच वाजल्यापासून त्रास होतो. धर्म बनला तेव्हा लाऊड स्पीकर होता का? बाहेरच्या देशात बघा. कुठेही लाऊडस्पीकर दिसणार नाही. प्रार्थना घरात करा. प्रत्येकाने आपापला धर्म घरात ठेवला पाहिजे. आमच्याकडं मंदिर आहेत. टाका धाडी. काय मिळणार घंटा. आमच्याकडे काहीच नाही.’ असं म्हणत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा हाती घेतला आहे.