‘तुम्ही इतकं सुंदर भाषण… सगळ्यांना मार्गदर्शन करता. परंतु तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यातून तुमच्याशिवाय कुणी निवडूनच येत नाही’, हे विधान आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोमवारी १२ डिसेंबरला ८३ वाढदिवस साजरा करण्यात आला. मुंबईत हा अभिष्टचिंतन सोहळा झाला. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेतेमंडळींनी मार्गदर्शन केलं. आणि हाच धागा पकडत अजित पवारांनी आपल्याच पक्षातल्या नेतेमंडळींना खडेबोल सुनावले.
अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना मंचावरच खडेबोल सुनावले. तर काहींचं कौतुकही केलं. पण याच कौतुकावरून आता राजकीय ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जातेय. बोलता बोलता अजित पवारांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनाही ताकदीचा आरसा दाखवल्याचं म्हटलं जातंय. अजित पवार कुठे आणि काय म्हणाले, त्याचा राजकीय अर्थ काय हेच आपण बघणार आहोत.
अजित पवारांनी शरद पवारांसमोरच पिळले नेत्यांचे कान; म्हणाले, ‘कुणाची बिनपाण्याने करायची…’
अजित पवार नेमकं काय म्हणाले ते बघा…
मुंबईत झालेल्या कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, “मी बोललोय… याला अपवाद फक्त नाशिक आणि बीड जिल्हा आहे आणि दिलीपराव पुणे जिल्ह्याचे असल्यामुळे पुणे जिल्हा आहे. तुम्ही इतकं सुंदर भाषण… सगळ्यांना मार्गदर्शन करता. परंतु तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यातून तुमच्याशिवाय कुणी निवडूनच येत नाही. मी आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने कुणाची बिनपाण्याने करायची असं ठरवलं नव्हतं, पण खरं ते बोललं पाहिजे,” अशा शब्दात अजित पवारांनी सुनावलं.
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला नंबर एक पक्ष करण्याच्या मिशनची अजित पवारांनी घोषणा केली. त्याचवेळी छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीपराव वळसे पाटील यांचं नाव घेऊन कौतूक केलं. नाशकात १५ पैकी प्रत्येकी पाच आमदार भाजप आणि राष्ट्रवादीचे आहेत. बीडमध्ये सहापैकी पाच, पुण्यात १७ पैकी १० आमदार राष्ट्रवादीचे आहेत. पण त्याचवेळी निव्वळ स्वतः निवडून येत मार्गदर्शन करणाऱ्या पुढाऱ्यांना खडेबोल सुनावले.
ज्यांना खडेबोल सुनावले त्यांचं पवारांनी नाव घेतलं नाही. मात्र पवारांच्या भाषणाचा धागा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांशी जोडला जातोय. जयंत पाटलांच्या सांगलीत आठपैकी तीन आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.
‘मला चुलत्याची (शरद पवार) सवय लागली, आता काय करू?’; अजित पवारांनी एकनाथ शिंदेंची ‘झोप’च काढली
अजित पवार-जयंत पाटील कथित सुप्त संघर्ष?
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार-जयंत पाटील यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी पवार-पाटील दोघांचींही नावं समोर आली होती. शेवटी पवारांनी बाजी मारली. आता शरद पवारांसमोरील भाषणाना पुन्हा एकदा अजित पवार-जयंत पाटील यांच्यातल्या कथित सुप्त संघर्षाची चर्चा सुरू झालीये.